
वाघा बॉर्डरमार्गे लाहोरला जाणार; चार दिवसांचा दौरा
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला आशिया कपसाठी (Asia Cup) पाकिस्तानला जाणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आशिया चषक स्पर्धेचे निमंत्रण स्वीकारले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला उपस्थित राहणार आहेत. श्रीलंकेहून परतल्यानंतर एक-दोन दिवसांनी बिन्नी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासोबत वाघा बॉर्डरमार्गे लाहोरला जाणार आहेत. ते ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत लाहोरमध्ये राहणार आहेत. या वेळी खेळवले जाणारे आशिया कपचे सामने पाहणार आहेत.
आशिया चषकाचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात ३० ऑगस्ट रोजी मुलतान येथे खेळला जाईल, तर भारत २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅडी येथे पाकिस्तानविरुद्ध मोहिमेची सुरुवात करेल.पीसीबीचे विद्यमान अध्यक्ष झका अश्रफ यांनी १५ ऑगस्ट रोजी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकृत निमंत्रण दिले होते. बीसीसीआयसह आशिया चषकात सहभागी संघांच्या सर्व बोर्ड सदस्यांनी पाकिस्तानला जाण्याची पुष्टी केली आहे.
या स्पर्धेतील पहिले चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील, तर अंतिम सामन्यासह उर्वरित ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. स्पर्धेत ६ संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील ६ संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटातील अव्वल २-२ संघ सुपर-४ टप्प्यात जातील.
मेजवानीचे आयोजन
रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला या दोघांना पीसीबीने ४ सप्टेंबर रोजी लाहोरमध्ये आयोजित केलेल्या अधिकृत डिनरसाठी आमंत्रित केले आहे. या वेळी अधिकृत बैठक होणार नाही. बिन्नी आणि शुक्ला त्यांच्या चार दिवसांच्या दौऱ्यात ३ किंवा ५ सप्टेंबर रोजी गद्दाफी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.