
धरमशाला: भारतीय संघाला न्यूझीलंडचा विजयरथ रोखण्यात अखेर यश मिळाले आहे. भारताने विश्वचषकातील सलग पाचव्या सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने न्यूझीलंडला ४ विकेट राखत पराभूत केले.
न्यूझीलंड आणि भारत हे दोन संघ होते ज्यांनी या विश्वचषकात आतापर्यंत पराभव पत्करला नव्हता. मात्र अखेर भारताला न्यूझीलंडचा विजयीरथ रोखण्यात यश मिळाले आहे. यात विराट कोहीलच्या खेळीचा वाटा मोठा आहे.
न्यूझीलंडने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २७३ धावा केल्या होत्या. डॅरेल मिचेलने सर्वाधिक १३० धावांची खेळी केली होती. तर रचिन रवींद्रने ७५ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडचे सलामीवीर साफ अपयशी ठरल्याने रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी संयमी खेळी करताना न्यूझीलंडला अडीचशे पार धावसंख्या रचण्यात मोठा वाटा रचला होता.
भारताकडून मोहम्मद शमीने ५ गडी बाद न्यूझीलंडच्या संघाला मोठी खेळी करू दिली नाही. त्याचा हा विश्वचषकातील पहिलाच सामना होता.
कोहलीचे शतक हुकले
त्यानंतर भारतीय संघाने सावध सुरूवात केली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने ४६ धावा केल्या तर शुभमन गिल २६ धावा करून बाद झाला. गेल्या सामन्यात शतकी खेळी कऱणाऱ्या विराट कोहलीचे या सामन्यात शतक अवघ्या ५ धावांनी हुकले. त्याने १०४ बॉलमध्ये ९५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरही या सामन्यात तितकीशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने ३३ धावा फटकावल्या. यासाठी २९ बॉल घेतले. के एल राहुलने २७ धावा केल्या. रवींद्र जडेजा या सामन्यात ३९ धावांवर नाबाद राहिला. यासोबतच भारताने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.