फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
समाजात झपाट्याने वाढत चाललेले घटस्फोटांचे प्रमाण, आजही मुलं-बाळं झाल्यावर वैधव्य आलं तर दुसरा विवाह कसा करावा, मुलांना कोण स्वीकारणार या चिंतेत विधवा म्हणून आयुष्य एकाकी घालवण्याचा निर्णय घेणाऱ्या महिला, स्वतंत्र राहून पती विरोधात वर्षानुवर्षे कोर्टात केस लढत असलेल्या एकट्या अथवा मुलांसोबत वेगळ्या राहणाऱ्या महिला, अथवा अन्य कोणत्याही प्रापंचिक, सांसारिक, कौटुंबिक कलहामुळे, मतभेदामुळे, वैचारिक वादांमुळे एकट्या राहणाऱ्या महिलांची वाढत चाललेली संख्या अशा महिलांसाठी तसेच समाजासाठी देखील अतिशय त्रासदायक ठरत आहे. कुठेही, कोणत्याही कारणास्तव एकटी एकाकी आयुष्य जगणारी महिला दिसली की समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय हे सातत्याने जाणवत असते. एकाकी अथवा मुलाबाळांना सोबत घेऊन आयुष्य जगणारी महिला आर्थिक दृष्टीने स्थिर असली, कमवती असली, हुशार आणि बुद्धिमान असली, नोकरी-व्यवसायात यशस्वी असली तरीही समाज तिला दुय्यम वागणूक देत असतो. अशा महिलांचा पुरुष गैरफायदा घेतो असे बोलले जाते. पण फक्त पुरुषांना यामध्ये दोष देण्यात अर्थ नाही.
स्त्रीकडे स्वतःचा हक्काचा नवरा सोडून इतर सगळं काही असलं तरीही ती समाजासाठी एक कोडं असते. यात पूर्णतः समाजाची चूक आहे असे म्हणणे पण योग्य नाही, कारण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर जिथे कुठे विवाहबाह्य संबंधांचा प्रश्न उपस्थित झालेला दिसतो, त्याठिकाणी पुरुषाला अनैतिक संबंध ठेवण्यासाठी सहजरीत्या उपलब्ध झालेली स्त्री ही बहुतांश वेळा घटस्फोटिता, विधवा, अविवाहित अथवा पतीपासून कोणत्याही कारणास्तव लांब राहणारी असते.
समाजात थोर विचारवंतांनी महिलांसाठी जो पुनर्विवाहाचा(remarriage) कायदा केला, द्वितीय विवाहाला परवानगी दिली गेली त्यामागे त्यांचा अतिशय दूर दृष्टिकोन होता हे आज जाणवते. १८५६ मध्ये विधवा पुनर्विवाहचा कायदा होऊन देखील आजही त्याची पुरेपूर अंमलबजावणी होताना दिसत नाही. घटस्फोटित महिलांना सुद्धा कायदेशीर फारकत झाल्यावर दुसरा घरोबा करण्याचा पूर्ण हक्क आहेच. याप्रसंगी अपत्याचं काय करायचं याची देखील कायदेशीर तरतूद आहे. या कायद्यामागे मुख्य उद्देश हाच आहे की विधवा स्त्री, घटस्फोटिता स्त्री उर्वरित आयुष्यात देखील सुरक्षित राहावी, तिला हक्काचा जोडीदार, हक्काचं घर मिळावं, एकटेपणामुळे तिचं कुठेही वाकडं पाऊल पडू नये, तिच्या चरित्र्याला कलंक लागू नये, तिच्या मुलाबाळांची आबाळ होऊ नये आणि हे जाणकारांनी हेरल होते. तरीसुद्धा आज ही समाजात मनमोकळेपणाने पुनर्विवाह करणे, तशी इच्छा दर्शवणे, पुनर्विवाह केल्यास सगळ्यांनी आनंदाने ते स्वीकारणे, महिलांनी स्वतःच त्यासाठी पुढाकार घेणे, पुरुषांनी पण तयारी दर्शवणे याचे प्रमाण अत्यल्प आहे.
शारीरिक, भावनिक गरजा भागविण्यासाठी जर स्त्रीला पुरुषांची गरज अपेक्षित आहे, तर कोणत्याही विवाहित पुरुषाच्या आयुष्यात विष कालवून, त्याला स्वतःकडे आकर्षित करून, त्याला त्याच्या हक्काच्या पत्नीशी प्रतारणा करायला भाग पाडणे योग्य नाही. कोणाचा संसार मोडून स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा आणि स्वतःला सुद्धा असुरक्षित, बेभरवशाच्या, बेईज्जत करणाऱ्या बेनाम नात्यात गुंतवून घेण्यापेक्षा अशा स्त्रीने वेळेत तातडीने पुनर्विवाह करून उर्वरित आयुष्य सत्कारणी लावणे योग्य राहील.
