मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून म्हाडाला २ हजार ५२१ घरे उपलब्ध झाली आहेत. या घरांची सोडत काढण्याची तयारी म्हाडाने केली आहे. त्यानुसार यापूर्वी घर न लागलेल्या शिल्लक १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार आणि वारसांची यादी म्हाडाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या यादीतील कामगार आणि वारसांचा समावेश प्रस्तावित सोडतीमध्ये करण्यात येणार असून सोडतीबाबत स्वतंत्ररित्या जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे.
मुंबईतील ५८ बंद गिरण्यांमधील गिरणी कामगारांच्या घरांकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून म्हाडाकडे २ हजार ५२१ घरे उपलब्ध झाली आहेत. या घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये मे. टाटा हाऊसिंग कं. लि. कंपनीने ठाणे जिल्ह्यात रांजनोळी येथे उभारलेली १ हजार २४४ घरे, विनय अगरवाल शिलोटर यांनी रायगड जिल्ह्यातील रायचूर येथे उभारलेली १ हजार १९ घरे आणि मे. सान्वी व्हिलेज कोल्हे तालुका पनवेल यांनी उभारलेल्या २५८ घरांचा समावेश आहे.
एकापेक्षा जास्त अर्ज असल्याने म्हाडाने गत वर्षी यादी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार नाव दुरुस्ती, गिरणी संकेत क्रमांक दुरुस्ती, एकापेक्षा जास्त अर्जांपैकी एक अर्ज ग्राह्य धरून उर्वरीत अर्ज रद्द करण्याबाबत १९ डिसेंबर २०२२ ते १७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या शिबिरामध्ये प्राप्त झालेल्या विनंती अर्जावर कार्यवाही केल्यानंतर म्हाडाने सुधारित यादी जाहीर केली आहे. ही यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून या यादीतील गिरणी कामगार वारसांचा प्रस्तावित सोडतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी सौ. वैशाली गडपाळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी यांच्याशी २६५९०९११, ६६४०५०७७ येथे संपर्क करावा.