Tuesday, March 18, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यघरोघरी नवदुर्गा खरंच पुजल्या का?

घरोघरी नवदुर्गा खरंच पुजल्या का?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

नवरात्रात सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीला खरंच तिच्या घरात कायमस्वरूपी देवीचा दर्जा, देवीसारखाच आदर मिळतोय का? हा आजच्या लेखामधील विचारमंथनाचा मुद्दा आहे. घरातील लक्ष्मीरूपी सुनेने, मुलीने, आईने, घरातील महिलेने प्रत्येक नवरात्र कशी व्यवस्थित साजरी करावी, त्यासाठी काय काय तयारी करावी, काय खरेदी करावी, कोणत्या रीतीभाती, कुलाचार, कुलधर्म, पूर्वांपार चालत आलेल्या पद्धती पाळाव्यात, सगळ्या कुटुंबात कसं मिळून- मिसळून हा सण साजरा करावा याबाबत तिला अनेक उपदेश केले जातात आणि अपेक्षादेखील ठेवल्या जातात. अगदी एका वर्षाच्या लहान कुमारिकेपासून ते वयस्कर महिलेपर्यंत प्रत्येक स्त्रीला वंदन करणारं हे नवरात्र. हे सर्व करण्यासाठी, अमलात आणण्यासाठी घरोघरी लेकी – सुना काटेकोर नियम पाळणे, अहोरात्र मेहनत घेणे, देवीच्या कृपेने, आशीर्वादाने तरी आपल्या आयुष्यातील दुःख कमी होतील या भाबड्या अपेक्षेने स्वतःची प्रचंड धावपळ, दगदग करत असतात. आपल्या प्रापंचिक प्रश्नांतून मार्ग काढण्यासाठी, मुलाबाळांसाठी, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी अत्यंत मनोभावे स्वतःला दहा दिवस देवीच्या सेवेत झोकून देतात.

घरोघरी अतीव आनंदाने, उत्साहाने, श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जाणारा हा सण. खासकरून स्त्री शक्तीला अभिवादन करणारा, स्त्री शक्तीचा महिमा वर्णन करणारा आणि स्त्रीला देवीचे रूप समजून तिचा आदर, पूजा-अर्चना करण्याचे दिवस. नवरात्र म्हणजे घरगुती स्वरूपातच नाही तर सामाजिक स्तरावरदेखील, मंडळांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, स्पर्धा, दांडिया, होम-हवन, पूजा-पाठ यामुळे वातावरण चैतन्यमय झालेले असते. या नऊ दिवसांत प्रत्येकाला जाणीव होते की, स्त्री शक्ती आहे, स्त्री भक्ती आहे, स्त्रीला नाना उपमा, उपाध्या देऊन तिला विविध पुरस्कार, विविध सन्मान बहाल केले जातात. स्त्रीचे महात्म्य सांगणारे भाषण प्रत्येक पुरुष या कालावधीमध्ये करत असतो. पण प्रत्येक पुरुष व्यासपीठावर त्याच्या भाषणात स्त्रीबद्दल जे बोलतो तसेच त्याच्या घरात तो वागतो का? हा खूप मोठा मजेशीर विषय आहे.

अतिउत्साहाने, हसतमुखाने महिलादेखील सर्व कार्यक्रमात हजेरी लावतात. स्वतःमधील आत्मविश्वास पुन्हा रिचार्ज होतो, पुन्हा नव्याने स्त्री कामाला लागते. याबरोबरच घरोघरी घटस्थापना, त्यामधील शास्त्रीय विधि, विविध रंगांच्या साड्या, दागदागिने परिधान करणे, गरबा खेळणे, त्यात फोटो सेशन, सेल्फीचा आनंद घेणे, उपवास करणे, यथाशक्ती देवींची साधना करणे यातदेखील ती स्वतःला गुंतवून घेते. कुठेतरी स्वतःचा मानसिक त्रास, नैराश्य, अपमान, अवहेलना लपविण्यासाठी, स्वतःची कर्म कहाणी जगाला दाखवून आणि सांगून तरी काय उपयोग या भावनेतून ती सुद्धा मुखवटा धारण करून रंगमंचावरील कलाकार बनून जाते. खोलवर विचार केला तर, नवरात्रात बहुतांश जणी हाच विचार करत असतात की, निदान आता तरी आपल्या प्रापंचिक परिस्थितीमध्ये काही चांगला, सकारात्मक बदल होईल, आपल्या अडचणी दूर होतील, आपल्या घरात आपल्याला मान सन्मान मिळेल, गृहकलह थांबतील, वाद मिटतील, आपल्या नवऱ्याला, सासरच्यांना आपली जाणीव होईल, आपल्याला नवऱ्याचे प्रेम मिळेल, सासरी होणारा मानसिक त्रास थांबेल. अनेक महिला अशी भाबडी अशा मनात ठेऊन सर्व कार्यक्रम यथासांग पार पाडताना दिसतात. अनेकजणी मनोमनी देवीला तसा नवस बोलतात, साकडं घालतात. अनेकजणी नवरात्रात मनातलं दुःख आणि डोळ्यांतील पाणी न दाखवता रोजच्या रंगांशी स्पर्धा करत, स्वतःचे फोटो सामाजिक माध्यमातून शेअर करत या सणाचा आनंद घेताना दिसतात.

