मनाली : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातल्या अन्नी येथे आज सकाळी १० वाजताच्या सुमारास भूस्खलन (Landslides in Kullu) झाल्याने येथील बसस्टँड जवळील अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. बसस्टँडजवळ झालेल्या या भूस्खलनात जवळपास ८ ते ९ इमारती काही क्षणात कोसळून जमीनदोस्त झाल्या.
सुदैवाची गोष्ट म्हणजे, या इमारतींमध्ये कुणीही राहत नव्हते. प्रशासनाने एक आठवड्यापूर्वीच या इमारती खाली केल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे येथील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे मंडीतही भीतीचे वातावरण आहे. येथील रिसाज भागात ढगफुटीमुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. येथील लोकांनी सुरक्षित स्थळी पोहोचून, आपला जीव वाचवला आहे.
कांगडा येथील कोटला येथेही नैसर्गिक आपत्तीने धुमाकूळ घातला आहे. येथे लँडस्लाइड झाल्यानंतर घरांमध्ये मातीचा चिखल शिरला आहे. यामुळे लोकांना प्रचंड त्रास होत आहे. एवढेच नाही, तर डोंगरांवरून आलेल्या मातीच्या ढिगा-यामुळेही लोकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.