गणपती बाप्पा आले नि थोरा-मोठ्यांचा गरीब-श्रीमंतांचा अशा सर्वांचा पाहुणचार घेऊन शुभाशीर्वाद देऊन आपल्या गावाला निघून गेले आहेत. आता आईच्या म्हणजेच देवीमातेच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. थोडक्यात गणेशोत्सवाची धूम संपली असून, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. मुंबईतील तारुण्याने सळसळणारा आणि मोठ्या जल्लोषाचा सण म्हणजे नवरात्रीचा सण. मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने ठिकठिकाणी दांडिया रास म्हणा किंवा विशाल अशा गरब्याचे आयोजन करण्यात येते. यापुढे आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची प्रमुख्याने काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठ्या प्रमाणात रास दांडिया खेळले जातात. विशेषत: अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या दांडियांचे आयोजन करण्यात येते.
राज्यात येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका आणि त्याबरोबरच विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या दांडिया आयोजनात मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांची घुसखोरी होऊन वारेमाप खर्चही केला जाणार हे निश्चित. हे सर्व करताना विविध मंडळांमध्ये आयोजनाच्या बाबतीत जीवघेणी स्पर्धाही होताना दिसणार आहे. या स्पर्धेत पैशांची वारेमाप उधळण तर होईलच, पण अशा भव्यदिव्य कार्यक्रमांमध्ये अपप्रवृत्तींची घुसखोरी होऊन चांगल्या कार्यक्रमाचे पावित्र्य भंग होण्याची शक्यता अधिक असते. तसेच रास गरब्यासाठी तरुण-तरुणींची संख्या मोठी असल्याने अन्य गैरप्रकार होऊन किंवा चेंगराचेंगरीसारख्या घटना घडण्याचीही भीती असते. त्यामुळे आयोजकांच्या वतीने अनेकदा कार्यक्रम स्थळी प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाच्या जागी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका ठेवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
रास दांडिया खेळताना अनेकदा लोक देहभान विसरून रममाण होऊन नाचतात. हे करताना काही वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. तसेच कोरोना कालखंडानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असल्याचे देखील अनेक अहवालांतून समोर आले आहे. त्यामुळे अशा बदललेल्या जीवनशैलीमुळे विविध आजार असलेल्या रुग्णांची संख्याही तितकीच वाढली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही क्षणी वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊनच आयोजकांनी अशी सुविधा सदासर्वकाळ उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबत मुंबईतील एका गुजराती वृत्तपत्राच्या संपादकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन दिले होते. या निवेदनाला अनुसरून मुख्यमंत्री शिंदे यांनी या गोष्टीची निकड लक्षात घेऊन तातडीने तसे निर्देश दिले आहेत.
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांसह व्यावसायिकदृष्ट्याही रास दांडियाचे आयोजन केले जाते. हे आयोजन मोठ्या मैदानात, सभागृहांत करण्यात येते. त्यामुळे आरोग्यविषयक आणीबाणी उद्भवल्यास दांडिया खेळणाऱ्यांवर योग्य आणि तातडीने प्राथमिक उपचार होणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये १२००हून अधिक नवरात्रोत्सव मंडळे दरवर्षी अधिकृतरीत्या उत्सवासाठी परवानगी घेतात. नवरात्रोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मुंबई पालिकेच्यावतीने एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येत आहेत. तसेच बिगर व्यावसायिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ करण्यात आले आहे. केवळ १०० रुपये अमानत रक्कम आकारण्यात येणार आहे. दुर्गामूर्ती विसर्जनासाठी पालिकेतर्फे दिवे, शौचालय, निर्माल्य कलश आणि मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा गरबा कार्यक्रमाचे आयोजन करताना प्रशासनाचे अधिकारी आणि गरबा आयोजक यांनी सुरक्षेसाठी व लव्ह जिहाद सारखे काही प्रकार टाळण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात, असे सुचविले आहे. त्यातूनच येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तपासावे, अशी सूचना भाजप आमदार नितेश राणे आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. नवरात्रीचा उत्सव सुरू होण्यास आता अवघे काही दिवस राहिले आहेत. थोड्याच दिवसांत देवीचा हा उत्सव सुरू होईल. लहानांपासून, तरुण-तरुणी आणि मोठ्यांपर्यंत अनेकजण यामध्ये उत्साहाने सहभागी होतात.
देशात ठिकठिकाणी गरबा कार्यक्रमाची तयारी देखील सुरू झाली आहे. हा उत्सव हिंदूंच्या श्रद्धेचा आणि भक्तिभावाने रममान होण्याचा उत्सव आहे. मात्र ज्यांची श्रद्धा नाही असे अनेक लोक येथे येऊन गैरप्रकार करताना आढळतात. म्हणून उत्सवाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आयोजकांनी उपाययोजना करावी, अशी सूचना विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. ज्यांना देवीप्रती श्रद्धा नाही, विश्वास नाही असे अनेक लोक गरब्याला येतात. पण गरबा हा आस्थेचा आणि भक्तीचा विषय आहे. तो काही फक्त नृत्य आणि मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा ऑर्केस्ट्रा नव्हे. हा देवीला प्रसन्न करण्याचा, जागराचा उत्सव आहे. त्यामुळे गरबा आयोजक आणि प्रशासन या दोघांनीही गरबा केंद्रांवर लोकांच्या प्रवेशासाठी उपाययोजना करायला हवी. त्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांना किंवा सुरक्षारक्षकांना उभे ठेवून गरब्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तपासले जायला हवे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याचाच अर्थ मित्रहो, ‘दांडिया रास खेळाच, पण जरा जपून’, असेच म्हणायला हवे.