भोळ्या भाविकांना लुटण्याचा बाजार...
मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिराविषयी (Siddhivinayak Mandir) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सिद्धीविनायकाच्या नावे भाविकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला दादर पोलिसांनी (Dadar Police) बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी मोबाईल ॲपच्या माध्यमातून सिद्धीविनायकाचे ऑनलाईन दर्शन आणि पूजा करण्याच्या बहाण्याने भाविकांची फसवणूक करत होता. सुपर्णो प्रदीप सरकार असं या आरोपीचं नाव असून त्याला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दादर पोलिसांत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. सुपर्णो सरकार या फसवणुकीसाठी भाविकांकडून तब्बल ७०१ ते २१ हजार रुपये घ्यायचा. तपासादरम्यान, ज्या बँक खात्यात हे पैसे वळवले गेले ते सरकारचे असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यानुसार कारवाई करत दादर पोलिसांनी आता सुब्रजित बसू, प्राजक्ता सामाता आणि अनिता डे या सुपर्णोच्या साथीदारांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
देवाचा झालाय बाजार... 'याकडेही' अध्यक्षांनी लक्ष घालावे
सध्या गणेशोत्सवाचा सगळीकडेच जोरदार उत्साह आहे. मात्र, या गणेशोत्सवाचे रुप प्रचंड पालटले असून त्याला व्यवसायाचे स्वरुप आले आहे. शहरांसारख्या ठिकाणी गणेशोत्सवाचे बाजारीकरण झाले आहे. लोक श्रद्धेने दर्शनासाठी येतात, मात्र केवळ गर्दी वाढवण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मंडपाबाहेर भाविकांना लांबच्या लांब रांगेत उभे करुन ठेवतात. व्हीआयपी पासची रक्कम भरली की मात्र ताबडतोब दर्शन मिळते. म्हणजेच भाविकांच्या खिशातून पैसे बाहेर निघेपर्यंत गरज नसताना त्यांना ताटकळत ठेवण्यात येते.
भोळे भाविक याला बळी पडतात आणि अशा प्रकारच्या फसवणुकी होतात. सिद्धीविनायक मंदिरातही सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. इथेदेखील व्हीआयपी पासेस वाटत भक्तांना लुटले जाते. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व ठाकरे गटाचे नेते असणाऱ्या आदेश बांदेकर यांनी या बाबीकडे देखील लक्ष दिले पाहिजे.