नवी दिल्ली : जगाला शौचालयाचं महत्त्व समजावून सांगणारे आणि कोट्यावधी लोकांचं जगणं सोपे करणारे सुलभ इंटरनॅशनलचे (Sulabh International) संस्थापक बिंदेश्वर पाठक (Bindeshwar Pathak) यांनी आज जगाचा निरोप घेतला. देशातील प्रत्येक शहरात आपण जे सुलभ शौचालय पाहतोय त्यात बिंदेश्वर पाठक यांचेच योगदान आहे. सुलभ शौचालयाला इंटरनॅशनल ब्रँड त्यांनी बनवले. आज दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजच्या स्वातंत्र्यदिनी झालेल्या या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
आज सुलभ इंटरनॅशनलच्या कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. बिंदेश्वर पाठक यांचे देशातील स्वच्छता मोहिमेत देखील मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या सुलभ इंटरनॅशनलची देशभरात सुमारे ८५०० शौचालये आणि स्नानगृहे आहेत. सुलभ इंटरनॅशनलचे टॉयलेट वापरण्यासाठी ५ रुपये आणि आंघोळीसाठी १० रुपये आकारले जातात. तर अनेक ठिकाणी ते सामुदायिक वापरासाठी मोफत ठेवण्यात आले आहेत.
डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी महात्मा गांधींना आपले प्रेरणास्थान मानले. गेल्या ५० वर्षांत त्यांनी हाताने मैला साफ करणाऱ्या सफाई कामगारांच्या मानवी हक्कांसाठी अथक परिश्रम केले. हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांचे पुनर्वसन करणे, कौशल्य विकासाद्वारे पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणे, आदी त्यांच्या कार्याचे उद्दिष्ट होते. डॉ.बिंदेश्वर पाठक यांनी शांतता, सहिष्णुता आणि सशक्तीकरण यांना प्रोत्साहन देण्याचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
बिंदेश्वर पाठक अशा घरात वाढले जिथे ९ खोल्या होत्या, परंतु एकही शौचालय नव्हते. घरातील महिला सकाळी लवकर उठून बाहेर शेतावर जात. दिवसभर शौचास जाणे कठीण व्हायचे. त्यामुळे अनेक समस्या आणि आजार मागे लागायचे. हे चित्र बिंदेश्वर पाठक यांना अस्वस्थ करायचे. या समस्येवर तोडगा काढायचा असं त्यांनी ठरवलं. स्वच्छता क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचे ध्येय त्यांनी बाळगलं आणि देशात एक मोठा बदल घडला. त्याकाळी एका उच्च जातीतील पदवीधर मुलाने शौचालय क्षेत्रात काम करणे सोपे नव्हते. परंतु ते ध्येयापासून मागे हटले नाहीत.
बिंदेश्वर यांचे वडील, सासरे या सगळ्यांचाच त्यांच्या कामाला विरोध होता, मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. १९७० मध्ये बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली. ही एक सामाजिक संघटना होती. सुलभ इंटरनॅशनलने २ खड्ड्यांचे फ्लॅश टॉयलेट विकसित केले. डिस्पोजल कम्पोस्ट शौचालयाचा अविष्कार त्यांनी केला. हे काम त्यांनी इतक्या कमी खर्चात आसपास मिळणाऱ्या सामानातून केले. त्यानंतर देशभरात सुलभ शौचालय बनवण्यास सुरूवात केली. पाठक यांच्या कामगिरीने भारतात त्यांना पद्धभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. बिंदेश्वर पाठक जी यांचे निधन हे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे. ते एक द्रष्टे होते ज्यांनी सामाजिक प्रगती आणि दीनदुबळ्यांना सशक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. बिंदेश्वरजींनी स्वच्छ भारत घडवणे हे आपले ध्येय बनवले. त्यांनी स्वच्छ भारत मिशनला मोलाचे सहकार्य केले. आमच्या विविध संभाषणांमध्ये त्यांची स्वच्छतेबद्दलची तळमळ नेहमीच दिसून येत होती. त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील. असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…