
जालना: मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे (manoj jarange) यांनी अखेर मागे घेतले आहे. त्यांनी सरकारला २ जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत सरकारने सरसकट आरक्षण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. त्यामुळे त्यांनी तूर्तास तरी त्यांचे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाडा येथील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. मात्र इतर महाराष्ट्रातील मराठा समाजाचे काय? त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे सरकार जर यासाठी अधिकचा वेळ मागत असेल तर तो त्यांना देऊया. सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी तयार आहे. त्यांनी वेळ घ्यावा आणि आरक्षण द्यावे, असे जरांगे पाटील म्हणाले.
सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगे यांच्याकडे दोन महिन्यांचा कालावधी मागण्यात आला होता. मात्र जरांगे पाटील हे २४ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यावर ठाम होते. त्यानंतर शिष्टमंडळाने अधिक विनंती केल्यानंतर त्यांनी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. यावेळी जरांगे यांनी वेळ घ्या पण आरक्षण द्या, असे सरकारला स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी त्यांनी आंदोलकांना आपण उपोषण मागे घेत आहोत असे सांगितले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आवाहन केले की, आपल्याला लढाई जिंकायची आहे, ती जिंकणार. मी मराठ्यांचा अपमान होऊ देणार नाही. यावेळेस त्यांनी आंदोलकांना सरकारला वेळ द्यायची का असा सवाल केला. यावर सगळ्यांनी होकार दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.
मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ तसेच हिसांचारही झाला. सरकारडून मनोज जरांगे यांची समजूत काढली जात होती. मात्र त्याला यश मिळत नव्हते अखेर सरकारला जरांगे यांची समजूत काढण्यात यश मिळाले आहे.