Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीलोणावळा पर्यटन विकासासाठी प्रकल्प अहवाल महिन्याभरात तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

लोणावळा पर्यटन विकासासाठी प्रकल्प अहवाल महिन्याभरात तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव बी गोपाल रेड्डी, पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण तर दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांचे साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेल्या उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे.

या परिसरात वा-याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणूकीला प्राधान्य द्यावे. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करतांना काँक्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२२च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. लोणावळा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे. ४.८४ हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून येथे झीप लाईनींगसारखे साहसी खेळ, फुड पार्क, ॲम्पी थिएटर, खुले जीम आणि विविध खेळ आदी सुविधा असणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मावळपासून नवी पनवेल आणि मुंबई कमी अंतरावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्ग संपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा. शासनामार्फत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित करावी, लवकरच याबाबत पुणे येथे बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानेश्वर दाभाडे उपस्थित होते.

कुसवली पठार हे समुद्र सपाटीपासून ३ हजार मीटर उंचीवर असून साधारण १ हजार २०० एकरचा हा परिसर आहे. परिसराच्या एका बाजूस ठोकळवाडी, तर दुस-या बाजूस वडीवळे आणि शिरोता अशी धरणे आहेत. पठाराच्या शेवटी पश्चिम घाट आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -