चाकरमान्यांनो चाललात का रे मुंबईला, मला कुलूप बंद करून? – मी कोकण बोलतोय

Share

साईनाथ गांवकर

अरे, माझ्या चाकरमान्यांनो चाललात का रे मुंबईला, पुन्हा आपलं घरटं सोडून? मला पुढच्या वर्षापर्यंत पुन्हा एकदा कुलूप बंद करून? अरे होय संपूर्ण मुंबई खाली करायची ताकद फक्त तुमच्यातच आहे पण गणपती उत्सवापुरती… त्यानंतर मात्र संपूर्ण गावंच्या गावं कुलूप बंद सुद्धा तुम्हीच करताय ना रे लेकरांनो… कधी याचा विचार करणार आहात का? काय… ओळखलं का मला? अरे मी तुमचा कोकण बोलतोय…! खरं तर बोलतोय कसला? तुम्ही पुन्हा गावात कधी येणार या विचाराने अक्षरशः रडतोय…

अरे तुम्ही गणेशोत्सवाला मुंबईतून गावी येताना तुमचे होत असलेले हाल पाहून आतून तुटल्यासारखं वाटतं. एका हातात माझ्या लहान लेकरांना घेताय अन् दुसऱ्या हातात जड वजनाची बॅग. अक्षरशः गर्दीतून चेंगरत चेंगरत माझ्या गावातील बंद कुलूप उघडायला तुम्ही येता. काही ठिकाणी तर अपघातात अमुक जण मृत्युमुखी पडलेत, तमुकजण जखमी झालेत, अशा बातम्या माझ्या कानी पडल्या की पायाखालची जमीनच सरकते रे माझ्या.. तुम्ही या उत्सवांमध्ये गावाला कसे येता आणि मुंबईत पुन्हा कसे जाता? हे माझ्या एवढं कुणालाच समजू शकत नाही. कारण मी तुमची जन्मभूमी आहे. बाळांनो मला सांगा, माझ्याकडे काय नाहीये? सांगा ना.. मी म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्गच, मी म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण, मी म्हणजे ७२० किलोमीटरचा अथांग पसरलेला समुद्रकिनारा, अन् मी म्हणजे प्राचीन कला, धबधबे, कातळशिल्प आणि पुरातन मंदिरांचा खजिना, मी म्हणजे आंबा, नारळी, काजूच्या बागांचा राजेशाही थाट!, मी म्हणजे पर्यटन अन् मासेमारी व्यवसायाचे जणू परमोच्च स्थान! मी म्हणजे, असे अजून बरंच काही. हे सगळं असताना सुद्धा तुम्ही मुंबईतच जाताय ना? का जाताय? कारण वीतभर पोटाची खळगी भरायला. फक्त माझं सौंदर्य पाहून तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं पोट नाही भरू शकत तुम्ही.. हाताला रोजगार असायला पाहिजे, याचसाठीच ना? याचाच अर्थ एवढं सारं माझ्याकडे असूनही तुमच्या दोन होतांना रोजगार द्यायला मी अकार्यक्षम ठरलोय..

माझ्यासाठी ही सगळी गोड गोड विशेषणं वापरून तुम्ही स्वतःला रोजगारापासून अन् मला तुम्ही सर्वांनी अक्षरशः मूलभूत विकासापासूनसुद्धा उपेक्षितच ठेवलंय रे.. शेणाने सारवलेली जमीन, कोळशाने दात घासणारी माणसं, डोंगरातून अन् कडेकपारीतून मार्ग काढीत तुम्हाला घडविल्या जाणाऱ्या पर्यटन सफरी, डोक्यावरून लाकडाची ओझी वाहून नेणारी आजी.. अरे हे सगळं माझी गरिबी दाखवून लोक पैसे कमवतायत तिकडे. त्यांच्या आवाजाला आणि अलंकारिक शब्दाला भुलून तुम्ही माझ्या मागासलेपणाचा अक्षरशः बाजार मांडणाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचताय.. कधी रे लक्षात येईल तुमच्या हे.. पण मला नाही रे सहन होत आता हे… मी तेव्हाही श्रीमंत होतो अन् आताही श्रीमंतच आहे. माझी श्रीमंती तुम्ही आहात. होय मला माझ्या सुंदरतेचा अभिमान आहे. पण माझी सुंदरता तुम्ही सर्वांनी कोकणच्या विकासाला ‘ब्रेक’ लावून गतिहीन केलात हे सुद्धा तितकंच सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. होय मला पण नावारूपास यायचंय. माझ्या ओसाड पडलेल्या माळरानावर तुमच्या बागडण्याने माझ्या लेकरांच नंदनवन फुलवायचंय..!

मला एक गोष्ट अजूनही लक्षात येत नाही. मला वाचवण्यासाठी तुमच्यातील काहीजण ज्या सोशल मीडियातून save to kokan चे नारे देतायत त्यांना का नाही सुचत रे save to kokanimanus चे नारे द्यायचे? अरे बाळांनो, तुम्ही वाचलात, तर मी वाचेल ना? नाहीतर तुमच्या असण्याशिवाय माझ्या सुंदर दिसण्याला काय अर्थ आहे? आपण आता २१व्या शतकात वावरतोय. ज्या लालपरीने माझ्या गावागावात तुम्ही फिरलात आज त्याच एस. टी. महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाहीने तुम्ही गावात येताय. शेजारच्याच्या लँडलाईनवरून घरी आठवड्यातून एकदा बोलणारे तुम्ही आज व्हीडिओ कॉलवरून रोज एकमेकांना पाहताय. अरे एव्हढं तंत्रज्ञान पुढे गेलं असताना कसा बरं माझ्या अंगणात येणारा रिफायनरी प्रकल्प विनाशकारी आहे हे तुम्ही ठरवून मोकळे झालात.

हल्लीच रिफायनरीच्या विरोधाचे सगळे मुद्दे संपले म्हणून आता कातळशिल्पांची ढाल केली जात असलेल्या प्रकारावर प्रकाशझोत टाकलेला… खरंच त्यांनी टाकलेला प्रकाशझोत मला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ठरणारा आहे. बरं, ‘माझ्या कोकणात विनाशकारी प्रकल्प नको’ असं सांगत असताना चक्क ३/३ रिफायनरी असलेल्या मुंबईत मात्र वर्षानुवर्षे तुम्ही राहताय ना. असं जेव्हा मुद्दा न खोडता येणारं जळजळीत सत्य समोर येते ना तेव्हा प्रश्न पडतो की, तुमचा बेगडी विरोध नेमका कशासाठी आहे? म्हणजे एकीकडे माझ्या अंगणात येऊ घातलेल्या प्रकल्पाला विरोध करायचा आणि दुसरीकडे सारखाच प्रकल्प असलेल्या अंगणात जो माझाच अंश आहे त्या मुंबईत मात्र डिलिव्हरी बॉयपासून कॉल सेंटर असेल अथवा मॉल असेल यामध्ये काम करणारा कमर्चारी म्हणून बिनदिक्कतपणे काम करायचं? इकडे गावी सांगायचा, ‘आमचो पपलो मुंबयत कामाक हा! सध्या खोली भाड्याची हा, पण बदलापूरला रूम बुक केली हा!’ कसली रे हा फुकटचा मोठेपणा? अर्थात काहीजण मोठ्या हुद्द्यावरही असतील त्यांचा देखील मला माझी लेकरं म्हणून तेवढाच अभिमान आहे. पण त्यांना सुद्धा माझं खरंच काय पडलंय की नाही हे सुद्धा मला समजत नाहीये. सी वर्ल्ड प्रकल्पामुळे कोणतं प्रदूषण होणार होतं? चिपी विमानतळामुळे कोणता विनाश होणार होता? पण यांसारख्या प्रकल्पांना सुद्धा आपण विरोधच केला. अगदी कोकण रेल्वे, मुंबई गोवा महामार्ग हे सुद्धा प्रकल्प आपल्या विरोधाच्या कचाट्यातून सुटले नाहीत. पण तुमच्या ह्या काही जणांच्या फुशारक्यांमुळे आज माझ्याकडे सगळं असूनही तुमच्या हाताला तुमच्याच जन्मभूमीत रोजगार द्यायला मी असमर्थ ठरतोय याची खंत मात्र माझ्या मनात कायमची आहे.

माझ्या पाखरांनो डोळे उघडा. कोण आपले आणि कोण आपली दिशाभूल करणारे? हे आता तरी ओळखा. पुन्हा आपल्या घरट्यात माघारी या. माझ्या अंगणात येणाऱ्या प्रकल्पांना फक्त विरोधासाठी विरोध न करता त्या प्रकल्पांबाबत अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेत ‘रेड कार्पेट’ अंथरून त्याचे स्वागत करा. नाहीतर अजून अशी कित्येक वर्षे उलटली, तरी मी गरीबच राहणार आणि माझी हीच गरिबी दाखवण्यासाठी काहीजण रानात भटकत राहत तुम्हाला सुद्धा भटकंती करायला लावणार. एव्हढंच नव्हे तर, तुम्ही ५ दिवसांसाठी गणपतीला दरवर्षी माझ्या गावातील बंद दारांची कुलुपे उघडण्यासाठी रत्नागिरी – सिंधुदुर्गात येणार आणि पुन्हा मला कुलूप बंद करून निघून जाणार. हे थांबवा, एवढीच तुम्हा सर्वांना माझी साद!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…

3 hours ago

Eknath Shinde : संयम राखावाच लागेल, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचे आहे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…

3 hours ago

Hathras stampede : हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी! २७ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये धार्मिक सत्संगादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. भोले…

3 hours ago

Google Aai : तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवायला येतेय ‘गुगल आई’!

उत्सुकता वाढवणारा टीझर रिलीज; 'या' तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट मुंबई : सध्याच्या काळात इंटरनेटचा (Internet)…

3 hours ago

Nitesh Rane : पुन्हा असं केलं तर हिंदू समाजही तिसरा डोळा उघडेल!

आमदार नितेश राणे यांचा राहुल गांधींना कडक इशारा शिवसेनेच्या जडणघडणीतला खरा व्हिलन उद्धव ठाकरे :…

4 hours ago

Ghatkopar hoarding accident case : होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोहोचले? भाजप आमदारांची चौकशीची मागणी

मुंबई : घाटकोपर येथे १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग…

4 hours ago