Dnyaneshwari : मन जाणणारे माऊली...

  192


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


अर्जुनाच्या मनात शिरून जणू ज्ञानदेव ओवी लिहितात असं वाटावं! ज्ञानदेवांच्या यातील ओव्या केवळ अर्जुनापुरत्या नाहीत आणि त्या त्या प्रसंगापुरती मर्यादित नाही. तर माऊलींनी साकारलेला अर्जुन आपल्या मनातील दुबळेपणावर स्वार होऊन पुढे जातो. आपल्यालाही प्रेरणा देतो. ज्ञानदेव अर्जुनाच्या मनातली अस्वस्थता, बैचेनी, परिवर्तन हे सारे टप्पे मांडतात. म्हणून अर्जुन आपल्याला जवळचा वाटतो.


'साक्षात देवांचं विश्रांतीस्थान’ असं म्हणून ज्ञानदेवांनी अकराव्या अध्यायाची महती सांगितलेली! या अध्यायाचा विषय आहे ‘विश्वरूप दर्शन’!



श्रीकृष्णांचा लाडका भक्त आहे अर्जुन! त्याला देवांनी स्वतःच्या विविध रूपासंबंधी सांगितलं. ते ऐकून त्याच्या मनात आस निर्माण झाली की, हे विश्वरूप देवांनी दाखवावं. आपण ते स्वतः डोळ्यांनी पाहावं.
अर्जुनाच्या मनात एकीकडे खूप इच्छा हे विश्वरूप पाहण्याची! दुसरीकडे मनात विचार, हे आपण त्यांना कसं सांगावं बरं? अर्जुनाच्या मनातील हे विचार, हे द्वंद्व ही ज्ञानदेवांची कल्पनाशक्ती! आपल्या प्रतिभेने ते अर्जुनाची अवस्था अशा बहारीने मांडतात. याचा अनुभव देणाऱ्या या अजोड ओव्या अशा -
‘तो मनात म्हणतो - पूर्वी कोणत्याही आवडत्या भक्ताने जे कधीही पुसले नाही, ते विश्वरूप मला दाखवा असे एकाएकी मी कसे म्हणू? ओवी. क्र. ३१
म्हणे मागां कवणीं कहीं।
जें पढियंतेनें पुसिलें नाहीं।
तें सहसा कैसें काई। सांगा म्हणों॥ ओवी क्र. ३१



हे म्हटलं तर श्रीकृष्णांविषयी अर्जुनाचं मनोगत आहे, पण खरं तर ते कोणाही माणसाचं मनोगत होऊ शकतं. अनेकदा आपण पाहतो, एखादी गोष्ट मिळण्याची इच्छा आपल्याला असते. पण ज्याच्याकडून ती हवी असते, तो माणूस आपल्यापेक्षा खूप मोठा असेल तर मनात घालमेल होत असते. माणसाच्या मनातले हे भाव-स्वभाव ज्ञानदेव कसे अचूक टिपतात!



पुढे अर्जुनाविषयी ज्ञानदेवांची ओवी येते. ‘मी जरी देवांच्या विशेष स्नेहांतला आहे, तरी यशोदेपेक्षा का यांचा जीवलग आहे? पण तीदेखील हे विचारावयास भ्यायली.’ (ओवी क्र. ३२) अर्जुनाच्या मनातील हे विचार ज्ञानदेव चढत्या क्रमाने रंगतदार करून मांडतात.



‘मी जरी यांची हवी तेवढी सेवा केली असली तरी माझ्याने गरुडाची बरोबरी करवेल का? पण त्या गरुडानेही या विश्वरूपाचे नाव काढले नाही.’ (ओवी क्र ३३)



‘गोकुळीच्या भाविक गोपगोपींनाही श्रीकृष्णाने आपले विश्वरूप दाखवले नाही’ असं पुढे अर्जुन म्हणतो.
श्रीकृष्णाच्या जवळचे म्हणून असणारे हे सारे - माता यशोदा, भक्त गरुड, सनकादिक, गोप-गोपी या साऱ्यांपासून गुप्त असलेली गोष्ट मला कशी पुसता येईल? असा विचार अर्जुन करतो.



इथे आपल्याला जाणवते मन रेखाटण्याची ज्ञानदेवांची प्रचंड प्रतिभा! श्रीकृष्णाला जवळची असणारी ही सारी मंडळी. त्यांची कल्पना, तुलना करणारा अर्जुन! हे सारे मनातले रंग रंगवणारे ज्ञानेश्वर! ज्ञानेश्वर अर्जुनाचंही मन जाणतात आणि श्रीकृष्णांचंही!



खरं नाट्य तर पुढच्या ओवीत! ‘बरं, पुसू नये तर विश्वरूप पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. इतकंच नव्हे तर मी जिवंत राहीन किंवा नाही हा संशयच आहे.’ ओवी क्र. ३७



अर्जुनाच्या मनात शिरून जणू ज्ञानदेव ही ओवी लिहितात असं वाटावं! ही ओवी केवळ अर्जुनापुरती नाही आणि ती या प्रसंगापुरती मर्यादित नाही.



माणूस म्हणून जगताना त्याच्या सोबत सतत काय असतं? तर ही लढाई, हे द्वंद्व! एखादी गोष्ट करावी की करू नये? ती योग्य की अयोग्य? माणसाचं मोठेपण त्यावर ठरतं की या लढाईला तो कसं तोंड देतो? आपला संकोच, भीड बाजूला करून तो यावर मात करतो की शरण जातो? अर्जुन आपल्या मनातील दुबळेपणावर स्वार होऊन पुढे जातो. आपल्यालाही तो प्रेरणा देतो ‘याच प्रकारे जगण्यासाठी, झुंज देण्यासाठी!’ ही शक्ती भगवद्गीतेची, व्यासांच्या प्रतिभेची, ज्ञानदेवांच्या प्रतिमेची! विशेष म्हणजे ज्ञानदेव अर्जुनाच्या मनातली अस्वस्थता, बेचैनी, परिवर्तन हे सारे टप्पे मांडतात. म्हणून तो अर्जुन आपल्याला जवळचा वाटतो. इतकंच नव्हे तर ‘आपणच’ वाटतो. मग त्या दिव्याच्या प्रकाशात आपणही वाट चालू लागतो ‘अंधारातून प्रकाशाकडे’ ‘अज्ञानातून ज्ञानाकडे’!



(manisharaorane196@gmail.com)


Comments
Add Comment

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव आणि मोदकांची गोड परंपरा! बाप्पासाठी १० दिवस १० प्रकारचे हटके मोदक बनवा, ही सोपी रेसिपी पहा

गणेश चतुर्थी म्हटली की महाराष्ट्रात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा सोहळा सुरू होतो. हा केवळ धार्मिक सण नसून, प्रत्येक

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला ‘या’ राशी आहेत सर्वाधिक प्रिय, त्यांना मिळणार गुडन्यूज

मुंबई: गणेश चतुर्थी हा सण लवकरच येत आहे आणि देशभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

Ganpati Arati : सुखकर्ता, दु:खहर्ता...! गणेशोत्सवात घर दुमदुमवणाऱ्या लोकप्रिय ५ आरत्या

१. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! या सोप्या पद्धतीने करा बाप्पाची प्राण प्रतिष्ठा, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या

मुंबई : गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण