हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर शनिवारी भीषण अपघात होऊन १२ जणांचा जीव गेला. त्यामुळे त्यावर राजकारण होणे हे अपरिहार्य होते आणि त्याप्रमाणे शिवसेना उबाठाच्या प्रवक्याने हा महामार्ग शापित आहे, वगैरे बाष्कळ बडबड केली. हे प्रवक्ते संपादक आहेत आणि एका पक्षाचे प्रवक्तेही आहेत. त्यामुळे ते आपल्या सोयीच्या भूमिका घेऊ शकतात. त्यातही विरोधी पक्षाचे असल्याने जबाबदारी कसलीच नाही. त्यामुळे वाट्टेल ती विधाने करून आचरटासारखे बोलायचे, हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे. ते असो. पण या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिले आहे, तो महामार्ग शापित आहे असे सांगून त्या बाळासाहेबांचा आपण अपमान करत आहोत, हेही या प्रवक्त्याच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे. पण या महामार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत आणि त्याची अनेक कारणे आहेत. त्याला सरकार किंवा शिंदे-फडणवीस हे मुळीच जबाबदार नाहीत, हे कोणाही सामान्य माणसाला कळते.
महाराष्ट्र महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, या महामार्गावर ११ डिसेंबर २०२२ पासून म्हणजे ज्या दिवशी महामार्गाच्या या पट्ट्याचे उद्घाटन झाले, त्या दिवसापासून ३० एप्रिल २०२३ पर्यंत ९८ अपघात झाले असून, त्यात २७ टक्के लोकांचे जीव गेले. हायवे हिप्नॉसिस नावाचा घटक मोठ्या प्रमाणात या अपघातांसाठी कारणीभूत आहे आणि या महामार्गावर कुठेही एक साधे हॉटेलही नाही की, ज्यामुळे चालकांचे लक्ष अन्यत्र विचलित होऊन त्याला विश्रांती वगैरे मिळेल. हेही एक कारण सांगितले जाते. आपल्या लोकांना चांगल्या दर्जाचे रस्ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यातूनच समृद्धी महामार्ग जन्माला आला आहे. आता त्याला शापित वगैरे म्हणणे म्हणजे आपण किती संकुचित दृष्टीचे आहोत, हेच दाखवणे आहे. आता अपघातावरून राजकारण करण्याचा प्रकार शिवसेना उबाठा गट करत आहे आणि त्यात ते बिलकुल कसर करत नाहीत. वास्तविक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कित्येक अपघात होत असतात आणि लोक त्यात मरत असतात. तेव्हा यशवंतराव चव्हाण हा शापित मार्ग आहे, असे कुणी म्हटलेले ऐकिवात नाही. पण बाळासाहेब ठाकरे मार्ग हा शिंदे-फडणवीस सरकारने बनवला असल्याने त्याचा राजकारणासाठी वापर करून घ्यायचा, हे फारच हीन दर्जाचे लक्षण आहे.
हायवे हिप्नॉसिस हा प्रकार काय आहे, याचे स्पष्टीकरण सांगणे आवश्यक आहे. चालक जेव्हा रस्त्यावर विनाव्यत्यय अनेक तास वाहन चालवत असतात, तेव्हा हा ‘हायवे हिप्नॉसिस’ नावाचा प्रकार मोटर वाहनचालक अनुभवतात. त्याचा अर्थ त्यांची नजर केवळ रस्त्यापुढे धावत असते आणि तिला दुसरे काहीही दिसत नाही. यातूनच मग अपघात घडतात. आपल्याकडे चालक हे कधीच प्रशिक्षित नसतात आणि रस्त्यावरील चालकांसाठी असलेल्या खुणांचा त्यांना अर्थही ठाऊक नसतो. अशा वेळी अपघात घडतातच. अमेरिकेसारखे रस्ते पाहिजेत, असे म्हणायचे आणि प्रत्यक्षात वाहनचालक मात्र अप्रशिक्षित घ्यायचे. यामुळे अपघात होणार नाही, तर अन्य काय होणार, ही समजण्यासारखी बाब आहे.
आंतरराष्ट्रीय रस्ते सुरक्षाविषयक मानकांसह हा महामार्ग उभारण्यात आला आहे, असे सांगण्यात येते. तरीही त्यावर होणारे अपघात हे अटळ आहेत आणि त्यासाठी सरकारला जबाबदार धरणाऱ्यांनी आपल्या सत्ता काळात कसे आणि कोणते अपघात झाले, हे आठवावे. आता कोस्टल प्रोजेक्ट हे शिवसेना उबाठा गटाच्या प्रमुखांचे स्वप्न आहे, असे म्हणतात. तो मार्ग अजून पूर्णही झालेला नाही तरीही त्यावर कित्येक दुर्घटना घडत असतात. मग तो मार्ग शापित आहे, असे म्हणायचे का? हा सवाल आहे. राजकारण म्हणून शिवसेना उबाठा गट असे विषय उकरून काढत आहे. पण त्यातून काहीही साध्य होणार नाही.
समृद्धी महामार्गावर अपघात होऊन बाराजणांचे जीव गेले हे निश्चितच वाईट आहे आणि ते आता काहीही केले, बोलले तरीही परत येणार नाहीत, हेही सत्य आहे. पण म्हणून महामार्ग जास्तीत जास्त सुरक्षित कसा होईल, या दृष्टीने त्यावर उपाययोजना काय केली पाहिजे, यावर प्रामुख्याने विचार केला पाहिजे. तसेच राजकारण न करता प्रत्येकाने आपल्याला जे काही सुचते ते सुचविले पाहिजे. सरकारनेही ते उपाय ताबडतोब अमलात आणले पाहिजेत. रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा केला जातो. त्याचा काहीतरी उपयोग व्हावा आणि लोकांनी या दिवसांत तरी रस्ते सुरक्षाविषयक सर्व नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा असते. वाहतूक शाखेने या पंधरवड्यात तरी आपले पैसे गोळा करण्याच्या लक्ष्यपूर्तीकडे लक्ष न देता वाहनचालकांच्या आणि वाहनांतील प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे.
या महामार्गाला शापित वगैरे न म्हणता त्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेविषयक ज्या चिंता उत्पन्न झाल्या आहेत, त्या चिंतनीय आहेत. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२२ पासून या महामार्गावर १,२८२ अपघात झाले असून, त्यात १३५ जणांचे मृत्यू झाले आहेत. हमासच्या हल्ल्यात जितके मृत्यू इस्रायलींचे झाले नसतील, त्यापेक्षाही हा आकडा जास्त आहे. याचा अर्थ आपल्याकडे चालकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. अर्थात ही नोंद पोलिसांकडे झालेल्या नोंदीतून प्राप्त झाली आहे. कोणतेही सरकार रस्त्यावर जास्तीत-जास्त मृत्यू व्हावेत म्हणून रस्ते बनवत नसते. शिवसेना उबाठा गटाची सत्ता गेल्याने तो गट सैरभैर झाला असल्याने असली वक्तव्ये करत आहे. त्या गटाची वक्तव्ये पाहून त्या गटाला खरोखरच अपघातांबाबत वाईट वाटत आहे की सरकारची बरी जिरली, असे समजून आनंद झाला आहे, हे समजणे अवघड आहे.