Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

सीमा देव यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत

सीमा देव यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत

मुंबई : “ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी, हिन्दी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या सहज अभिनयाने चित्रपट रसिकांच्या हृदयावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.


आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात की, सीमा देव यांचे निधन देशभरातील चित्रपट रसिक, मराठी माणसासाठी धक्कादायक आहे घटना आहे. गतवर्षी रमेश देव यांचे निधन झाले. सीमा देव आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडदा आणि वास्तव जीवनातही पती-पत्नींची आदर्श जोडी होती. सीमा देव यांचे निधन मराठी चित्रपटसृष्टी व भारतील कलाक्षेत्रासाठी मोठी हानी आहे. सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो.


सिनेसृष्टीतले बहुगुणी, सालस व्यक्तिमत्व हरपले – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


“भारतीय सिनेसृष्टीतले एक सालस व्यक्तिमत्व हरपले आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाच्या काळात चित्रपट सृष्टीसारख्या क्षेत्रात अतिशय उच्च स्थान निर्माण करतांना आणि आयुष्यभर ते स्थान कायम राखतानाही स्वतःवरील आणि आपल्या कुटुंबावरील भारतीय संस्कार जतन करणाऱ्या सीमाताई भारतीयांच्या कायम लक्षात राहतील,” अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


“सीमाताईंच्या व्यक्तिमत्वात साधेपणा आणि सुसंस्कृत, सालसपणा ठासून भरला होता. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत रमेश देव, सीमा देव या दोघांनीही आपआपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते, त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका अजरामर म्हणाव्यात अशा आहेत. ईश्वर सीमाताईंना सद्गती देवो. या दुःखाच्या काळात मी देव परिवाराच्या सोबत आहे. या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ ईश्वर देव परिवारास देवो ही प्रार्थना करतो,” असे श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Comments
Add Comment