Dnyaneshwari : रसमयी ज्ञानेश्वरी

Share
  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

माणूस म्हणून कसं असायला हवं, त्याचबरोबर कसं असू नये हे ज्ञानदेव अगदी समजण्यास सोप्या, सहज शब्दांत ज्ञानेश्वरीतून सांगतात. भगवद्गीतेत सांगितलेल्या गुणांचं वर्णन माऊली त्यांच्या पद्धतीने रंग भरून त्यातले ‘ज्ञान’ सहज आणि रसाळ करून अधिक स्पष्टपणे मांडतात. त्यातून शिकवण अगदी स्पष्ट होते.

गुरू म्हणून ज्ञानदेवांविषयी काय बोलावं? किती बोलावं? ते अपुरंच होईल, असा अनुभव ‘ज्ञानेश्वरी’ वाचताना नव्हे, ‘अनुभवताना’ येतो. सद्गुरू काय करतो? शिष्याच्या मनातील अज्ञान, अंधार दूर करतो. ते करताना ‘काय करावं’ हे तो सांगतो. मुख्य म्हणजे ‘काय करू नये’ हेदेखील सांगतो. ज्ञानदेव गुरू म्हणून असे ‘आदर्श’ आहेत. उपदेश करताना ते एकामागून एक दाखले, उदाहरणं देतात. हे दाखले इतके अर्थपूर्ण असतात की, त्यातून शिकवण अगदी स्पष्ट होते. विशेष म्हणजे हे दाखले ही सुंदर चित्रं आहेत. पण गरज पडेल तिथे अगदी कुरूप, नकोशी वाटणारी चित्रंदेखील आहेत. मात्र ती पाहताना मनात शिकवण ठसते आणि कलेचा आनंदही मिळतो. याची अनुभूती देणाऱ्या तेराव्या अध्यायातील काही ओव्या आज पाहूया.

ज्याला ज्ञानप्राप्ती झाली आहे, त्या माणसाच्या ठिकाणी काही गुण असतात, ते कोणते ते यात सांगितले आहेत. जसे की अहिंसा, मनाची स्थिरता इत्यादी. भगवद्गीतेत सांगितलेल्या या गुणांचं वर्णन ज्ञानदेव अधिक स्पष्टपणे करतात. शिवाय त्यात त्यांच्या पद्धतीने रंग भरतात. त्यापैकी ‘शुचिता’ म्हणजे ‘पावित्र्य’ या गुणाचं वर्णन बघूया.

‘कापूर आतून बाहेरून शुद्ध असतो, तसे ज्याचे शुचित्व स्वच्छ दिसते, तेच ‘पावित्र्य’ होय.’
मूळ ओवीतून यातील सुंदरता अधिक जाणवते.
‘म्हणे शुचित्व गा ऐसें। जयापाशीं दिसे।
आंग मन जैसें। कापुराचे॥’ ओवी क्र. ४६२
अहाहा! किती अप्रतिम उपमा आहे ही!

ज्याचं अंग आणि मन कापराप्रमाणे शुद्ध आहे. आपल्या नजरेसमोर येतो तो पांढराशुभ्र कापूर! देवाच्या पूजेत वापरला जाणारा. त्याचा रंग शुभ्र आणि गंधानेही मनात शुद्धता जागते. अशा कापराप्रमाणे आतून आणि बाहेरून शुद्ध असलेला माणूस! यानंतरही दाखले येतात ते अगदी साजेसे. जसे की रत्न व सूर्य यांचे! रत्नाप्रमाणे, सूर्याप्रमाणे आतून बाहेरून लखलखीत असा असतो ‘शुचिता’ गुण असलेला माणूस!

त्यानंतर ज्ञानेश्वर सांगतात ‘आतून शुद्ध नसलेल्या पण वरकरणी शुद्ध कर्म करणाऱ्या माणसाविषयी!’ म्हणजेच ते चांगल्याबरोबर वाईट गोष्टीचंही चित्र मांडतात.

पाहूया त्यासाठी ज्ञानदेवांनी योजलेल्या कल्पना!
‘ज्याप्रमाणे प्रेतावर दागिने घालून त्याला शृंगारावे किंवा गाढवास तीर्थात न्हाऊ घालावे किंवा कडू दुधी भोपळा गुळाने माखावा, त्याप्रमाणे वरकरणी कर्म करणाऱ्याची स्थिती आहे.’
ही मूळ ओवी अशी –
‘मृत जैसा शृंगारिला। गाढव तीर्थीं न्हाणिला।
कडु दुधिया माखिला। गुळे जैसा॥’ ओवी क्र. ४७०
किती सोपे, साजेसे दाखले देतात ज्ञानदेव! त्यामुळे विचार अगदी स्पष्ट होतो.

दागिने शरीरावर घातले जातात. त्याने शरीराची शोभा वाढते हे खरं. पण त्या शरीरात चैतन्य नसेल, तर काय उपयोग त्या दागिन्यांचा?

प्रेत, गाढव आणि भोपळा असे तीन प्रकारचे दाखले देऊन ज्ञानेश्वर समजावतात. आतून एखादी गोष्ट चांगली नाही, तर वरून केलेल्या कोणत्याही गोष्टीला अर्थ नाही. म्हणजेच आतून आणि बाहेरून शुद्ध असण्याचं महत्त्व ते पटवतात. त्यांनी त्यासाठी आधी अंतरंगातून शुद्ध असणाऱ्या वस्तूंचे दृष्टान्त दिले; जसे की कापूर, सोने, रत्न इत्यादी. नंतर आतून चांगल्या नसणाऱ्या गोष्टींचे दाखले दिले. माणूस म्हणून कसं असायला हवं, हे ज्ञानदेवांनी सांगितलं. त्याचबरोबर कसं असू नये, याचंही वर्णन केलं. त्यामुळे ते ज्ञान, तो उपदेश सगळ्यांना समजण्यास सोपा, सहज झाला आहे. ही ज्ञानेश्वरांची किमया –
‘ज्ञान’ सोपं करून समजावणं,
सहज करून सांगणं,
रसाळ करून मांडणं!

(manisharaorane196@gmail.com)

Recent Posts

मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…

13 minutes ago

ईडीची टांगती तलवार…

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…

19 minutes ago

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…

1 hour ago

साईबाबांच्या चरणी ६८ लाखांचा सुवर्ण मुकुट; श्रद्धेची भक्तिपूर्ण देणगी

दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…

2 hours ago

Star Pravah vs Sony Marathi : स्टार प्रवाह आणि सोनी मराठीमध्ये टक्कर!

'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…

4 hours ago

Nails : नखे ठरवतात तुम्ही किती वर्ष जगणार; जाणून घ्या कसं?

मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…

4 hours ago