Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखड्रग्जमुक्त महाराष्ट्र करा; तरूण पिढीला वाचवा...

ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करा; तरूण पिढीला वाचवा…

ड्रग्ज, अमली पदार्थ, नशा! हे असे शब्द आहेत, ज्यामध्ये सध्याची अर्ध्याहून अधिक तरुणाई अडकलेलीस दिसते. ड्रग्जवर बंदी असतानाही देशभरातून ड्रग्जचे साठे मोठ्या प्रमाणात जप्त होताना दिसत आहेत. या ऑक्टोबर महिन्यात नाशिक रोड येथील एका गोदामावर धाड टाकून ५ कोटींचे एमडी व इतर रसायन जप्त करण्यात आले आणि पुन्हा एकदा ड्रग्जबाबतची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. ड्रग्जमाफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटीलचा नाशिकमध्ये कारखाना होता. त्यानंतर या कारखान्यातून पोलिसांनी ३०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणात कोणाकोणाचे लागेबांधे आहेत यावरून राजकीय चिखलफेक झाली असली, तरी एवढा मोठा ड्रग्जचा साठा तयार केला जातो. याचा अर्थ मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार ड्रग्जला तरुणाईकडून मोठी मागणी आहे ही बाब लपून राहिलेली नाही. त्याचबरोबर या ड्रग्जच्या अतिसेवनामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे, अशी पोलिसांची माहिती आहे.

अमली पदार्थांच्या विळख्यात तरुण सहजपणे फसतात. एकदा का अमली पदार्थांची चटक लागली की, ती सवय बनायला वेळ लागत नाही. अमली पदार्थांचा प्रसार रोखला नाही, तर आपली अख्खी एक पिढी उद्ध्वस्त होऊ शकते. कोणत्याही दुष्परिणामांची आणि मृत्यूची फिकर विसरायला लावणाऱ्या अमली पदार्थांचे सेवन सतत केल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ज्या पदार्थाच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्यांना अमली पदार्थ म्हणतात. अफूपासून मोर्फिन, हेरॉइन आदी नशिले पदार्थ तयार केले जातात. कोकेन, भांग, गांजा, चरस यांचा मादक पदार्थांमध्ये समावेश होतो. तरुणाईला अमली पदार्थांच्या नशेचे आकर्षण वाटण्याचे पहिले कारण म्हणजे त्यांचा वयोगट. तारुण्याच्या या काळामध्ये काही तरी थ्रिलर करावे, अशी इच्छा खूप प्रबळ बनलेली असते. लोकांमध्ये आपले आकर्षण वाटावे यासाठी अनेक तरुण थ्रिलर गोष्टी करताना दिसतात. अशा थ्रिलिंगची प्रचंड क्रेझ असणाऱ्या वयात शरीरामध्ये एखादा अमली पदार्थ गेल्यास आपण जगापेक्षा कुणीतरी वेगळे आहोत, अशी भावना या तरुणांमध्ये निर्माण होते. भारतात अमली पदार्थाच्या विळख्यात १४ ते २२ वयोगटांतील तब्बल ४० टक्के तरुण असल्याची आकडेवारी पुढे येते.

नव्या अघोरी आनंदाच्या शोधात असणारे गर्भश्रीमंत, निराशा व वैफल्यग्रस्तता विसरण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असलेले, मध्यमवर्गीय-गरीब युवक अमली पदार्थांच्या सेवनाच्या जाळ्यात ओढले जातात. अशा युवकांना पुन्हा योग्य मार्गावर आणणारा नातेवाईक व मित्र मिळाला नाही, तर त्यांचे जीवन वाया जाते. तरुणांना या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी नागपूर शहरात एक वर्षापूर्वी गुन्हे शाखा विभागामार्फत विशेष मोहीम राबविली गेली. पोलीस प्रशासनाद्वारे उपाययोजना करण्यात आल्या. याबाबत राज्य व जिल्हास्तरीय समिती सुद्धा गठित करण्यात आली. त्यात पोलीस विभागासह महसूल, वन, सीमा सुरक्षा, राज्य उत्पादन, पोस्ट विभाग व अन्न व औषध विभागाचा समावेश होता. नागपूरप्रमाणे नंदूरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्हा अमली पदार्थमुक्त व्हावा यासाठी जी पावले उचलली आहेत ती स्वागतार्ह आहेत. राज्यातील अन्य शहरांतील पोलीस प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांनी अशा वेळी मुलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्याला विश्वासात घेतले पाहिजे. प्रेमाने, समजूतदारपणे या आजारातून त्याला बरे होण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. समुपदेशक, व्यसनमुक्ती इच्छुक समूह, वैद्यकीय तज्ज्ञ अशा टीमची निर्मिती करून आठवड्यातून एकदा समूह चर्चा करण्यासाठी मदत केंद्रे उभारली जाणे आवश्यक आहे. समाजाने अशा मुलांची अवहेलना न करता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. मुलांना दलदलीत न ढकलता हात देऊन खेचून त्यातून बाहेर काढायला पाहिजे. पंचकर्म, रसायन, वनौषधी यांचा व्यसनमुक्तीत वापर करून घ्यायला हवा. हॉलिस्टिक विचार महत्त्वाचा आहे. परिपूर्ण चिकित्सेचा शोध घ्यायला हवा.

समाजातून अमली पदार्थांच्या पुरवठ्याला प्रतिबंध घातला पाहिजे. त्यासाठी नार्कोटिक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट यासारख्या अमली पदार्थ विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. यावरती औषधे आहेत. मात्र व्यसन हे न सांगता किंवा लपवून दिलेल्या औषधाने सुटत नाही. याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे व्यसन वेगळे असू शकते. त्याचबरोबर आपली युवा पिढी व आपली जवळची माणसे या अमली पदार्थाच्या विळख्यापासून दूर राहावीत यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने शासनास सहकार्य तर केलेचे पाहिजे आणि जनजागृतीसाठी प्रत्येकाने आपला सहभाग देणे, ही काळाची गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -