खासदार सुजय विखेंची बोचरी टीका
अहमदनगर : पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात काय चाललंय हेच कळलं नाही तर त्यांना अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील गुप्त बैठकीची माहिती असावी हा एक मोठा विनोदच आहे, अशी बोचरी टीका खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच शरद पवार यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रिपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आल्याचे भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार सुजय विखे यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी जेवढे महाराष्ट्राचे कल्याण करायचे तेवढे पुरे झाले, आता उगाच माध्यमांची प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीका टिपण्णी करू नये, असा सल्ला यावेळी विखे यांनी चव्हाण यांना दिला.
हर घर तिरंगा या उपक्रमासाठी आज नगर शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभय आगरकर, महेंद्र गंधे, बाबासाहेब वाकळे, अरुण मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.