
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा खळबळजनक आरोप
नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराची वस्तुस्थिती काँग्रेस लपवत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनीच (Rahul Gandhi) मणिपूरमध्ये आग लावल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांनी केले आहे. पावसाळी अधिवेशनात संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला त्यांनी हा आरोप केला.
मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी देखील लोकसभा आणि राज्यसभेत मणिपूर मुद्द्यावर चर्चे करण्याची मागणी केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बुधवारी मणिपूरच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर चांगल्याच भडकल्या.
केंद्र सरकारमधील एकही महिला मंत्री या विषयावर बोलण्यास तयार आहे का, असा सवाल काँग्रेस खासदार यमी याज्ञिक यांनी संसदेत केला. यमी याज्ञिक यांच्या वक्तव्यावर स्मृती इराणी संतापल्या. त्यांनी आक्षेप घेत सांगिलते की, केवळ महिला मंत्र्यांनीच नाही तर सर्व महिला राजकीय नेत्यांनीही मणिपूर बरोबरच छत्तीसगड, राजस्थान आणि बिहारमधील घटनांकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. स्मृती इराणी यांनी यमी याज्ञिक यांना विचारले की, या राज्यांतील घटनांवर बोलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे का?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, “छत्तीसगडमध्ये घडलेल्या घटनांबद्दल बोलण्याची ताकद तुमच्यात आहे का? राजस्थानमध्ये घडलेल्या घटनांबद्दल बोलण्याची ताकद तुमच्यात आहे का? बिहारबद्दल बोलण्याची ताकद आहे का? लाल डायरीबद्दल बोलण्याची ताकद तुमच्यात आहे का? एवढेच नाही तर काँग्रेसचा एक नेता तिथे गेल्याने मणिपूर पेटू लागले, असे म्हणण्याची हिंमत कधी होणार? राहुल गांधींनी मणिपूरला आग कशी लावली हे सांगण्याची हिंमत तुम्हाला कधी येईल, असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला.
स्मृती इराणी म्हणाल्या, काँग्रेसशासित राज्यांमध्ये बलात्काराच्या मुद्द्यावर बोलण्याची ताकद किंवा हिंमत तुमच्यात आहे का? असा सवाल करत याज्ञिक यांना इशारा दिला की, या मुद्दय़ांवर बोलण्याची हिंमत नसेल तर त्यांनी सरकारवर अवाजवी दबाव आणू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.