
नवी दिल्ली : लोकसभेत मोदी सरकारवर मांडण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव विरोधकांच्या अनुपस्थितीत आवाजी मतदानाने फेटाळल्या नंतर काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. लोकसभेत मणिपूर आणि देशातील इतर बाबी विचारात घेऊन विरोधकांनी मोदी सरकार वर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर गेले तीन दिवस वादळी चर्चा झाली, त्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवढेच जोरदार उत्तर दिले.
चौधरी हे वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करतात आणि सांगूनही त्यावर दिलगिरी व्यक्त करीत नाहीत, असा ठपका संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांना निलंबित करण्याच्या प्रस्तावात ठेवला आणि त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचे हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवण्याचा निर्णय घ्यावा तोवर त्यांना निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव जोशी यांनी सभागृहात मांडला. विरोधक सभागृहातून सभात्याग करून बाहेर पडले होते, त्यामुळे हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. त्यापूर्वी अविश्वास प्रस्ताव देखील आवाजी मतदानाने फेटाळला गेला.