आजच्या भू-राजकीय चित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतका यशस्वी नेता दुसरा नाही. आजपर्यंत जे कुणालाही साध्य झाले नाही, ते भारताने मोदी यांच्या नेतृत्वाखाली करून दाखवले. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला म्हणजे सर्वोच्च नेत्यालाही जे करणे जमले नाही ते मोदी यांनी करून दाखवले. मोदी यांना विश्वगुरू म्हटले जाते. पण त्यांनी हे ब्रिद आपल्या कर्तृत्वाने मिळवले आहे. कुणाही चमच्या किंवा चापलूस माणसाने त्यांना हा किताब दिलेला नाही. गुजरातमधून आलेल्या एका साध्या इसमाने आज थेट विश्वगुरू व्हावे आणि अमेरिका आणि रशिया यांना एकत्र आणावे, हे कर्तृत्व फक्त आणि फक्त मोदी यांचेच आहे. मोदी यांचे सर्वात मोठे यश हे आहे की त्यांनी संयुक्त घोषणापत्र मंजूर करून घेतले. त्यात रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा उल्लेखही न करता मात्र आजचे युग हे युद्धाचे नाही, असेही हे घोषणा पत्र ठासून सांगते. हा सरळ रशियन अध्यक्ष पुतिन यांना जगाने मारलेला टोला आहे. अमेरिकन अध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांचा असा आग्रह होता की, रशियाने युक्रेनविरोधात जे युद्ध चालवले आहे, त्याची यथेच्छ निंदा ठरावात केली जावी. पण रशियाचा उल्लेखही न करता घोषणापत्र मंजूर करून घेण्यात मोदी यांनी आपल्या असामान्य मुत्सद्दीपणाची पराकाष्ठा केली आणि निवेदन मंजूर करून घेतले. मोदी यांच्या राजकीय कौशल्याचा हा विजय आहे. त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांना आणि त्यांच्या मुत्सद्देगिरीला जग मानते, हेही सिद्ध होऊन जगासमोर आले. रशिया आणि अमेरिका आज भारताशी मैत्री करण्यास उत्सुक आहेत, हे साऱ्या जगाने पाहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले की, आजच्या भू-राजकीय जगात त्यांच्याइतका यशस्वी नेता नाही. दोन उदाहरणांवरून हे स्पष्ट होते. एक म्हणजे ‘जी-२०’ परिषदेत तयार केलेले घोषणापत्र परिषदेने मंजूर केले. त्यावेळी जगातील मतभेद आडवे आले नाहीत, तर दुसरे म्हणजे आफ्रिकी युनियनला ‘जी-२०’ परिषदेचे सदस्यत्व मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहाल करण्यात आले. त्यामुळे ‘जी-२०’ आता ‘जी-२१’ परिषद बनली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कोणत्याही वैश्विक संघटनेत आतापर्यंत संयुक्त घोषणापत्र मंजूर होऊ शकलेले नाही. पण मोदी यांच्या कार्यकाळाचे हे वैशिष्ट्य आहे की, मोदी यांच्याच मुळे हे घोषणापत्र मंजूर करण्यात आले. हा भारताचा फार मोठा विजय आहे. याचे कंगोरे आज समजणार नाहीत. पण आणखी काही वर्षांनी ते लक्षात येतील. शांघाय परिषद असो की ब्रिक्स, यापैकी कोणत्याही परिषदेत असे घोषणापत्र मंजूर करण्यात आलेले नाही. पण ‘जी-२०’मध्ये ते मंजूर झाले. याचा अर्थ इतकाच की अनेक देशांचा रशियापेक्षा भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यावर जास्त विश्वास आहे. वास्तविक युक्रेन संघर्षाच्या संबंधित परिच्छेदावर सर्वसहमती होऊ शकली नाही. म्हणून भारताने तो परिच्छेद गाळून उर्वरित ठराव मतास टाकला आणि मंजूर करून घेतला.
रशिया हा भारताचा जुना मित्र. त्यामुळे रशियाविरोधात काहीही घोषणापत्रात असू नये, याची दक्षता मोदी यांनी घेतली. पण अनेक देशांची युक्रेनवरील आक्रमणासाठी रशिया आणि मुख्यतः पुतिन यांच्यावर जोरदार टीका करावी, असा आग्रह होता. पण मोदी यांनी त्यास नाकारले. अमेरिका आणि फ्रान्स यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांची अशी इच्छा होती की, रशियाची जोरदार शब्दांत निंदा केली जावी. पण मोदी असे काही होऊ देणार नाहीत, याची त्यांना आशंकाही होती. पण अखेर भारताने म्हणजे मोदी यांनी आपली राजकीय कुटनीती पणाला लावून हे घोषणापत्र मंजूर करून घेतले. म्हणून हा मोठा विजय मानला जातो. भारत विश्वगुरू बनण्याच्या दिशेने निघाला आहे, हे अनेक बाबींवरून सिद्ध झाले. आज रशिया आणि अमेरिका यांच्यात भारताशी मैत्री करण्याची स्पर्धा लागली आहे. असे चित्र पूर्वी नव्हते. अमेरिका आणि रशिया, खासकरून अमेरिका ही पाकिस्तानला खूश करण्यासाठी कोणत्याही थराला म्हणून जात असे. आज तसे राहिलेले नाही. मोदी यांनी हा बदल घडवून आणला आहे. भारत – पाकिस्तान युद्धात भारताच्या पराभवासाठी जंग जंग पछाडणारी अमेरिका आज भारताशी मैत्री करण्यास उत्सुक आहे. आज भारताने अमेरिका आणि रशियाला आपल्या स्तरावर आणून ठेवले आहे.
राजकीय आणि मुत्सद्दीपणात भारत आज कुणासमोरही हार पत्करत नाही, हेच मोदी यांनी दाखवून दिले आहे. मोदी यांच्या या परिषदेत सारा जगभरचा मीडिया दाखल झाला होता. त्यावरून भारतातील इव्हेंटला कव्हर करण्यास मीडिया किती उत्सुक आहे, हेही जगाने पाहिले. इतर देशातील अशाप्रसंगी बाहेरच्या पत्रकारांना साधी कॉफी देण्याचीही व्यवस्था नसते. पण कालच्या परिषदेच्या स्थळी बाहेरच्या मीडियातील प्रतिनिधींसाठी पौष्टिक तृणधान्यांचीच चमचमीत मेजवानी होती आणि त्यासाठी फारसा खर्चही आला नव्हता. मोदी यांच्या कार्यकाळात अशा परिषदा भारतीयत्व जपूनही ‘अतिधी देवो भव’ हे आपले ब्रीद विसरत नाहीत, हेही आता जगासमोर आले आहे. इतक्या धकाधकीतही मोरोक्को येथे झालेल्या भूकंपबळींना आदरांजली वाहण्याचा ठराव मोदी यांनीच मांडला. यावरून त्यांना विश्वगुरू म्हटले जाते, ते किती यथायोग्य आहे, तेही पटते. भारताचे सामर्थ्य जगासमोर मांडण्यात भारत यशस्वी झाला आहे आणि चांगल्या स्मृती घेऊन प्रतिनिधी देश आपापल्या घरी जातील. पण दोन गोष्टी या परिषदेने साबित केल्या आहेत. एक म्हणजे मोदी हेच आज ग्लोबल साऊथचा आवाज बनले आहेत. दुसरे म्हणजे मोदी यांचे घोषणापत्र मंजूर करून घेणे हा फार मोठा विजय आहे. त्यातच ‘जी-२०’ परिषदेचा विस्तार ही एक नवीन बाब साध्य झाली आहे.