मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या पावसाने जुलै महिन्यातील विक्रम मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे जुलै महिना संपण्यास अजूनही चार दिवस शिल्लक आहेत. मुंबईच्या सांताक्रुझ वेधशाळेत जुलै महिन्यात (२६ जुलैपर्यंत) १५५७.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याचे भारतीय हवामान विभागाने माहिती दिली आहे.
यावर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस चांगलाच बरसत आहे. सांताक्रुझमध्ये जुलै २०२० मध्ये आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. जुलै २०२० मध्ये १५०२ मिमी पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी मुंबईमध्ये २६ दिवसातच हा विक्रम मोडीत निघाला. सांताक्रुझ वेधशाळेत १५५७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अद्यापही जुलैचा महिना संपायला ४ दिवसांचा कालावधी आहे. सोबतच मुंबईत काल मुसळधार पाऊस झाला आणि आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने जुलै महिन्यातील यंदाच्या हंगामात सर्वाधिक पावसाची नोंद होणार आहे.