भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला आहे. त्यामुळेच राजकीय लढ्यानंतर आता आर्थिक लढा सुरू झाला आहे. प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिकच गुंतागुंतीचा होत आहे. याचा परिणाम उद्योगापासून शिक्षण क्षेत्रापर्यंत, अनेक गोष्टींवर पडू शकतो.याच दरम्यान आता भारताने आणखी एक कठोर पाऊल उचललं आहे. भारताने कॅनडासाठी व्हिसा सेवा स्थगित केली आहे. कॅनडातून भारतात येणाऱ्या कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.याबाबतची सूचनाही वेबसाईटवर देण्यात आली आहे. कॅनडाचा व्हिसा घेऊन भारतात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे. नोटीसमध्ये “भारतीय मिशनकडून महत्त्वाची माहिती – ऑपरेशनल कारणांमुळे, २१ सप्टेंबर २०२३(गुरुवार) पासून, पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय व्हिसा सेवा बंद करण्यात आल्या आहेत” असं म्हटले आहे.
गेल्या तीन दिवसांत भारताने कॅनडावर कडक कारवाई करण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रु्डो यांनी केला. तसेच भारतीय राजदूताला कॅनडातून निघून जाण्याचा आदेश दिला. ट्रुडो यांनी केलेला आरोप भारताने फेटाळला, तसेच कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांचीही भारतातून हकालपट्टी करण्यात आली. कॅनडातील काही भागांमध्ये भारतविरोधी कारवाया सुरू आहेत. ते लक्षात घेऊन भारतीयांनीकॅनडामध्ये प्रवास करताना सावधानता बाळगावी, त्या देशात शिकायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनीही सतर्क राहावे, अशा सूचना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना दिल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतविरोधी कारवायांना विरोध करणाऱ्या लोकांवर कॅनडामध्ये हल्ले होण्याचे प्रकार काही भागांत घडले आहेत. त्यामुळे त्या परिसरात प्रवास करणे भारतीयांनी टाळावे.
दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येप्रकरणी भारताने कॅनडाला थेट फैलावर घेतले आहे. इकडचे-तिकडचे बोलू नका, हरदीप सिंह निज्जरबाबत केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, असे म्हणत भारताने कॅनडाला थेट सुनावले आहे. दरम्यान, बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांची नव्या संसद भवनात भेट घेतली होती. याशिवाय परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी यांच्यातही बैठक झाली. यानंतर भारताने कॅनडाकडून पुरावे मागवले आहेत.
भारताने कॅनडाला भारतीय गुप्तचर संस्थांवर केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, पुराव्याच्या आधारे भारत कॅनडामधील तपासात सहभागी होण्यास तयार आहे, असे देखील सांगितले आहे. तसेच, ट्रुडो यांनी भारताचे मित्र राष्ट्र अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांना या प्रकरणी ज्या प्रकारे आवाहन केले, त्यांनाही भारताने हे सांगण्याचाही प्रयत्न केला की, भारतीय गुप्तचर संस्थांचा या हत्येशी काहीही संबंध नाही आणि कॅनडाकडून करण्यात येणारे सर्व आरोप निराधार तसेच राजकीय हेतूने प्रेरित आहेत.
भारताकडून आखली जातेय योजना
कॅनडात ट्रुडो यांचे सरकार अल्पमतात असून त्यांना न्यू डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ खलिस्तानचे जगमीत सिंह यांचा पाठिंबा आहे. कॅनडामधील भारतीय प्रवासी शीख आणि हिंदू यांच्यात कोणतंही ध्रुवीकरण होणार नाही आणि कॅनडात राहणारे भारतीय लोक सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी भारत योजना आखत आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या संसदेत भाषण करताना हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येचा आरोप भारतावर केला होता. भारताने यापूर्वीच हा आरोप फेटाळून लावला आहे.
एस. जयशंकर संयुक्त राष्ट्रात भूमिका मांडणार
परराष्ट्र मंत्री संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सहभागी होण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क, अमेरिकेला रवाना होणार आहेत. जिथे ते भारताची भूमिका स्पष्ट करतील. २६ सप्टेंबर रोजी UNGA मध्ये संबोधित केल्यानंतर ते वॉशिंग्टन डीसीलाही भेट देण्याची शक्यता आहे.
भारत आणि कॅनडातील वादाचं नेमकं कारण काय?
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, भारत सरकारने हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आम्ही चिथावणी देण्याचा किंवा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही फक्त वस्तुस्थिती मांडत आहोत.” तसेच, पुढे बोलताना म्हणाले की, “आम्ही सर्व काही स्पष्ट करण्यासाठी आणि योग्य प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारसोबत काम करू इच्छितो.” दरम्यान, कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर १८ जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली होती. याच प्रकरणी कॅनडाकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आले असून भारताने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…