पुणे : अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाल्याने मान्सूनच्या वाटचालीबाबत भीती निर्माण झाली होती. परंतु, हे चक्रीवादळ समुद्रात उत्तरेकडे सरकल्याने मान्सूनच्या वाटचालीला आता पोषक वातावरण तयार झाले आहे. मान्सूनची वाटचाल गतीने झाली व तो अपेक्षेपेक्षा आठ दिवस लवकर रविवारी (११ जून) संपूर्ण गोव्यासह तळकोकणात दाखल झाला. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी ही माहिती दिली.
केरळमध्ये यंदा मान्सून उशिरा ८ जूनला दाखल झाला. त्यामुळे त्याचा पुढील प्रवासही उशिराच होईल अशी अपेक्षा होती. मात्र अरबी समुद्रातील चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्याने मान्सूनची वाटचाल गतीने झाली व तो अपेक्षेपेक्षा आठ दिवस लवकर दाखल झाला. वातावरण असेच राहिले तर येत्या ४८ तासांत मुंबईत, तर उर्वरित महाराष्ट्रात तो १५ ते १७ जूनदरम्यान दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत सोमवारी जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.