अनेक घटस्फोटित, विधवा महिलांना ही भीती असते की दुसरे लग्न केले, तर दुसरा पती म्हणून आयुष्यात येणारा पुरुष आपल्या मुलांना स्वीकारेल का? त्याच्या घरातील लोकं आपल्याला बरं पाहतील का? आपल्याला, मुलांना तो चांगली वागणूक देईल का? त्याची देखील पहिली मुलं-बाळं स्वीकारून सगळा ताळमेळ घालणे आपल्याला जमेल का? आपली मुलं नवीन व्यक्तीला बाप म्हणून स्वीकारतील का? स्वीकारलं तरी त्यांचं नातं शेवटपर्यंत निकोप राहील का? त्याची मुलं आपल्याला मनापासून आई म्हणतील का? सख्ख, सावत्र नातं निभावायचं कसे, त्यात भेदभाव येणारच, भविष्यात काही कमी-जास्त झाले, हेही लग्न नाहीच टिकले, तर आपल्या पाठीमागे कोण उभे राहणार?
याव्यतिरिक्त आधीच्या सासरकडून मिळणारी मालमत्ता, तेथील अधिकार अबाधीत ठेवणे, माहेरील हक्क सुद्धा न सोडणे, दुसऱ्या विवाहानंतर मिळणारा मालकीहक्क कसा असेल, किती असेल, स्वतःच्या मुलांच्या नावावर होणारी प्रॉपर्टी, स्वतःच्या मुलांचे कायदेशीर हक्क, दुसऱ्या विवाहात आपली फसवणूक झाली तर? यांसारख्या असंख्य प्रश्नांना तोंड देण्यापेक्षा कोणत्याही पर पुरुषाशी आपल्या गरजेपुरते, तात्कालिक, शारीरिक समाधानापुरते आपल्याला हवं ते मिळण्यापुरते संबंध ठेवून उर्वरित आयुष्य असेच घालवणे महिला पसंत करतात. यातूनच विवाहबाह्य, अनैतिक संबंधांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते.
आपण आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी आपल्याला सुरक्षित, खात्रीशीर, शाश्वत वाटते नाही म्हणून पुनर्विवाह टाळतोय, पण त्यामुळे अनेक विवाहित पुरुषाचा संसार उद्ध्वस्त होतोय किंवा होऊ शकतोय हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला वाटते आपली मुलं दुसऱ्या पुरुषाला वडील म्हणून स्वीकारतील का? तेव्हा हाही विचार होणे आवश्यक आहे की, आपली हिच मुले आपले अनैतिक वागणं कसे स्वीकारतील? अशी बिनबुडाची नाती मुलांना कळल्याशिवाय राहतात का? जेव्हा आपल्याला वाटते, दुसऱ्या पतीच्या घरचे आपल्याला स्वच्छ मनाने स्वीकारतील का? तेव्हा हे पण लक्षात घ्यावे की, आपण ज्या पुरुषाशी अनैतिक संबंध ठेवून आहोत, त्याच्या घरात पण आपल्याला कोणी स्वीकारून मानसन्मान देणार नाहीये. ज्यावेळी आपण हा विचार करतोय की, दुसऱ्या पतीचे मूल आपल्याला, आपल्या मुलांना बर पाहतील का? तेव्हा हा ही विचार होणं आवश्यक आहे की ज्या विवाहित पुरुषाच्या आयुष्यात आपण आहोत त्याची मुलं आपल्यासोबत असलेलं त्याच्या वडिलांचं आणि आपलं अनैतिक, बदनाम नातं म्हणून आपला किती तिरस्कार करत असतील किंवा करतील? त्यांनी आपला केलेला अपमान, आपल्या मुलांना वापरलेले शब्द आपल्याला सहन होतील का?
तसेच समाजातील घटस्फोटित पुरुष, विदुर, अविवाहित पुरुष यांनी तसेच त्यांच्या घरातल्या मंडळींनी सुद्धा अशा महिलांना मोठ्या मनाने स्वीकारणे, त्यांच्या मुलांची जबाबदारी घेणे, त्यांना समाजात कायदेशीर पत्नीचा दर्जा देणे अपेक्षित आहे. जोपर्यंत एकाकी असलेले स्त्री आणि पुरुष एकमेकांना नैतिक मार्गाने आणि कायदेशीर पती-पत्नी म्हणून स्वीकारत नाहीत तोपर्यंत समाजातील चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या रिलेशनशिप, स्त्री-पुरुषाचे अनधिकृत नातेसंबंध, एकमेकांना गरजेसाठी वापरण्याची वृत्ती, विवाहबाह्य संबंधातून उसवत चाललेली कौटुंबिक, सामाजिक घडी, अनेक चांगले संसार उद्ध्वस्त होण्याचे प्रमाण कमी होणार नाही.
एकाकी असलेल्या स्त्री आणि पुरुष दोघांच्या पहिल्या अपत्यांना दुसरे हक्काचे आई-बाबा मिळणे, त्यांचं भविष्य सुरक्षित होणे, त्यांना समाजात ताठमानेने जगता येणे पुनर्विवाहामुळे शक्य होईल.
वर्षानुवर्षे एकटं राहून, कोणाच्याही आश्रयाला राहून, कोणत्याही चुकीच्या भ्रमात, खोट्या कल्पनेत, स्वप्नात जगून आपला कोणालाही शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक गैरफायदा घेऊ देणे, एखाद्याचे वापरण्याचे साधन होणे, एखाद्यासाठी चेंज म्हणून, एन्जॉय व्हावा म्हणून स्वतःचा आत्मसन्मान गहाण ठेवणे यापेक्षा महिलांनी पुनर्विवाह करुन कायमच सेटल होणं वैयक्तिक, सामाजिक दृष्टीने योग्य आहे असे वाटते.