- चंद्रशेखर टिळक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ
लोकमान्य टिळकांची १ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी असून ती साजरी करताना त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणे उचीत ठरेल. ते केवळ देशभक्त, पत्रकार, गणितज्ञच नव्हते, तर त्यांच्या अंगी अनेक गुणांचा समुच्चय होता. त्यांचे अर्थकारणही काळाच्या पुढे बघणारे असून त्यांनी अंगीकारलेले कामही त्यांच्यातील प्रबळ अर्थजाणिवा दाखवून देणारे होते, असे आज मागे वळून बघताना जाणवते. यानिमित्ताने…
लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करताना त्यांच्या भरदार व्यक्तिमत्त्वाचे स्मरण होतेच, खेरीज त्यांच्या प्रभावी विचारांची उजळणी करणेही आवश्यक वाटते. टिळकांचे विविध विषयांवरील विचार आजच्या काळालाही तंतोतंत लागू पडतात. किंबहुना, भविष्याचा वेध घेणाऱ्या त्यांच्या विचारांमध्येच आजच्या काही चर्चित विषयांचा पाया बघायला मिळतो आणि त्याची तडही त्यांनी केलेल्या विचारमंथनातून पाहायला मिळते.
या पार्श्वभूमीवर लोकमान्यांच्या अर्थकारणावरील विचारांकडे बघता अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी हाती लागतात. इथे सांगावेसे वाटते की, आपण लोकमान्यांना नेहमीच विशिष्ट चाकोरीमध्ये अडकवतो. देशभक्त, थोर पत्रकार ही त्यांची ओळख आहेच पण यापलीकडेही त्यांचे फार मोठे काम लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकमान्य उत्तम अर्थकारणी होते. गोखले, रानडे यांच्याखालोखाल लोकमान्यांची विधिमंडळातील अर्थसंकल्पावरील भाषणे गाजली. खाडीलकर तर त्यांचे वर्णन सर्वज्ञ आणि सर्वकृत या शब्दांमध्ये करत असत. म्हणूनच लोकमान्यांचा ‘अर्थकारणी’ या नात्यानेही विचार होणे गरजेचे आहे.
लोकमान्य टिळक हे भारताच्या इतिहासातील असे पहिले राजकारणी आहेत जे पूर्णवेळ राजकारण करत होते पण चरितार्थासाठी कधीच राजकारणावर अवलंबून नव्हते. चरितार्थाची त्यांची साधने पूर्णपणे वेगळी होती, स्वतंत्र होती. त्यामुळेच कोणी विचारले तर ते मी माझा चरितार्थ चालवू शकलो नाही, तर स्वत:च्या घरातच ताठ मानेने उभा राहू शकणार नाही आणि घरातच उभा राहू शकलो नाही तर समाजात कसा राहू शकेन, वा समाजाला कसे उभे करू शकेल, असे सांगायचे. आज आपण ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चा उल्लेख करतो वा आत्मनिर्भरतेचे महत्त्व जाणून घेतो तेव्हा याचे मूर्तिमंत उदाहरण पूर्वीच लोकमान्यांनी आपल्या या कृती आणि उक्तीतून समोर आणलेले दिसून येते. ‘स्वदेशी’ हा त्यांनीच दिलेला शब्द आहे. तसेच या शब्दाचा भारतीय राजकीय स्वातंत्र्यासाठी फायदा करून घेणारी पहिली व्यक्ती म्हणजेही लोकमान्यच. मुख्य म्हणजे याची सुरुवात त्यांनी स्वत:च्या घरापासून केली होती. आजही अशी उदाहरणे अपवादानेच सापडतील. थोडक्यात, ‘आधी प्रपंच करावा नेटका…’चे हे एक वेगळे रूप लोकमान्यांच्या विचारांमध्ये बघायला मिळते.
आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारणाचा पूर्ण अभ्यास करून त्याची भारतीय स्वातंत्र्यासाठी सांगड घालणारा एक महत्त्वाचा नेता म्हणूनही लोकमान्यांचे नाव घ्यावे लागेल. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये निवडून गेल्यानंतर दादाभाई नवरोजी यांनी केलेले कार्य जनमानसापर्यंत नेण्याचे काम लोकमान्यांनी केले. संसदेमध्ये एखादा विषय मांडण्याची सुविधा असते कारण त्यावर विचार करणारी माणसे तुमच्यासमोर असतात. पण सर्वसामान्य मनुष्य आजही अर्थकारणापासून लांब आहे. लोकमान्यांच्या काळातही तो तसाच होता. तेव्हाचा सामान्य माणूसही रोजच्या धकाधकीत व्यस्त आणि व्यग्र होता; परंतु आर्थिक स्वातंत्र्य नसणे किंवा आर्थिक प्रगती नसणे हे राजकीय पारतंत्र्याचे एक मोठे कारण आहे आणि स्वतंत्र झाल्यानंतरही अर्थकारणाचा विचार केला पाहिजे, हे विचार लोकमान्यांनी मांडले आणि जनसामान्यांना पटवून दिले. आज आपण आर्थिक साक्षरतेची संकल्पना मांडली आणि स्वीकारली आहे. ती लोकमान्यांनी सुरू केली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
यासंबंधी एक उत्तम उदाहरण लक्षात घेता येईल. तेव्हा ब्रिटन सरकारने भारतासाठी दुष्काळ निवारण कायदा आणला होता. मात्र त्याचा कमी प्रसार व्हावा असाच सरकारचा साहजिक प्रयत्न होता, कारण या कायद्यात सरकारची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. पण विधिमंडळाचे सभासद असल्यामुळे टिळकांनी त्याच्या प्रती मागवून घेतल्या आणि तुम्हाला त्या जनसामान्यांमध्ये वाटण्यास अडचण असेल तर मी वाटतो, असे ठामपणे सांगितले. तद्नंतर त्यांनी संक्षिप्त स्वरूपात कायद्यातील महत्त्वपूर्ण बाबींचे मराठीत भाषांतर केले आणि ही सर्व पत्रके ‘केसरी’च्या अंकाबरोबर महाराष्ट्रभर फुकट वाटली. यामुळे हा कायदा सर्वसामान्यांना ज्ञात झाला आणि काहींना त्याचा लाभ घेता आला. ही एक कृतीही त्यांच्यातील अर्थकारण्याची ओळख देण्यास पुरेशी ठरणारी आहे.
आज आपण आत्मनिर्भरतेचा विचार करत आहोत. विशेषत: संरक्षण क्षेत्रावर आपला भर आहे. पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारता’ची घोषणा केली, नंतर पाच दिवस अर्थमंत्र्यांनी दररोज दीड-दीड तासांच्या पत्रकार परिषदा घेऊन त्याचे तपशील जाहीर केले. त्यानुसार आत्मनिर्भरतेचे सर्वात दृश्य स्वरूप आपल्याला आज संरक्षण क्षेत्रात दिसत आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये आपल्या संरक्षणविषयक गरजांच्या निदान ७५ टक्के उत्पादन भारतातच करण्याचे उद्दिष्ट समोर आहे. त्यासाठी लागणारा माल भारतीय कंपन्यांमधूनच खरेदी केला जाणार असल्याचे धोरणही ठरवण्यात आले आहे. ही बाब स्वागतार्ह असल्यामुळे सर्व थरांमधून तिचे स्वागत झाले आणि गेल्या अडीच-तीन वर्षांमध्ये त्याची अंमलबजावणी होतानाही दिसत आहे. पण याचेही उद्गाते लोकमान्य टिळकच आहेत. याचे कारण १८९१ मध्ये नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात टिळकांनी एक मागणी केली होती. ती अशी की, ब्रिटिश सैन्यासाठी लढणाऱ्या भारतीय सैन्याकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रसामग्री, दारूगोळ्याची निर्मिती भारतातच व्हायला हवी. याबाबत त्यांनी दिलेली कारणमीमांसा खूपच चांगली आहे. याची आवश्यकता काय, असे सरकारकडून विचारले जाताच ते म्हणाले होते, तुमच्या सैन्यासाठी भारतीय नागरिक लढायला हवे असतील, तर त्यांच्या मनात त्या दारूगोळ्याविषयी, शस्त्रांविषयी कोणतीही शंका असता कामा नये. हे सांगताना त्यांनी १८५७ चा दाखला दिला होता.