आजही अनेक घरांमध्ये महिलांप्रती अन्याय, अत्याचार, त्यांना वागवताना राक्षसी वृत्ती, रानटी विचार, घरातील सुनांना घरातून मिळणारी राक्षसी वागणूक ही व्यथा कायम आहे. तोच मानसिक, भावनिक, शारीरिक रूपाने छळणारा मनुष्यरूपी राक्षस जिवंत आहे. स्त्रीवर लादले जाणारे चुकीचे प्रसंग, तिच्या भावनांशी खेळणे, तिचा पदोपदी होणारा अपमान, तिला मिळणारा मनस्ताप आताही अस्तित्वात असल्याचे दिसते. स्त्री उच्चशिक्षित असो वा अडाणी, कमवणारी असो वा गृहिणी, गरीब असो वा श्रीमंत तिच्या वाटेला येणारी उपेक्षा काही कमी होताना दिसत नाही.

स्त्रीचे बाह्य रूप तिने कितीही रंगीबेरंगी साड्यांनी, मेकअपने, भारी भारी फॅशन करून सजवले आणि मिरवले तरी तिचे अंतर्मन तितकेच प्रफुल्लित आहे का? ती आतूनदेखील तितकीच सुखी, समाधानी आणि आनंदी आहे का, हे तिला कोण विचारते? तिचा संसार तिच्या स्वप्नांना वाव देणारा आहे का? तिच्या घरात तिच्या संसारात तिची जागा काय आहे यावर कोण विचार करते? तिच्या मनातील सल समजून घेऊन त्यावर उपाय कोण करते? तिचा त्रास दूर करण्यासाठी पुढे कोण येते? आलेच कोणी पुढे तर त्याला कितपत यश येते? एक स्त्री म्हणून तिच्या आत्मसन्मानाची किंमत कोण ठेवते? तिच्या मतांना, निर्णयांना, भावनांना न्याय कोण देते? तिचा घरात अपमान होणार नाही, ती दुखावली जाणार नाही याची जबाबदारी कोण घेते? या प्रश्नांची जर अनेक महिलांनी मनापासून खरी खरी उत्तरे द्यायची ठरवली तर उत्तर कोणीच नाही, असेच येणार यात शंका नाही.

नवरात्र उत्सवात फक्त नावाला स्त्रीचे गुणगान गावून, तिचे कौतुक करून तूच कर्ती-धर्ती, तू गृहलक्ष्मी, तू सौभाग्यवती, तू धर्मपत्नी, तू शक्ती, तू महती अशी विविध लेबलं लावून महिलांना तिच्या दुःखाचा तात्पुरता विसर पडायला नक्कीच मदत होते; परंतु या तात्पुरत्या, वरवरच्या स्तुतीने तिच्या आयुष्यात आलेले नकोसे विषय, तिचा कौटुंबिक त्रास, तिच्या आयुष्यातील संघर्ष संपतो का? तिचे प्रापंचिक, वैयक्तिक ध्येय साध्य होते का? वरवर तिच्या मनावर केलेली ही मलमपट्टी खरंच तिच्या खोलवर अंतकरणात झालेल्या जखमा भरून काढू शकते का? तसे नसल्यासारखे वागत असाल तर नवरात्र करूच नका…

मुळात घरातील महिलांच्या या परिस्थितीला फक्त पुरुष जबाबदार कधीच नसतो, तर इतर महिला देखील एकमेकांना कमी लेखणे, घालून पाडून बोलणे, चहाड्या, चुगल्या करणे, एकमेकींची निंदा करणे यात आघाडीवर असतात. महिलाच महिलांना किंमत देत नाहीत. त्याच एकमेकींना समजून, सांभाळून घेत नाहीत. त्यांनाच एकमेकींबद्दल आपुलकी, प्रेम, आस्था नाही; तर कशाला करता नवरात्री मध्ये उपवास? घरातल्या लेकी – सुनांच्या डोळ्यांत जर तुमच्यामुळे पाणी येत असेल तर कशाला करता सकाळ, संध्याकाळ आरत्या? एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या वेदनेचे कारण बनत असेल, तिचा जीव रोज जळत असेल तर तुम्हाला देवी समोर केलेल्या होमाचे आणि त्यात जळणाऱ्या समिधांचे काय फळ मिळणार आहे?

एका बाजूला जप – तप, साधना, ध्यान – धारणा करायची आणि दुसऱ्या बाजूला घरातील स्त्रीचा अवमान करायचा यात महिलाच अग्रेसर असल्याचे दिसतात.  एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीबद्दल मनात तिरस्कार, राग, चीड, द्वेष, सूड भावना, चुकीचे विचार ठेऊन देवीला कितीही पूजले तरी देवी कधीच प्रसन्न होणार नाही. देवी तुमच्या घरात फक्त नऊ दिवस नाही तर वर्षभर आहे. चोवीस तास आहे, जी तुमची सून आहे, लेक आहे, बहीण आहे. पण आपल्या संकुचित वृत्तीला हे वास्तव स्वीकारायचे नाही. एकमेकींना दोष देणाऱ्या महिला, एकमेकींवर आरोप करणाऱ्या महिला पहिल्या की असे वाटते खरंच यांना दुर्गा, सप्तशती किंवा देवी महात्म्य समजलं आहे का? निदान त्यांनी ते खरेच मनःपूर्वक वाचून अभ्यासले आहे का?

या नवरात्रात आपण हा विचार जरूर करावा की आपल्या घरातील कोणतीही स्त्री जर अंतःकरणातून सुखी, समाधानी नसेल, फक्त तडजोड म्हणून आयुष्य जगत असेल, तिला तिचे अस्तित्व नसेल, तिचे मन मारून ती दुःख पचवत असेल, ती तिच्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित असेल, तिला तिचे स्थान मिळत नसेल तर आपण नवरात्रात कितीही वेळा कितीही देवींची पूजा, उपवास, साधना आणि प्रार्थना केली तरीही देवी आपल्याला इच्छित फळ देईल का? ती आपल्याला शुभ आशीर्वाद देईल का? आपल्या घरातील दैवी शक्तीला म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीला अंधारात ठेऊन, त्रासात ठेऊन आपण देवीच्या मूर्तीसमोर कितीही दिवस दिवा जाळला तर आपल्या आयुष्यात प्रकाश पडेल का? या विषयावर विचार होणे अपेक्षित आहे.

आज कलियुगात स्त्रीला देवी म्हणून नाही, पण निदान माणूस म्हणून वागणूक मिळणे आवश्यक आहे असे वाटते. निदान प्रत्येक स्त्रीला तिचे मूलभूत हक्क, अधिकार मिळतील, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून तिला तिच्या नात्याप्रती असलेले अस्तित्व मिळेल, ओळख मिळेल, मानसन्मान मिळेल इतका प्रयत्न आपण करू शकतो. कोणत्याही स्त्रीचा अवमान होणार नाही, ती आपल्यासोबत सुरक्षित राहील, तिला कधीच आत्महत्या करावीशी वाटणार नाही, ती एकटी पडणार नाही, तिला कधीच आयुष्याचा कंटाळा येणार नाही, तिची घुसमट होणार नाही यासाठी आपण नवरात्रीच नव्हे यापुढे कायमच प्रयत्न करूयात. कोणत्याही स्त्रीला लाचारी पत्कारावी लागणार नाही, हतबल व्हावे लागणार नाही, मजबुरीमुळे कोणत्याही स्त्रीला तिच्या चारित्र्याशी तडजोड करावी लागणार नाही, समाज तिच्या दुःखाचे भांडवल करून तिचा गैरफायदा घेणार नाही, तिच्यावर होणारे शारीरिक, मानसिक बलात्कार थांबतील, तिची पिळवणूक, फसवणूक थांबेल, तिच्यावर होणारे प्राणघातक हल्ले बंद होतील, तिला खोटं आमिष दाखवले जाणार नाही, या सर्व बाबींची दखल घेऊन जर आपण काम केलं तर निश्चितच ती आदिमाया, आदिशक्तीची खरी पूजा असेल आणि त्यातून आपल्याला प्रसादरूपी जो आशीर्वाद मिळेल तो नक्कीच आपले कल्याण करेल.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -