Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेख‘देवा’ने पाहिला देवाचा पुतळा

‘देवा’ने पाहिला देवाचा पुतळा

क्रिकेटची पंढरी, क्रिकेट शौकिनांची नगरी आणि क्रिकेटपटूंची जननी म्हणून सर्वपरिचित असलेल्या मुंबई नगरीत याच क्रिकेटचा ‘देव’ म्हणून मनामनात घर करून आणि चालती-बोलती अख्यायिका बनून राहिलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिन रमेश तेंडुलकर याच्या २२ फुटी पुतळ्याचे मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण करण्यात आले. हा सोहळा जेव्हा सर्व शौकिनांनी डोळे भरून पाहिला तेव्हा ‘धन्य झालो’ अशीच भावना प्रत्येकाची असणार. सध्या मुंबईसह देशभरात वर्ल्डकप स्पर्धेचे वारे वाहत आहेत. अशा क्रिकेटमय वातावरणात सचिनचा पुतळा वानखेडे स्टेडियममध्ये उभारण्यात आला हा एक चांगला योगायोग म्हणायला हवा. सचिन यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे क्रिकेटमधील योगदान अधोरेखित करणे हा या पुतळ्याचा उद्देश आहे. वानखेडे स्टेडियममधला हा पहिलाच कायमस्वरूपी पुतळा आहे.

सचिन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियमवर अनेक संस्मरणीय सामने खेळले, अनेक विक्रम मोडीत काढले, इतकेच काय, तर त्यांच्या निवृत्ती पूर्वीचा शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०१३ मध्ये याच मैदानावर झाला. मुंबईत सामना कोणताही असो, तिकीट मिळवण्यासाठी खूपच चुरस असते. याच क्रिकेट पंढरीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वानखेडेवर विनातिकीट सामना बघितला होता. सचिननेच ही आठवण वानखेडे स्टेडियमवर सांगितली. आपल्या वानखेडे स्टेडियमवरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सचिनने वानखेडे स्टेडियमवरील अनेक आठवणींना उजळा दिला. त्यावेळी त्याने एक गमतीदार किस्साही सांगितला. पुतळ्याच्या अनावरणावेळी सचिनला वानखेडे स्टेडियमवर पाहिलेला पहिला सामना आठवला. सचिन त्यावेळी दहा वर्षांचा होता. भारताने १९८३ मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करीत प्रथमच वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी सर्व भारतीयांना स्वप्नपूर्तीचा गगनचुंबी आनंद झाला होता. त्यानंतर प्रथमच वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यांचा मुंबईत सामना होता.

सचिन राहात होता त्या वांद्र्याच्या साहित्य सहवासमधील अनेक जण हा सामना बघायला आले होते. त्यांनी छोट्या सचिनलाही सोबत घेतले होते. त्यावेळी त्या सर्वांनी नॉर्थ स्टँडमधून ती मॅच पाहिली होती. हा सामना बघून परतताना स्टेडियममध्ये त्या सर्वांनी केलेल्या प्रवेशाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्यातील एक जण म्हणाला, झाले ना मॅनेज व्यवस्थित. त्याचे हे बोलणे बरोबर होते. कारण हे सगळे २५ जण होते आणि तिकिटे होती २४. त्या सर्वांनी कोंडाळे करीत त्यावेळी १० वर्षांच्या सचिनला लपवून आत नेले होते, अशी आठवण भारतरत्न सचिनने उपस्थितांना सांगताच हशा पिकला. या सोहळ्यावेळी सचिन आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होता. हा क्षण कायम स्मरणात राहण्यासारखाच असून वानखेडेवर त्याने अनेक सुखद क्षण अनुभवले आहेत.

