मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत जरांगे यांचं उपोषण मागे
जालना : मराठा समाजाचे गेल्या सोळा दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण करत आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सरकारने यावर अनेक बैठका घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, उपोषण सोडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. आज मुख्यमंत्री अंतरवाली सराटी गावात दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. दोन सरकारी अधिकारी देखील आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. यावेळेस मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात, त्यांच्यातच धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे, असं जरांगे म्हणाले.