
धनगर समाजाच्या कृतीवर राधाकृष्ण विखेपाटलांची प्रतिक्रिया
सोलापूर : राज्यभरात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा जोर धरत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या गोंधळातच आता इतर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. धनगर समाजही पेटून उठला आहे. आज सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने दिलेले निवेदन वाचत असताना (Dhangar Reservation Action Committee) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला. या घटनेवर विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विखे पाटील म्हणाले, आज सोलापूरच्या दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात मी धनगर आरक्षणासंदर्भातील कृती समितीच्या सदस्यांना वेळ दिली, त्यांचं निवेदन घेत त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला. मात्र, अनपेक्षितपणे जो अनुचित प्रकार घडला, यामुळं एकप्रकारे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये एवढी भूमिका माझी आहे. भंडारा उधळणं ही कृती चुकीची नाही, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच झाला. त्यामुळेच भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, गुन्हे दाखल करू नयेत, असे निर्देश दिल्याचं विखेंनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील कोणत्याही समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सरकारमधून नेहमीच सकारात्मक विचार करतो. आपल्या मागण्या मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळासमोर प्राधान्याने मांडेन. प्रश्न कोणताही असो तो चर्चेने आणि संवादाने सोडवता येतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. याचसाठी माझा मतदारसंघ असो, मंत्रालय असो की पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्हा असो, त्या त्या ठिकाणी येऊन भेटणाऱ्या सर्वसामान्य जनतेला वेळ देऊन मी त्यांची भेट घेतो. त्यांच्या समस्या समजावून घेत असतो. त्यावर प्राधान्यानं उपाययोजना करणं, समस्यांची सोडवणूक करणं यासाठी मी प्रयत्नशील आहे, असंही विखे पाटील यावेळी म्हणाले.