Friday, December 13, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखआनंदी बना, आनंदी जगा!

आनंदी बना, आनंदी जगा!

  • दृष्टिक्षेप : डॉ. उदय निरगुडकर, ज्येष्ठ अभ्यासक

आज उत्तम आरोग्य सेवांमुळे सरासरी आयुर्मान वाढले असून विभक्त कुटुंबपद्धतीमुळे वृद्धांच्या नशिबी एकटे राहणे आले आहे. अमेरिकेतील सायकॉलॉजी हेल्थ सोसायटीच्या अहवालानुसार, आज तीन चतुर्थांश अमेरिकन एकाकी जगत आहे. एकाकीपणा हा एक मोठा विकार बनत असून सर्व वयोगटातील, आर्थिक स्तरांमधील स्त्री-पुरुषांना ग्रासत आहे. डायबेटिसची, कॅन्सरची होते तेवढी त्याची चर्चा होत नाही, इतकेच. त्याचाच हा खास वेध.

काही दिवसांपूर्वी एक हृदयद्रावक प्रसंग ऐकायला मिळाला. एक वृद्ध आजोबा पेशंट म्हणून डॉक्टरकडे आले. तसे ते जुने पेशंट पण अलीकडच्या वर्षा-दीड वर्षांत वयोपरत्वे लागणाऱ्या नियमित चाचणीसाठी आलेच नव्हते. एरव्ही नियमित असणारे आजोबा असे अनियमित झाल्याचे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. समोर बसताच त्यांनी इसीजी काढू या, असे सुचवले आणि रक्तदाब पाहायला सुरुवात केली. आजोबांच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळले. ते ढसाढसा रडायला लागले. स्टाफने त्यांना बसवले, हाताला धरून पाणी पाजले. थोड्या वेळाने हुंदके शांत झाल्यावर काही त्रास होतोय का, असे विचारले असता त्यांनी नकारार्थी मान हलवली. आजोबा तसे सधन. पत्नीचे तीन वर्षांपूर्वी कोरोनाने निधन झाले. सुदैवाने त्यांची तब्येत उत्तम. जवळचे नातेवाईक निवर्तले होते. सततच्या बदलीमुळे एखादा छंद अथवा मित्रपरिवार जमवता आला नाही. मुले अमेरिकेत सेटल झालेली. हे इथे एवढ्या मोठ्या घरात एकटेच. त्यांनी पुन्हा डोळ्यांत अश्रू आणून सांगितले, वर्षा-सव्वा वर्षानंतर कोणाचा तरी स्पर्श झाला आणि बोलायला मिळाले म्हणून रडू आले. हा प्रसंग ऐकताच शहारायला झाले.

खरेच एकाकीपणा इतका वाढलाय का? आज उत्तम आरोग्य सेवांमुळे सरासरी आयुर्मान वाढतेय, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वृद्धांच्या नशिबी एकटे राहणे आले आहे. म्हणजे हा प्रश्न फक्त वृद्धांचा आहे. त्याच वेळी अमेरिकेतील सायकॉलॉजी हेल्थ सोसायटीचा अहवाल वाचनात आला अन् धक्काच बसला. आजघडीला तीन चतुर्थांश अमेरिका एकटेपण सोसत असून एकाकी जगत आहे. याचाच अर्थ एकाकीपणा हा समाजासमोरचा एक मोठा धोका आहे. तो सर्व वयोगटातील, सर्व आर्थिक स्तरांवरील स्त्री पुरुषांना ग्रासतोय. लठ्ठपणाची, डायबेटिसची, कॅन्सरची होते तेवढी एकटेपणाची चर्चा होत नाही.

