
नवी दिल्ली: इंडिया(INDIA) आघाडीची समन्वय समितीची पहिली बैठक संपली आहे. या बैठकीत नव्या विरोधी पक्षांची आघाडीची पहिली संयुक्त रॅली मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये होणार असल्याचे ठरवण्यात आले. ही रॅली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे.
यावरून स्पष्ट होते की विरोधी पक्षांच्या आघाडीची नजर लोकसभा निवडणुकीआधी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आहे. मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे.
दिल्लीस्थित शरद पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
या बैठकीत शरद पवार, के सी वेणुगोपाल, टीआर बालू, तेजस्वी यादव, संजय राऊत, संजय झा, हेमंत सोरेन, राघव चढ्ढा, डी राजा, उमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि जावेद अली उपस्थित होते.
तृणमूलकडून कोणीही सामील नाही
इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसही सहभागी आहे. त्यांच्याकडून ममता यांचे भाचे अभिषेक बॅन्रजी यांना समन्वय समितीचे सदस्य बनवण्यात आले होते. मात्र ते बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना आज ईडीच्या समन्सनुसार चौकशीसाठी सामील व्हायचे होते.