सुट्टी असल्याने जरा आरामातच सगळं चालू होतं. उंबरठा चित्रपट पाहण्याचा मोह झाला. तो पाहिल्यानंतर, पुन्हा नव्याने स्त्रीची ओळख झाली. आजच्या स्त्रीने उंबराठा ओलांडून, क्षितिजापलीकडे जाऊन विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक दुर्गा आहे. प्रचंड क्षमता असून तितक्याच शांतपणे निर्णय घेणाऱ्या अशा या नवदुर्गा आपल्याला आसपासच भेटत असतात. आपल्या अचाट कार्यातून त्या समाजाला घडवण्याचं काम करतात.
घरी असताना दाराची बेल वाजली. मला वाटलं, यावेळी कोण सेल्समन आला. दरवाजा उघडते तर समोर पोस्टमन नव्हे चक्क पोस्टवूमन उभी होती. मला माझं महत्त्वाचं पार्सल देऊन ती निघू लागली. मी म्हटलं “तुम्ही कशा काय या क्षेत्रामध्ये? तुम्हाला बरेच फिरावे लागत असेल.” तर ती म्हणाली, “एवढं काही नाही, उलट मला हे काम फार आवडतं. सगळ्या घराघरात जाऊन प्रत्येक माणसाला त्यांचं महत्त्वाचं पत्र किंवा पार्सल देणं यात मला फार समाधान मिळतं.” कागदावर माझी सही घेऊन स्मितहास्य करून ती निघून गेली. एवढ्या उन्हात पायी चालून ती तिचं काम करत होती, तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ही पोस्टवूमन बघून तिच्यात मला एक दुर्गा दिसली.
एकदा पुण्यावरून परत येत असताना बसची वाट मी पाहत होते, तर ट्रकमधून एक महिला ट्रक ड्रायव्हर बाहेर पडताना मला दिसली. सर्व वाहनं एका हॉटेलजवळ थांबली होती. बरेच जण जेवायला बसले. त्यात ती टॅक्सी ड्रायव्हरही जेवणाची ऑर्डर करून जेवून निघू लागली. मला पाहत म्हणाली, “आज घटस्थापना असल्यामुळे बस मिळणं मुश्कील आहे म्हणून मी तुम्हाला सोडते मुंबईला.” माझी गरज बरोबर ओळखून तिने ताबडतोब मला मदत केली. तिच्यातही मला एक दुर्गा दिसली.
शाळेमध्ये मुलांना नेण्यासाठी व्हॅनवाले नेहमीच येत असतात; परंतु आज स्त्रिया टॅक्सी, रिक्षा चालवताना दिसतात. पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही आज स्त्रिया सहजपणे वावरताना दिसतात. त्याच्यात मला एक शक्तीचं रूप दिसतं.
आजही पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी करताना आपल्याला महिला पोलीस अधिकारी पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात.
माझं पासपोर्टचं काम होतं म्हणून मी पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा महिला पोलीस एका अन्यायग्रस्त स्त्रीला समजावत होती की, “तू अन्याय सहन करू नको तुझ्याबरोबर आम्ही आहोत. तुला जी पाहिजे ती आम्ही मदत करू.” स्त्रियांसाठी लढणाऱ्या महिला पोलीसमध्ये मला एका कालिका मातेचे दर्शन झालं.
आता तर स्त्रिया कॉर्पोरेट ऑफिसर सुद्धा झालेल्या आहेत. स्वतःचा व्यवसाय करून ते घर सांभाळतात आणि आता तर स्त्रियांनी भारतीय पारंपरिक पदार्थ असलेल्या रेस्टॉरंटची फ्रेंचायजी जगभर पसरवल्या आहेत. यांच्यामध्ये मला साक्षात देवी अन्नपूर्णा दिसते.
मराठी हिंदी चित्रपटात स्त्री लेखिका, दिग्दर्शिका यांनीही खूप वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यात मला देवी सरस्वतीचे रूप पाहायला मिळतं.
आज स्त्रिया विमानचालकही आहेत. तसेच निरजासारख्या एका एअर होस्टेसने विमानातल्या प्रवाशांचा बचाव करत अतिरेक्यांना लढा देत त्यांचं रक्षण केलं. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशसेवा करण्यासाठी ती पुढे आली. यात मला भवानी देवी दिसून आली.
अशा या नवदुर्गा आपल्याला समाजामध्ये सर्वत्र पाहायला मिळतात. स्वाभिमानाने स्वतःच्या बळावर या महिला यशस्वी झाल्या आहेत. आपल्या कुटुंबाची गरज तर ते भागवतातच; परंतु समाजाचही आपण देणे लागतो ही जाणीव उराशी बाळगून देशकार्य स्वीकारतात. देशाच्या विकासालाही हातभार लावतात.
अशा या सर्व क्षेत्रांतल्या नवदुर्गांना घरातून आणि समाजातून सन्मान मिळणं हा त्यांचा हक्क आहे. या सर्व नवदुर्गांना नतमस्तक होऊन मी एवढंच म्हणेन,
“पूजा आपल्या मातेला
हीच खरी देवीची आराधना
सन्मान द्या आपल्या भगिनीला
हीच खरी देवीची उपासना
रक्षण करूया स्त्रीचे
धैर्य उरी बाळगा
नको फक्त नऊ दिवस
देवीचा महिमा
आदर सन्मान कायमच
समस्त स्त्री जगताचा करा”
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…