पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर
हांगझोऊ : चीनच्या हांगझोऊ (Hangzhou) येथे २२ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या चौथ्या एशिनय पॅरा गेम्सची (Asian Para Games) आज सांगता झाली. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंतची सर्वात चमकदार कामगिरी केली आहे. भारताने १११ पदकांसह पदक तालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. भारताने २९ सुवर्ण पदके, ३१ रौप्य तर ५१ कांस्य पदके पटकावली. एखाद्या मोठ्या स्पर्धेत केलेली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
भारताने आशियाई पॅरा गेम्ससाठी १९१ पुरुष आणि ११२ महिला अशा प्रकारे एकूण ३०३ खेळाडूंना पाठवले होते. ज्यामुळे १११ पदकांची कमाई हा भारतासाठी खूप मोठा विजय आहे.
नुकत्याच २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने १०७ पदकांची कमाई केली होती. मात्र, आता यालाही मागे टाकत भारताने १११ पदके कमावली आहेत. तर यापूर्वी भारताने २०१८ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये ७२ पदकांचा विक्रम केला होता, यावर आता भारताने मात केली आहे.
नेहमी आघाडीवर राहणारा चीन यावेळेही एशियन पॅरा गेम्समध्ये पहिल्या स्थानावर आहे. चीनने २१४ सुवर्ण, १६७ रौप्य आणि १४० कांस्य पदकांसह सर्वाधिक ५२१ पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. पदक तालिकेत इराण ४४ सुवर्ण, ४६ रौप्य आणि ४१ कांस्य अशी एकूण १३१ पदके जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. तर जपानने ४२ सुवर्ण, ४९ रौप्य आणि ५९ कांस्य पदके जिंकत तिसरे स्थान पटकावले आहे. कोरियाने ३० सुवर्ण, ३३ रौप्य आणि ४० कांस्य पदके जिंकत चौथे स्थान मिळवले आहे.