नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकला हवामानासह नैसर्गिक आणि मानव उपज संसाधनाचा विपुल स्रोत उपलब्ध असतांनाही नाशिक जिल्ह्याचा अपेक्षित विकास झाला नाही. सर्व काही आहे फक्त प्रामाणिक इच्छाशक्ती नाही म्हणून या जिल्ह्याची ही बिकट अवस्था झाल्याचे परखड मत स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजें छत्रपती यांनी नाशिककरांना संबोधित करतांना व्यक्त केले.
आपल्या भाषणात संभाजी राजें यांनी कुठल्याही नेत्याचे अथवा लोकप्रतिनिधीचा नामोल्लेख केला नसला तरी विद्यमान खासदार आणि आमदार आणि मंत्र्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत नाशिक लोकसभेच्या संभाव्य निवडणुकीचा शंख त्यांनी फुंकला अशी चर्चा सभास्थानी होती. उत्तर महाराष्ट्र स्वराज्य भवन या पक्ष संघटनेच्या कार्यालय शुभारंभ प्रसंगी राजें बोलत होते.
सायंकाळी पाच वाजता संभाजी राजें छत्रपती यांच्या हस्ते स्वराज्यच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला. त्यावेळी संभाजी राजें यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले जाईल. असे आश्वासन दिले.कार्यालयाच्या फलकावर भावी मुख्यमंत्री असा त्यांच्या नावासमोर असलेल्या उल्लेखाचा संदर्भ घेऊन ते म्हणाले, उल्लेख केल्यामुळे मी आभारी आहे, मात्र बोर्डवर लिहणे आणि होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
माझ्या डोळ्यासमोर एकच अजेंडा आहे स्वराजच्या माध्यमातून जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचायचे आहे.आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर कुणीच समाधानी नाही. राज्यात सत्तेसाठी काहीही सुरु असल्याचे ते म्हणाले.
विचारमंचावरून नाशिककरांना संबोधित करतांना मात्र गडकिल्ल्यांचा मुद्दा वगळता संपूर्ण राजकीय दिशा स्पष्ट करणारे भाष्य केले.कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचा अथवा लोकप्रतिनिधीच्या नावाचा उल्लेख न करता नाशिक जिल्ह्यातील गड किल्ले, शेती, दळण वळण सुविधा यांसह अन्य मूलभूत विकासाला तिलांजली दिली गेल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. संभाजी राजें यांनी नाशिकची सत्ता स्वराज्यच्या हाती दिल्यास कायापालट करू असे भाष्य करून महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले.राजें नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला यामुळे पुन्हा उधाण आले आहे.
तत्पूर्वी राज्य संपर्क प्रमुख करण गायकर यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका केली. न केलेल्या कामांची जंत्री वाचून दाखवणारा खासदार असा त्यांचा उल्लेख केला. जिखतातून दोन खासदार आणि सात आठ आमदार स्वराज्यचे असतील असे भाकीत देखील त्यांनी व्यक्त केले
जरांगे पाटील आंदोलनावर संभाजी राजें छत्रपतींची भूमिका
जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मी माझी भूमिका काल सविस्तर मांडली आहे.भावना आणि न्यायिक या दोन्हींची समेट कशी घडवून आणता येईल हे महत्वाचे आहे.त्यांनी त्यांची तब्येत सांभाळावी.त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल याबाबत चर्चा करावी.माझ्या दृष्टीकोनातून प्रश्न सोडवत असताना जीव देखील महत्वाचा आहे. मराठा समाजाच्या ४९ लोकांनी आत्महत्या केली आहे.समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे,ते विचार करून निर्णय घेतील.सरकारने देखील आरक्षण देताना टिकणारे आरक्षण द्यावे.”