मृतदेह कुजलेल्या आणि प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत; नेमकं झालं काय?
वेल्हे : राज्यात एमपीएससीच्या (MPSC) परिक्षेत तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली दर्शना पवार ही २६ वर्षीय तरुणी गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या घरच्यांनीच ती हरवल्याची पोलिसांत तक्रार (Missing Complaint) केली होती. मात्र वेल्हे तालुक्यातील राजगड (Rajgad) पायथ्याजवळ सतीचा माळ येथे या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली असून याबाबत पोलिसांचा युद्धपातळीवर तपास सुरु आहे.
वेल्हे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांना मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहाचा काही भाग प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत होता. तिच्या बाजूला पांढ-या रंगाचे बुट, गुलाबी कव्हर असलेला मोबाईल, काळ्या रंगाचा गॅागल, काळ्या रंगाची बॅग, काळ्या निळ्या रंगाचे जर्कींग पडलेले सापडले. ही तरुणी राहुल हांडोरे या तिच्या मित्रासोबत १२ जूनला ट्रेकिंगला गेली होती. याच मित्राने हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहून हा संशय वर्तवण्यात येत आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार राहुल गडावरुन एकटाच परतला
दर्शना आणि राहुल दोघेही १२ जूनला राजगडावर दुचाकीने गेले होते. साधारण सव्वासहा वाजता ते गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. मात्र राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, १० वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. राहुल सध्या बेपत्ता असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाईलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे. मात्र दुसऱ्यांच्या फोनवरुन त्याने घरच्यांना फोन करुन काही माहिती दिली आहे आणि या प्रकरणात मी काहीही केलं नसल्याचं घरच्यांना सांगितलं आहे.
नेमकं काय झालं?
दर्शनाने नुकतीच स्पर्धा परीक्षा देऊन वनअधिकारी (Forest Officer)म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले होते. पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमीच्या वतीने तिचा सत्कार समारंभ होता. त्यानिमित्ताने ती ९ तारखेला पुण्यात आली होती. तिच्या नर्हे येथील एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी मैत्रिणीला सिंहगड व राजगड किल्याला ट्रेकींगसाठी जात असल्याचे तिने सांगितले होते.
दर्शना आणि तिचा मित्र राहुल हांडोरे १२ जूनला ट्रेकिंगला गेले होते. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती घरातील लोकांच्या संपर्कात होती. मात्र, १२ जूनला दर्शना गेल्यानंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर दर्शनाने फोन उचलला नाही. यानंतर दर्शनाच्या कुटुंबियांनी स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे जाऊन चौकशी केली. त्यावेळी दर्शना आणि तिचा मित्र राहुल हांडोरे सिंहगड आणि राजगड येथे फिरण्यासाठी गेल्याचे कुटुंबियांना समजले. परंतु, दोघांचाही फोन बंद असल्याने दर्शनाच्या घरच्यांनी सिंहगड रोड पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर अचानक राजगडाच्या पायथ्याची या तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
त्याचदरम्यान दर्शनासोबत गेलेला तरूण देखील बेपत्ता असल्याबाबत समोर आले. त्याच्या कुटुंबाने याबाबत वारजे माळवाडी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला. १२ जूनच्या दुपारनंतर या दोघांचे मोबाईल बंद झाले होते. शेवटचे लोकेशन वेल्हा येथील आल्याने त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू होता. सध्या सिंहगड रोड, वारजे आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा एकत्रित तपास केला जात आहे.