तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच एकनाथ शिंदे पोहोचले पंढरपुरात
पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंढपुरला अचानक भेट देऊन आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री हे आषाढी एकादशीच्या दिवशी विशेष अतिथी असतात. त्यांच्याच हस्ते विठ्ठलाची पूजा देखील केली जाते. असे असूनही त्यांनी थेट आषाढी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
महाराष्ट्रात बीआरएस आपले बस्तान मांडण्यासाठी हातपाय पसरत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी (२७ जून) रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) त्यांच्या मंत्रिमंडळासहित आमदार आणि खासदारांना घेऊन सोलापुरात दाखल होणार आहेत. पण त्याआधीच मुख्यमंत्री शिंदे रविवारी (२५ जून) रोजी नांदेडमधून थेट विमानाने सोलापुरात पोहचले. तसेच त्यांनी पंढरपुरात पाहणी करुन वारकऱ्यांशी देखील संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पंढरपूरमधील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डांबरी रस्ते झाले पाहिजेत यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. दर्शनासाठी वारकऱ्यांची रांग लागते तिथे त्यांना त्रास होऊ नये यासाठी मंडप उभा केलेला आहे. पाऊस आणि ऊनापासून संरक्षण व्हावे याची काळजी घेतली आहे. हे सगळे नियोजनबद्ध केले आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे, ठिकठिकाणी पंखे लावण्यात आले आहेत, महिलांसाठी स्नानगृह मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली आहेत, चेजींग रुम आहेत, टॉलेटची व्यवस्था केली आहे. वारीच्या काळात स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी येणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. तसेच त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. अनेक ठिकाणी कॅम्प लावण्यात आले आहेत. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली आहे. कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान वारकऱ्यांना दिलेल्या सुविधांसाठी ते खूष असून त्यामुळे आपण देखील समाधानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पंढपूर देखील खड्डेमुक्त झाले असून आपण दिलेला निधी पूर्णत्वास गेल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी चंद्रभागा स्वच्छता व पंढरपुरातील इतर वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा देखील आढावा घेतला. तर चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याविषयी बोलताना त्यांनी म्हटले की, ‘प्रत्येक विठ्ठल भक्ताला दर्शन घेण्याचा अधिकार आहे, विठुराया सर्वांचा आहे.’
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra