ड्रग्जचा शोध सुरु
देवळा : लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात ड्रग शोधण्यासाठी मुंबई पोलीस आज रविवारी दि २९ रोजी पुन्हा दाखल झाले आहेत. साकी नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदे सह पथकाने लोहोणेर येथील स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने गिरणा नदीत ड्रग शोध मोहीम सुरू केली आहे. नदीला पाणी कमी झाल्याने ही शोध मोहीम पुन्हा सुरू केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. याकामी पोलिसांनी स्थानिक नागरिकांची मदत घेतली असून, त्यांच्या हाती काही मिळून येते का याची उत्सुकता आहे .
ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा साथीदार चालक संशयित सचिन वाघ याला अटक करून त्याची चौकशी केल्यानंतर मुंबई पोलिसांना देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथे ड्रग्ज लपवल्याची त्याने कबुली दिली होती. लोहोणेर येथील गिरणा नदी पात्रात ड्रग्ज नष्ट केल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे मंगळवार, दि २४ ऑक्टोबर रोजी साकी नाका पोलिसांनी सरस्वतीवाडी ता. देवळा येथे धाड टाकून वाघ याच्या दुसऱ्या साथीदाराकडून तेरा ते चौदा किलो ड्रग्ज ताब्यात घेतले होते. त्याने सरस्वतीवाडी येथील डोंगराच्या टेकडीवर असलेल्या झुडपांमध्ये खड्डा खोदून त्यात कोट्यवधी रुपयांचा माल पुरुन ठेवला होता.
उर्वरित माल गिरणा नदी पात्रातील पाण्यात फेकून दिल्याचे संबंधिताने कबूल केल्याने त्यावेळेस पहाटे साडे तीन वाजेपासून गिरणा नदी पात्रातील पाण्यात रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मात्र त्यांना गिरणा नदी पात्रात नष्ट केलेला माल आढळून आला नाही .
ललित पाटील यांचा चालक सचिन वाघ हा देवळा तालुक्यातील वाखारी पिंपळगाव येथील रहिवासी आहे. तर सरस्वतीवाडी येथील संशयित वाघ याचा मित्र असल्याचे सांगण्यात येते आहे. साकी नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही शोध मोहीम पुन्हा राबविण्यात आली.