३५ गावे, १५ वाडी -वस्त्यांवर ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा
सप्टेंबर महिना संपत असताना येवला तालुक्यात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने नदी,नाले,कोरडी असल्याने आजही येवला तालुक्यातील ३५ गावे, आणि १५ वाडी वस्त्यांवर ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जवळपास निम्मा तालुका टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहे. येवला तालुक्यात पूर्व भागात परिस्थिती बिकट असून नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. तालुक्यातील ३५ गावे व १५ वस्त्या मिळून २३ टँकरद्वारे रोज सुमारे ५० खेपांद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. नुकत्याच आलेल्या पालखेड डावा कालव्याचे ओवर फ्लो आवर्तनातून साठवण तलाव भरल्याने येवला तालुक्यात ३८ गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू असून ६२ गावे व वाडी वस्ती टँकरमुक्त झाले असून नोव्हेंबरपर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे. येवला तालुक्यात तीन महिने उलटूनही अजूनही जोरदार पाऊस न पडल्याने बंधारे, नदी हे जलसाठे व विहिरी आदी अद्यापही कोरडेठाक असल्याने ग्रामीण भागात तहान भरपावसाळ्यातही टँकरवरच भागवावी लागत असून निदान परतीच्या पावसाने तरी नदी, नाले भरून वाहतील अशी आशा ग्रामस्थ,शेतकरी व्यक्त करत आहे
या गावात सुरू आहेत टँकर
येवला तालुक्यातील वाईबोथी, सायगाव फाटा, राजापूर, खैरगव्हाण, मातुलठाण, बाळापूर, पांजरवाडी बोकटे, दुगलगाव, आहेरवाडी, ललित, जायदरे, धामणगाव, खिर्डीसाठे, खरवंडी, देवदरी, सोमठाण जोश-(हनुमान नगर) अंदरसूल-(गोल्हेवाडी रोड वस्ती)नगरसूल येथील वस्त्या,वडाचा मळा, पाटील वस्ती, गाडेकर,घाडगे वस्ती, राजापूर येथील हवालदार वस्ती,धात्रक वस्ती, भैरवनाथ वस्ती, महानुभाव वस्ती, चिचोंडी बुद्रुक, रायते, गुजरखेडे, बल्हेगाव,चिचोंडी खुर्द, कासारखेडे, गोपाळवाडी, वडगाव, कोळम, बदापूर, कोळगाव, ममदापूर, पिंपळखुटे तिसरे, वाघाळे, रहाडी, कौटखेडा, देवठाण,चांदगाव, आडसुरेगाव, आडसुरेगाव-( चव्हाण वस्ती, हनुमान वाडी,कोकाटे वस्ती, वरचा मळा ) सुरेगाव रस्ते-(चव्हाण वस्ती, विठ्ठलवाडी, मगर वस्ती, आहेर वस्ती ,पगारे वस्ती ,म्हस्के वस्ती, पवार, ढमाले वस्ती)भुलेगाव-(गायकवाड पुणे वस्ती नळवाडी महादेव वाडी, जुनन वाडी, निकम वाडी, पानलोटवस्ती) गोरखनगर, पन्हाळे साठे, तळवाडे(विठ्ठलवाडी),गारखेडा या गावांसह येथील वस्त्यांवरही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
दरम्यान, तालुक्यात अजूनही जोरदार पाऊस न झाल्याने नदी, नाले कोरडीच असल्याने सर्वच गावातून टँकरची मागणी सुरूच असून, प्रशासनाने परिस्थिती पाहता कुठेही टँकर बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी ३० सप्टेंबर पर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मुदतवाढ दिली असली तरी, पुढेही पाऊस न पडल्यास टँकर सुरू राहणार आहे.