कोपरगाव : मराठी साहित्यविश्वातील वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ या अजरामर नाट्यकृतीतील गणपत बेलवलकरांची शेवटची अवस्था वाचली की डोळ्यांच्या कडा आपसूक ओल्या होतात. आधी नट म्हणून रंगभूमी गाजवलेले बेलवलकर नंतर मात्र एकटे पडतात. ही काल्पनिक नाट्यकृती असली तरी नाटक म्हणजे एक प्रकारे समाजाचेच प्रतिबिंब. याचं कारण म्हणजे एकेकाळी रंगभूमी गाजवलेल्या अनेक कलाकारांची आज दयनीय अवस्था आहे. असंच आज विस्मरणात गेलेलं पण एकेकाळी तमाशाच्या फडात ज्या नावाने टाळ्या, शिट्टयांचा पाऊस पडत होता, ते नाव म्हणजे ‘शांताबाई कोपरगावकर’.
एकीकडे गौतमी पाटीलच्या लावण्यांना प्रेक्षक भरमसाठ गर्दी करुन मार्केट जाम करतात, तर दुसरीकडे अनेक लोककलावंत काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्याने हलाखीचे जीवन जगतात. अशाच एका आपल्या सदाबहार लावणी नृत्याने महाराष्ट्र गाजवणाऱ्या आणि आपल्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या, शिट्ट्यांनी दणाणून टाकणा-या लावणी सम्राज्ञीवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली आहे. शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर असं त्यांचं नाव आहे.
काही दिवसांपूर्वी शांताबाईची लकब, अदाकारी, हातांची फिरकी आणि डोळ्यांची भिरकी बघून कुणीतरी त्यांचा व्हिडीओ बनवून सोशल माध्यमांवर टाकला. शांताबाईंचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. खान्देश भागातील काही तमाशा कलावंतांनी हा व्हिडीओ बघितला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला. खरात यांनी दोन दिवस शांताबाईंचा शोध घेतला आणि अखेर त्या कोपरगाव बसस्थानकात आढळून आल्या. शांताबाईंचे वय आज ७५ वर्षे आहे. मात्र विस्कटलेले केस, फाटकी साडी, सोबत कपड्यांचे बोजके अशा अवस्थेतील शांताबाई बस स्थानकावर आजही “ओळख जुनी धरून मनी” ही लावणी गात बसलेल्या असतात.
शांताबाईंची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून चाळीस वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी शांताबाई कोपरगावकर हा तमाशा काढला होता. या तमाशा फडाच्या पुढे शांताबाई मालक झाल्या आणि पन्नास-साठ लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला. या फडाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि पैसाही मिळू लागला. पण अचानक काळाने घाला घातला. इमानेइतबारे आपली कला जोपासणा-या या लावणीसम्राज्ञीची कोणीतरी फसवणूक केल्याचे सांगण्यात येते.
यानंतर हातचे सर्वकाही गेल्याने त्यांना मानसिक आजार जडला. त्या अवस्थेतच त्या भीक मागू लागल्या. त्यांना घरचं किंवा जवळचं असं कुणीच नसल्याने बसस्थानकालाच त्यांनी घर बनवलं व आजही त्या दयनीय अवस्थेत तिथे भीक मागताना दिसतात.
शांताबाईंसारखे अनेक लोककलावंत आहेत जे काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्याने हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने शासनासह समाजाने पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. तसंच शांताबाईंना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असून हलाखीचे जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राज्य सरकारने त्यांना वाढीव मानधनासह वैद्यकीय मदत आणि राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. अशोक गावीत्रे यांनी सांगितलं.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…