Thursday, March 20, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखPM Narendra modi: मोदी है इसिलिए सब मुमकीन है...

PM Narendra modi: मोदी है इसिलिए सब मुमकीन है…

जगभरात बहुतेक क्षेत्रांमध्ये सध्या भारताचा डंका वाजताना दिसत आहे. देशात २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून देशाने सर्वच क्षेत्रांत चांगलीच प्रगती केली आहे. अलीकडेच राबिवण्यात आलेली चांद्रयान मोहीम योग्य दिशेने प्रगतिपथावर असून अंतराळ क्षेत्रातील ‘इस्रो’ची कामगिरीही नेत्रदीपक अशीच म्हणायला हवी. आपण स्वदेशी उपग्रहांसोबतच अन्य देशांच्या काही व्यावसायिक उपग्रहांचेही यशस्वी प्रक्षेपण करण्यास प्रारंभ केला आहे. या कामगिरीमुळे जगातील आपला दबदबा वाढला आहे. व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोन, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे धोरण यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांत जोरदार घोडदौड सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०१४ ला जेव्हा देशाचा कारभार हाती घेतला तेव्हा देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमाकांवर होती. नंतर २०१९ मध्ये दुसऱ्या कार्यकाळात भारत देश जगातला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनला.

त्यानंतर मोदी सरकारच्या आगामी तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, असा जबरदस्त विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास लाजवाब असाच म्हणावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रगती मैदानातील कन्व्हेंशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आणि सर्व बाबतीत नकारघंटा वाजविणाऱ्या विराेधकांच्या नांग्याच जणू ठेचून काढल्या. या नव्या वास्तूचे नाव ‘भारत मंडपम’ असे ठेवण्यात आले आहे. भारत मंडपमचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात भारत मंडपमची ही वास्तू बांधून ज्यांनी पूर्ण केली त्या श्रमिकांचे आभार मानले. हा केव्हढा मनाचा मोठेपणा. हे केवळ मोदीच करो जाणे.

दिल्ली विमानतळाची क्षमता २०१४ मध्ये वर्षाला ५ कोटी प्रवासी एवढी होती. आता ती क्षमता साडेसात कोटी झाली आहे. टर्मिनल टू आणि चौथा रनवेही सुरू झाला आहे. दिल्लीत लवकरच जगातले सर्वात मोठे ‘युगे युगे भारत’ हे संग्रहालय देखील निर्माण केले जाणार आहे. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. काही गोष्टी अकल्पनीय अशा होत्या, त्या सुद्धा भारत आज सहजगत्या करतो आहे. मोदींच्या म्हणण्यानुसार आपल्याला मोठे लक्ष्य गाठायचे असल्यास थिंक बिग, अॅक्ट बिग, ड्रीम बिग या सिद्धांतावर पुढे जावे लागेल. संपूर्ण जगभरात विविध संमेलने होत असतात. कधी एका देशात तर कधी दुसऱ्या देशात हे कार्यक्रम होतात. त्यामुळे भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत एक कन्व्हेन्शन सेंटर असणे खूप आवश्यक होते. त्यामुळेच भारत मंडपम या भव्य प्रासादाची निर्मिती करण्यात आली आहे. २१ व्या शतकात आपल्याला २१ व्या शतकासाठी आवश्यक असलेल्या वास्तूची गरज होती आणि ती परिपूर्ण झाली हे महत्त्वाचे.

भारत मंडपम या नावामागे भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपमची प्रेरणा आहे. विशेष म्हणजे भारत लोकशाहीची जननी आहे हे अवघ्या जगाने स्वीकारले आहे. तामिळनाडूतल्या उत्तरा मेरू ते वैशालीपर्यंत भारत हा आपला गौरव आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असताना भारत मंडपम ही लोकशाहीला मिळालेली एक सुंदर भेट आहे. काही दिवसांनी ‘जी-२०’ ची परिषदही या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे भारताची पावले आणि भारताची जगभरात वाढणारी उंची याची ओळख संपूर्ण जगाला या भारत मंडपममधून होणार हे निश्चित.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश झपाट्याने सकारात्मकतेने प्रगती साधत असताना काही वेगळ्या विचारधारेचेही लोक या प्रगतीत खोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसतात. आपल्या देशात नकारात्मक विचार करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यांनी अनेक वेळा अनेक गोष्टींमध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. काही लोकांची प्रवृत्ती असते की, चांगल्या कामात खोडा घालायचा. त्यांनी भारत मंडपमची निर्मिती रोखण्यासाठीही खूप प्रयत्न केले. हे प्रकरण कोर्टात नेले तिथेही अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. पण जिथे सत्य असते तिथे देवाचा वास असतो याप्रमाणे आता ही सुंदर वास्तू उभी राहिली आहे. कर्तव्यपथही तयार होत असताना काही लोकांनी त्याच्या मार्गातही खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण त्याला भीक न घालता मोदींनी तो प्रकल्प पूर्ण केला. आता कर्तव्यपथ पूर्णत्वास आल्यानंतर हेच विरोधक दबक्या आवाजात का होईना त्याचे कौतुक करीत आहेत. आता भारत मंडपम हे देशात कॉन्फरन्स टुरिझमचे मोठे माध्यम ठरणार आहे. आपल्या सिनेमा जगतासाठी ही वास्तू एक लोकप्रिय मंच ठरण्याची शक्यता आहे. तसेच वास्तुशिल्प, काष्ठ शिल्प आणि इतर कलांसाठी ते महत्त्वाचे ठरणार यात काहीही शंका नाही. हा विशाल परिसर, हे भारत मंडपम हा सर्वात मोठा मंच होईल. खरं म्हणजे या भारत मंडपमची निर्मिती आधीच व्हायला हवी होती. पण ते होऊ शकले नाही. कारण त्यासाठी मोदींसारख्या दुरदृष्टी असलेल्या नेत्याच्या हाती देशाची कमान असणे हे क्रमप्राप्त होते. त्यामुळे एका मागोमाग एक अशी अनेक चांगली कामे मोदी यांच्या हातूनच होताना दिसत आहेत. म्हणूनच मोदी है इसिलिए सब मुमकीन है, ही बाब आता सत्यात उतरत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -