नाशिक : मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या मराठ्यांनी आता आमरण उपोषण करावे, या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकचे अखंडित साखळी उपोषणकर्ते नाना बच्छाव हे आता आमरण उपोषणाला बसणार आहेत.
सकल मराठा समाजाचे नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या ४५ दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणकर्त्यांच्या वतीने आज दि. २८ रोजी उपोषण स्थळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांची खालावती प्रकृतीस पूर्णपणे राज्य व केंद्र सरकार जबाबदार आहेत, शहरात गाव खेड्यावर मराठा समाज अत्यंत संतप्त असून आरक्षण देण्यात सरकार कसूर करीत असल्याने मराठा युवक आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे, दोन दिवसात ७ युवांनी जीवन संपवले तरी सरकारचे डोळे उघडत नाही हे दुर्दैव आहे, असे नाना बच्छाव यांनी सांगितले. तसेच गाव शहरात मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी असतांना आमदार खासदार मंत्र्यांनी नाशिक शहर व गावात कुठलाही कार्यक्रम घेऊ नये. काही विपरीत घडल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असे बच्छाव म्हणाले.
यावेळी मराठा आंदोलक राम खुर्दळ म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाच्या वाढलेल्या आत्महत्या उघड्या डोळ्याने बघणाऱ्या असंवेदनशील सरकारचा धिक्कार आहे. मराठा समाजाला ४० वर्षे आरक्षणा पासून वंचित ठेवणाऱ्या सरकारने मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा अन्न-पाणी सोडायला लावले हे दुर्दैवी आहे. मनोज जरांगे आमचा मराठ्यांचा श्वास आहे. त्यांच्या प्रकृतीची जबाबदारी सरकारची आहे. मराठा तरुणांनी लढाई जारी ठेवा आत्महत्या करू नका, असे आवाहन त्यांनी केले. तर शिव व्याख्याते नितीन डांगे पाटील यांनी सांगितले की, गुणरत्न सदावर्ते हे मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. सातत्याने मराठा समाजाविरोधात गरळ ओकणारा सदावर्तेचे रखवालदार कोण? हे सर्वांना ज्ञात आहे. कुठल्याही नेत्याने मराठ्यांच्या गावबंदीला आव्हान देऊ नये. जे होईल त्यास सरकार जबाबदार, स्थानिक नेत्यांनी आपल्या नेत्याकडे जावं, गाव शहरात कार्यक्रम घेऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेत नाना बच्छाव, राम खुर्दळ, नितीन डांगे पाटील, प्रफुल्ल वाघ, स्वाती कदम, ऍड शीतल भोसले, संजय देशमुख, सचिन निमसे, रविंद्र बोचरे, गणेश पाटील, राज भामरे, महेंद्र बेहेरे, निलेश ठुबे, सोपान कडलग यावेळी सहभागी होते.