१९८७च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी तो १४ वर्षांचा होता. त्यावेळी ‘बॉल बॉय’ म्हणून त्याची निवड झाली होती. तेव्हा सुनील गावस्कर यांनी सचिनला वानखेडे स्टेडियमची ड्रेसिंग रूम दाखवली होती. याच स्टेडियममध्ये मुंबईसाठी सचिन खेळला आणि रणजी करंडकही त्याने जिंकला. याच मैदानावर भारताने २०११मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता व त्या टीममध्ये सचिनही होता. तसेच २०१३मध्ये कारकिर्दीतला शेवटचा सामनाही याच मैदानावर खेळला. या सर्व आठवणींचा पट त्याने यावेळी उलगडला. वांद्र्याचे एमआयजी मैदान, शिवाजी पार्क, आझाद मैदान, क्रॉस मैदान अशा सर्वच मैदानांवर सचिनची बॅट तळपली आहे. या मैदानांवर एकावेळी अनेक सामने सुरू असतात आणि नेमका खेळाडू कोणत्या संघातील आहे व चेंडू नेमका कोणी फटकावला आहे, कोण तो पकडण्यासाठी धावतोय हे काहीच कळायचे नाही. अशा लहान-मोठ्या खेळपट्ट्या गाजवून सचिन क्रिकेट विश्वाचा बादशहाच बनला, क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनला. ‘सचिन’, ‘सचिन’ नावाचा जयघोष वानखेडे स्टेडियमने अनेकदा अनुभवला. आता या स्टेडियममध्ये सचिनचा पूर्णाकृती पुतळा हा सर्वांसाठीच प्रेरणा देणारा ठरणार आहे.

नगरचे सुप्रसिद्ध कारागीर प्रमोद कांबळे यांनी सचिनची ही प्रतिमा साकारली आहे. काशाचा हा पुतळा २२ फुटांचा आहे. क्रिकेटप्रेमींना वेड लावणारा षट्कार ठोकणारा सचिन यात दिसतो. कांबळे यांनी या पुतळ्यावर काम सुरू करण्यापूर्वी सचिनची भेट घेतली आणि हा पुतळा उभा हवा, की खेळतानाच्या पवित्र्यात हवा याबद्दल विचारले.

सचिनने ‘खेळतानाच्या सचिन’ला पसंती दर्शवल्यानंतर कांबळे यांनी त्यांच्या असंख्य ‘ॲक्शन पोजेस’चे फोटोज, व्हीडिओज यांचा अभ्यास केला आणि शेवटी ‘लॉफ्टेड ड्राइव्ह ॲक्शन पोज’ची निवड केली. त्यानंतर कांबळे यांनी या पुतळ्याची अनेक छोटी मॉडेल्स तयार केली, त्यावर चर्चा झाल्या आणि शेवटी चकाकत्या काशाचा हा पुतळा आकाराला आला. आधी हा पुतळा मुंबई क्रिकेट संघटनेच्या क्लबमध्ये उभारण्याची योजना होती; पण या क्लबमध्ये फक्त निवडक सदस्यांनाच प्रवेश असल्याने हा पुतळा सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना पाहता येणार नाही, ही गोष्ट संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिली आणि हा पुतळा नंतर स्टेडियमच्या आत लावण्याची सूचना केली. या सूचनेचे स्वागत झाले व खुद्द सचिननेही त्याला होकार दिला आणि आता हा ‘सचिन’ दिमाखात वानखेडे स्टेडियममध्ये उभा आहे. वानखेडे स्टेडियम सचिनने अनेकदा दणाणून सोडले आहे. त्याचे कार्यक्रमासाठी आगमन होताच ढोलताशांचा गजर करण्यात आला.

पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होताच पुन्हा स्टेडियममध्ये ‘सचिन… सचिन…’चा जयघोषही झाला. क्रिकेटमध्ये दुसरा सचिन होणे नाही, असे सर्वचजण म्हणतात. पण आता दुसरा ‘सचिन’ पुतळ्याच्या रूपात या स्टेडियममध्ये अवतरला आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव आहे. ज्या स्टेडियममध्ये सचिनच्या वाट्याला अनेक भाग्याचे क्षण आले, त्याच मैदानात तो आता पुतळ्याच्या रूपाने कायम राहणार आहे. हा अजब सोहळा, क्रिकेटच्या ‘देवा’ने याचि देही, याचि डोळा पाहिला’. असा क्षण साक्षात देवांनाही अनुभवना आला नसणार हे नक्की.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -