Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमान्सून आपत्तींचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज

मान्सून आपत्तींचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

कोणे एकेकाळी हवाहवासा पाऊस हल्ली मात्र मुंबईकरांना नको नको असा वाटू लागला आहे. पाऊस म्हटला की, हल्ली मुंबईकरांना धडकीच भरते. खड्ड्यात गेलेले रस्ते, पाण्यात बुडणारी मुंबई, ठप्प पडणारी रेल्वे सेवा, निर्माण होणारे खड्डे, त्यात २६ जुलैची आठवण म्हणजे मुंबईकरांना नको नकोशीच. मात्र हे सर्व असले तरी आपली मुंबई महापालिका दर पावसाळ्यात नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून झटत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात गेल्या ९ वर्षांमध्ये नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान देशात आणले गेले, त्याचाही फायदा मुंबई महापालिकेला होत गेला आहे.
यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी पालिकेने कंबर कसली असून निरनिराळ्या उपाययोजना केल्या आहेत. यंदाही मुंबई पालिकेने ‘आयफ्लोज’ ही नवी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरीत्या पूरप्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन कक्षासोबत संपर्क साधण्यासाठीच्या हॉटलाइन्स, आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरता निवारा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आणि मोबाइल अॅप यासारख्या सुविधा नागरिकांसाठी पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच २४ प्रशासकीय कार्यालयांमध्ये ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. ‘मान्सून-२०२३’ सुसज्जतेबाबत महापालिकेद्वारे सर्वस्तरिय कार्यवाही करण्यात आली आहे. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने यंदाच्या पावसाळ्यासाठी विविध यंत्रणांसोबत सुसज्जतेसाठी समन्वय साधला आहे.

पालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. त्यासोबतच ५८ हॉट लाइन्सची सुविधाही असणार आहे. २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाह्य यंत्रणांना जोडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांमार्फत मुंबईत बसविण्यात आलेल्या ५३६१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्याकरिता व्हीडिओ वॉलची सुविधा आपत्कालीन कक्षात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आपत्ती प्रसंगी वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी तसेच आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांकरिता तात्पुरता आश्रय मिळावा म्हणून निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षातील संदेशवहन व समन्वय वर्षाचे ३६५ दिवस २४ तास कार्यरत असतो. पालिकेचा मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष वर्षभर २४ तास आपले काम चोख बजावत असते. आणीबाणीप्रसंगी महापालिका आयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्यातील संदेशवहन सुलभ व्हावे, याकरिता अतिमहत्त्वाच्या ६१ ठिकाणांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणाली कार्यान्वित राहणार आहे.

हेल्पलाइन क्रमांक १९१६ : १९१६ क्रमांकाच्या ३० लाइन्स हंटिंग सुविधेसह तत्पर असतील. थेट दूरध्वनी क्रमांक – २२६९४७२५/२७, २२७०४४०३ फॅक्स- २२६९४७१९ हे उपलब्ध राहील. मुंबई पोलिसांमार्फत मुंबईत बसविण्यात आलेल्या ५३६१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पहाण्याकरिता व्हीडिओ वॉलची सुविधा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्राप्त होणाऱ्या थेट चलत छायाचित्रणाचे नियमित अवलोकन करतील. विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे नियमित अवलोकन करता यावे, यासाठी ३ दूरचित्रवाणी संच बसवण्यात येणार आहेत. नियंत्रण कक्षातील संदेशवहन यंत्रणा कोलमडल्यास त्वरित संदेशवहनाकरिता हॅम रेडिओ तयार ठेवण्यात आलेला आहे. महापालिकेतील मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात काही समस्या उद्भवल्यास समन्वय कार्य अबाधितपणे व्हावे, यासाठी पर्यायी नियंत्रण कक्ष परळ परिसरातील साईबाबा मार्गावरील बेस्ट वसाहतीच्या शेजारी असणाऱ्या शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत सुरू करण्यात आलेला आहे.

हा नियंत्रण कक्ष संपूर्ण वर्षभर व दिवसाचे २४ तास कार्यरत आहे. तसेच येथे आवश्यक ते मनुष्यबळ कार्यतत्पर ठेवण्यात आले आहे. बॅकअप नियंत्रण कक्ष मुख्य नियंत्रण कक्षाप्रमाणेच हॉट लाइन्स, बिनतारी यंत्रणा, हॅम रेडिओ यांनी जोडलेला आहे. तसेच हेल्पलाइन क्रमांक १९१६ यावर येणाऱ्या तक्रारी नोंदविण्याची पर्यायी व्यवस्था आहे. महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व २४ प्रशासकिय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. या प्रत्येक नियंत्रण कक्षांमध्ये थेट दूरध्वनी सेवा देण्यात आली आहे. या सोबतच बिनतारी यंत्रणा व ४ हॉटलाइन्सही प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या हॉटलाइन्सद्वारे मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, संबंधित परिमंडळीय सहाय्यक पोलीस आयुक्त, स्थानिक अग्निशमन केंद्र व शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्ष यांच्याशी तत्काळ संपर्क साधता येणार आहे. नियंत्रण कक्षांमध्ये स्वतंत्र मनुष्यबळः सर्व २४ विभागीय नियंत्रण कक्षात प्रत्येक सत्रात १ याप्रमाणे ३ सत्रांमध्ये ३ कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार सर्व २४ विभागीय नियंत्रण कक्षांमध्ये ७२ कर्मचारी तसेच पर्यायी स्वरुपातील १२ कर्मचारी याप्रमाणे एकूण ८४ नियंत्रण कक्ष चालक उपलब्ध आहेत.

मान्सून कालावधीत झाड किंवा झाडांच्या फांद्या पडण्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. याबाबत त्वरित कार्यवाहीसाठी विभाग कार्यालयात कनिष्ठ वृक्ष अवेक्षक (JTO) यांची तिन्ही सत्रांमध्ये अनुक्रमानुसार नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे दिवसाचे २४ तास याबाबतचे समन्वय करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय विभागांमध्ये पडलेली झाडे कापणे व उचलणे याकरिता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. आपत्तीप्रसंगी तात्पुरता निवाराः वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेले प्रवाशी, आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांसाठी तात्पुरता आश्रय मिळावा म्हणून पालिकेच्या प्रत्येक विभागातील ५ शाळा आणीबाणीत तात्पुरत्या स्वरूपावर एकत्रित जमण्याची ठिकाणे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत शहर व उपनगरात ४७७ ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच बसविण्यात आले आहेत. या पंपांच्या चालकांसोबत सुसमन्वय साधता यावा, यासाठी संबंधित कंत्राटदारांचे प्रतिनिधी पर्जन्य जलवाहिन्या नियंत्रण कक्षात कार्यतत्पर आहेत.

  • मान्सून कालावधीत आकस्मिक खर्चाकरिता १ लाखांचे अग्रधन प्रत्येक विभागास उपलब्ध करून देण्यात आले आहे.
  • मान्सून कालावधीत महापालिकेतर्फे घटनास्थळी जाऊन काम करणाऱ्यांची ओळख पटावी, यासाठी सर्व संबंधित कामगारांना पालिकेचे नाव असलेली ‘ब्राइट’ रंगाची रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. समुद्रावरील सुरक्षितता मान्सून कालावधीत समुद्रास येणाऱ्या मोठ्या भरतीच्या दिवशी (४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा) तसेच शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी नागरिक समुद्रात बुडण्यासारख्या दुर्देवी घटना घडू नयेत, याकरिता ६ समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, पोलीस पेट्रोलिंग वाहने तैनात असतील. नागरिकांनी समुद्रात प्रवेश करून अपघात घडू नयेत, यासाठी समुद्रावर धोक्याच्या सूचना देणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत. अग्निशमन दल पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी पूर प्रतिसाद पथकामध्ये १२३ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला कमानी, चेंबूर, मरोळ व बोरिवली या अग्निशमन केंद्रांवर तैनात करण्यात आले आहे.(क्रमश:)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -