वसई : मीरा-भाईंदरपर्यंत आलेली मुंबई मेट्रो पुढे वसई-विरारपर्यंत मंजूर करीत ‘वसई-विरार मेट्रो कॉरिडॉर’ ला अंतिम मंजुरी दिली जावी, यासाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित व वसई-विरार परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष मयूरेश वाघ यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी वसई-विरार मेट्रोबाबत चर्चा करण्यात आली.
याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षेत असलेल्या वसई- विरार मेट्रो प्रकल्पाला लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याचा विश्वास खासदारांनी व्यक्त केला आहे.
केंद्र व राज्य सरकार मिळून लवकरात लवकर वसई-विरार मेट्रो कॉरिडॉर मंजूर करावा, अशी विनंती केंद्रीय मंत्री अमित शहा यांना या बैठकीत करण्यात आली. वसई-विरार महानगर क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. पुढे ही लोकसंख्या सतत वाढत जाणार आहे. येथून लाखो लोक दररोज रेल्वेने मुंबईला कामानिमित्त प्रवास करतात.
यामुळे हायवे व लोकल ट्रेनवर ताण येतो व मर्यादा येतात. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाची नितांत आवश्यकता आहे, असे या बैठकीत गावित व वाघ यांनी सांगितले. त्यावर याबाबत अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वसई-विरारपर्यंत मेट्रो आणावी, अशी मागणी सर्वप्रथम मयूरेश वाघ यांनी २०१८ मार्च महिन्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली होती. त्यावेळी विरारपर्यंत मेट्रो नेण्यासाठी मार्गाचे सर्व्हे व प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांना देण्यात आले व त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश फडणवीस यांनी दिले होते. डीपीआर बनविण्याचे काम सुरू झाले खरे पण पूर्ण झाले नाही. पुढे हा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकला नाही. आता या मेट्रो मार्गाबाबत थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना साकडे घातले गेले आहे. त्यामुळे वसई-विरार मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर पूर्ण होईल व शासनाला सादर होईल.
या प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढे वसई-विरार मेट्रोचे काम प्रत्यक्षात मार्गी लागू शकेल. वसई-विरारमध्ये मेट्रो मार्ग उभारून तो भाईंदर मेट्रो किंवा हायवेवरील एखाद्या मेट्रो स्टेशनला जोडून मुंबई-ठाण्याशी जोडला जाईल, असा विश्वास वाघ यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर व्यक्त केला.
“शहरी विकास मंत्रालय मेट्रोचा प्रस्ताव जेव्हा देईल, तेव्हा या प्रस्तावाला नक्की मंजुरी दिली जाईल. राज्य सरकारला पूर्ण सहकार्य केले जाईल. वसई-विरार मेट्रोच्या कामात आम्ही नक्कीच सहकार्य करू”, असे आश्वासन अमित शहा यांनी यावेळी दिले. त्यामुळे नजीकच्या काळात वसई-विरार मेट्रो प्रकल्प मंजूर होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे, असे खासदार राजेंद्र गावित व मेट्रोसाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ यांनी सांगितले.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…