कोकणी बाणा: सतीश पाटणकर
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरीपासून सुमारे ५० किलोमीटर व राजापूरपासून २२ किलोमीटर देवीहसोळ हे गाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथल्या ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा देवी व श्री जाकादेवी मंदिरासाठी. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या आणि अतिशय शांत अशा परिसरात वसलेल्या देवीहसोळ गावची ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा देवी मातेची आख्यायिका आणि इतिहासही रोमांचक आहे. श्री आर्यादुर्गा देवी व श्री जाकादेवी मातेचे देवस्थान हे जागृत देवस्थान असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे देवीहसोळ गावातील कातळशिल्पही प्रसिद्ध असून कोकण पर्यटन विकास आराखड्यात देवीहसोळ गावाच्या कातळशिल्पाचा समावेश केला असून ही कातळशिल्प १० हजार वर्षे जुनी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
प्राचीन काळी वृत्रासुर नावाचा दैत्यराजा होऊन गेला. त्याने सर्व भूलोक जिंकून स्वर्गावर स्वारी केली. इंद्र, अग्नी, वरुण, यम वगैरेंना जिंकले या त्या ठिकाणी आपल्या असुरांची दिग्पाल म्हणून नेमणूक केली व स्वर्गातील सर्वांना छळण्यास सुरुवात केली. सर्व देवांनी एकत्र येऊन श्री ब्रह्मदेवाची, श्री विष्णूंची प्रार्थना करून वृत्रासुराने अत्याचाराने केलेल्या दुरवस्थेची हकीकत त्यांच्या कानावर घातली. हे ऐकताच श्रीविष्णू कोपले. त्या रागाचे आवेशात त्यांचे तोंडातून अतिदिव्य तेज बाहेर आले हे पाहताच ब्रह्मदेव, इंद्र वगैरे देवांच्या तोंडातून भयंकर तेज बाहेर पडले. ही सर्व एकवरून त्यापासून एक मोठा तेजगोळा निर्माण झाला आणि त्यातून एक महादिव्य रूप धारण केलेली महादेवी प्रकट झाली आणि तिने महाभयंकर गर्जना केली. तिला पाहून सर्व देवांना ऋषींना अतिव आनंद झाला. त्यांनी आपापली अस्त्रे, चक्र, पाश, वज्र, शस्त्रे, अस्त्रे, आयुधे, वाहने इत्यादी (सिंह वगैरे) तिला अर्पण केली. या महादेवीची सर्व देवांनी स्तुती केली. “हे देवी, तू विश्वजननी आहेस. तूच सर्व शक्तींची अनेक रूपे, बुद्धी-सिद्धी, सर्व रूपिणी आहेस तू दुर्जय व दुर्गम्य आहेस म्हणूनच तू ‘दुर्गा’ या नावाने प्रख्यात होशील” अशा रीतीने हा देवीचा अवतार होऊन ती दुर्गा झाली. तिची गर्जना ऐकून वृत्रासुर तिला पाहण्यास आला. तिला पाहून तो घाबरला, तरी पण तो तिच्यासोबत युद्ध करू लागला.
दोघांचे महाभयंकर युद्ध झाले, शेवटी वृत्रासुर मारला गेला. सर्व देवदानवांची त्याच्या त्रासातून सुटका झाली. सर्वांनी देवीचा उदो उदो केला. नंतर ब्रह्मदेवांनी तिला विनविले की, “हे देवी, तुला अजून अनेक कार्ये करावयाची आहेत. तरी तू हिमगिरी पर्वताच्या शतशृंग शिखरावर जाऊन वास्तव्य कर” ते देवीने मान्य करूनन तिथे वास्तव्य केले. पुढे वृषवर्ण नावाच्या असुर राजाचा पुत्र महिषासुर हा महाबळी, पराक्रमी होता. त्याची राजधानी शोणितनगर होती. त्याने उग्र तप करून ‘आपल्याला देव वा दानव कोणीही मारणार नाही’ असा वर मिळवला (पण त्यावेळी तो स्त्रीला विसरला) वर मिळाल्यावर उन्मत्त होऊन त्याने सर्व जगाला, देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. शेवटी देवीने त्याच्याशी महाभयंकर युद्ध करून त्यालाही नाहीसे केले. देवांनी तिच्यावर पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त केला. त्यानंतर पुन्हा सर्वत्र शांती नांदू लागली.
पुढे सन १५०५ च्या सुमारास पोर्तुगीजांनी लालसेने हा प्रंत जिंकून घेतला व ख्रिस्ती धर्माचे प्रचारासाठी हिंदू देवळे तोडणे, मूर्ती भंग करणे इत्यादी प्रकार सुरू झाले. म्हणून बिगणे गावाचे कामत वगैरे सारस्वतांनी पुढाकार घेऊन बिणगे येथे देवीची स्थापना केली. पुढे टिपू सुलतानाचे राज्य आले. त्यावेळी भीतीने लोकांनी ही देवी ‘अरंभीला’ तालुक्यातील बंदिगे गावी हलविली व तिची स्थापना करून आज असलेले देऊन बांधले. त्यानंतर हे स्थान ‘श्री आर्यादुर्गा अंकोला’ म्हणून प्रिसद्ध झाले. आश्विन महिन्यात शुक्ल प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. पहिल्या दिवशी सर्व देवतांची रूपे स्वच्छ करून रूपे लावून सर्व देवता सजवले जातात. संपूर्ण नवरात्र उत्सवादरम्यान गावाच्या आजूबाजूच्या भागातील व महाराष्ट्रातून देवींच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात येतात. मार्गशीर्ष वद्य अष्टमी आणि नवमी या दोन दिवस देवीची मोठी म्हणजेच राजापूर तालुक्यातील प्रशिद्ध अशी यात्रा भरते. या यात्रेचे महत्त्व गावात इतके असते की घरातील सण किंवा लग्नकार्य यापेक्षाही मोठे असते. कारण गावातील चाकरमान्यासह पाहुणे मंडळी आणि गावाच्या बाजूच्या व गावातील भाविकही या यात्रेस मोठ्या संख्येने येतात.
देवी आर्यादुर्गा मंदिराच्या मंदिराच्या अलीकडे व मंदिराला लागून रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे पंधरा चौरस फुटांची चौकट आखलेली दिसते. त्या चौकटीला चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेले आहे. चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले दिसतात. त्या चार भागांमध्ये विविध आकृती कोरलेल्या आहेत. त्यांतील काही समजतात, काही अनाकलनीय आहेत. तेथे सर्वत्र विविध कातळशिल्पे खोदलेली दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी प्रामुख्याने आढळतात. काही कातळशिल्पे कोरताना अर्धवट सोडलेली आहेत; मात्र बरीचशी सुस्पष्ट अशी खोदलेली आहेत. चौकटीच्या मध्यभागी गोल खोलगट खड्डा आहे. त्यात पाणी साठलेले असते. त्यामध्ये माया कॅलेंडर साम्य दाखवणारे सर्पयंत्र, गूढ ग्रहमाला, प्राणी, पक्षी अजस्त्र विहीर व पुरातन चित्रलिपीतील शिलालेख अस्तित्वात आहेत. मध्य व दक्षिण अमेरिकेत सात हजार वर्षांपूर्वी माया, टॉलटेक या संस्कृती नांदत होता. या संस्कृतीत माया लोक अधिक प्रगत व खगोल गणितात पारंगत होती. या माया संस्कृतीशी साधर्म्य दाखवणारी शिल्पे इथे आढळतात, असे इतिहास संशोधक यांचे म्हणणे आहे. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)