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे आदी मंडळींनी सुरू केलेल्या बंडामागे एक कारण होते. ते म्हणजे त्यांना देण्यात आलेल्या काडतुसांना गाईची वा डुकराची चरबी लागली असल्याची बातमी सैन्यात पसरली होती. हिंदूंना गाय पवित्र, तर मुस्लिमांना डुक्कर निषिद्ध… त्यामुळेच हे बंड उभे राहिले. तसे प्रकार टाळण्यासाठी संरक्षण साहित्यासाठी लागणारे सामान इथेच निर्माण केले, तर कोणते सामान वापरले गेले आहे, हे भारतीय सैनिकांना समजेल असे लोकमान्य म्हणाले. सरकारला सैनिकांना त्याचा तपशील द्यावाच लागणार नाही, असे प्रतिपादन करून त्यांनी हे विचार त्यांना पटवून दिले. हे ऐकून घेतल्यानंतर इंग्रज सरकारने अशा सामग्रीच्या निर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध नसल्याची बाब समोर आणली होती. तेव्हा टिळकांनी आपल्या ‘स्वदेशी’ या संकल्पनेची फोड करून सांगितली. ती सांगताना ते म्हणाले की, भारतात परकीय माल आणण्यास माझा विरोध आहे. आम्हाला परकीय भांडवल चालेल, परकीय तंत्रज्ञान चालेल. पण तुम्ही इथे परकीय तंत्रज्ञान देणार असाल तर करार-मदारामध्ये काही गोष्टी स्पष्ट असायला हव्यात. जसे की, परदेशातून इथे येणारा तंत्रकुशल कामगार आमच्या देशात किती काळ राहील, हे ठरवा आणि तो कधी परत जाईल याचीही स्पष्टता द्या. त्याने भारत सोडण्यापूर्वी स्थानिक कामगारांना पुरेसे प्रशिक्षण दिले आहे की नाही याचे ऑडिट झाले पाहिजे, असे सांगण्यास लोकमान्य विसरले नाहीत. अशा प्रकारचे कायदे आजच्या एफडीआय वा एफआयआरमध्येही नाहीत. यावरूनच टिळकांचे अर्थकारण काळाच्या किती पुढे होते हे दिसून येते.
लोकमान्य दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते होते आणि साहजिकच सरकार त्याबद्दल चालढकल करत होते. त्यावर बोलताना टिळकांनी सांगितले होते की, ब्रिटिश सरकार किती तरी जास्त उत्पन्न केवळ अबकारी करातून मिळवत असून त्यातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त भाग दारूमधून येत आहे. त्यामुळेच ब्रिटिश सरकार दारूबंदी करू इच्छित नाही. बारकाईने विचार केला, तर टिळकांनी केलेली ही चर्चा आजच्या काळालाही लागू पडताना दिसते. आजही जीएसटीमध्ये दारूचा समावेश नाही. देशातील दोन राज्ये वगळता अन्य कोणत्याही राज्यांनी अधिकृतपणे दारूबंदी केलेली नाही. आपल्याकडे आजही ‘लिकर बॅन’चा कायदा नाही.
आज शेअर बाजारात अनेक संकल्पना रूढ आहेत. एका अर्थाने त्याचेही प्रणेते वा जनक लोकमान्य टिळक आहेत. आज आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा विचार करतो. व्यवसाय-धंद्याची समग्र माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे असे मत मांडतो. टिळकांनीही त्यांच्या काळी याच मतांचा पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर बघता लोकमान्यांचे वर्णन विद्वान, विश्वासू आणि विश्वस्त पुढारी असे केले जात असे. त्यांना विश्वस्त पुढारी म्हटले जायचे कारण त्यांनी लढलेला प्रत्येक खटला स्वत:च्या पैशांनी लढला नाही. लोकांनी पैसे गोळा करून लोकमान्यांना दिले होते. मात्र एखादा खटला संपल्याबरोबर लगेचच लोकमान्य आपल्याकडे आलेला एकूण पैसा आणि त्यातून झालेला खर्च याचा तपशीलवार हिशेब ‘केसरी’तून प्रसिद्ध करत. म्हणूनच आपण त्यांना ‘फ्री अँड फेअर डिस्क्लोजर’चे जनक म्हटले, तर वावगे ठरणार नाही. आजच्या कॉर्पोरेट विश्वात आदर्श मानली जाणारी ही स्थिती त्यांनी तेव्हाच दाखवली होती. म्हणूनच टिळक उत्तम राजकारणी होतेच पण उत्तम अर्थकारणीही होते, असे म्हणायला हवे.