खरे तर या एकाकीपणाची सुरुवात लहानपणापासूनच होते. पण त्याविषयी कोणी बोलत नाही. आठवा, गर्दीत गेल्यावर आपण आई-वडीलांचे हात घट्ट धरायचो. भीतीची सुरुवात अशी होते. लहानपणी घरी एकट्याने रहायचा प्रसंग आला तरी आठवणीने आजही अंगावर काटा उभा राहतो. याचे कारण माणसाच्या मनात खोलवर कुठे तरी एकटेपणाची भीती दडली आहे, एक प्रकारची असुरक्षिततेची भावना खोलवर रुजली आहे. आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर एकटेपण सोसावे लागते तेव्हा शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम होत जातात. याच संशोधनात एकटेपणा हा अतिस्थुलत्व आणि धूम्रपान यांच्यापेक्षा भीषण आणि धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. आजच्या काळात हृदयरोग, डिप्रेशन, विस्मरण या सगळ्याचे मूळ या एकाकीपणामध्ये असल्याचे समोर आले आहे. हजारो वर्षांपूर्वी मानव शिकार करून जगायचा, तेव्हा सुरक्षेसाठी एकत्रित रहायचा. अगदी रात्री झोपतानासुद्धा गुहेबाहेर कुणी तरी शेकोटी करून पहारा देत असायचे. त्यावर विश्वास टाकून आत माणसे निर्धास्त झोपायची. आज समाज बदलला, जीवनपद्धती बदलली पण मेंदुमध्ये खोलवर रुजलेला एकाकीपण आणि त्या अनुषंगाने येणारी भीती ही भावना आजही तितकाच ताण उत्पन्न करते. म्हणजे हजारो वर्षांमध्ये बाकी सर्व बदलले पण आमच्या डीएनएमध्ये असलेली गुणसूत्रांमधील काही स्वभाववैशिष्ट्ये जशीच्या तशी आहेत.

आपण एकाकी आहोत हे अनेकांना कळत नाही. किंबहुना, इतर अनेक आजारांचे मूळ आपल्या मनातील एकटेपणाच्या भावनेत आहे हे देखील जाणवत नाही. एकटेपणा ही मनाची एक अवस्था आहे. प्रत्येकाला आपल्या भवतालासोबत सातत्याने एक ‘कनेक्ट’ हवा असतो. त्यात थोडीशी गॅप पडली तरी माणसे विचित्र वागायला लागतात. अशा प्रकारचे रोगी बाह्यअंगाने उत्तम दिसतात. पण आत खोलवर खचत जातात. अशाच परिस्थितीत दुसरी एखादी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने विचार करते अथवा राहते. याचाच अर्थ हे व्यक्तीसापेक्ष आहे. पण आपण यातील एक आहोत हे मान्य करण्याची आम्हाला लाज वाटते. झालेला कॅन्सर, टीबी, डायबेटिस याविषयी लोक बोलतात. पण एकटेपणाविषयी बोलणे आपल्यामध्ये निषिद्ध… त्यामुळे काहीजण समाजातून तुटल्यासारखे होतात. सतत दुखी बनतात अथवा क्षणोक्षणी चिडणारे रागीट बनतात. प्रत्येकाची व्यक्त होण्याची, प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगवेगळी असते एवढेच. अशी माणसे कुटुंबात असणे एक प्रकारचा ताणतणाव निर्माण करते. आज हे फक्त शहरात नाही, तर खेडेगावातही दिसतेय. आज खरे तर संवादाची, तंत्रज्ञानाची साधने खूप वाढली आहेत. क्षणार्धात कोणालाही व्हीडीओच्या माध्यमातून जोडता येते. माणसे एकमेकांशी बोलतातही; परंतु त्या बोलण्यामध्ये क्वालिटी नसते; फक्त क्वाँटिटी असते. म्हणजे ‘फेसबुकवर पाच हजार मित्र अन् गल्लीत विचारत नाही कुत्रं’ अशी अवस्था आज निर्माण झाली आहे. यावर मात करणारे ‘सपोर्ट मेकॅनिझम’ आपल्याकडे बहुतांशी उपलब्ध नसते.

प्रत्येकाला तीन बाबींची विशेष गरज असते. आपले ऐकले गेले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. दुसरे म्हणजे मी माझ्या भवतालासाठी महत्त्वाचा घटक आहे, असे त्याचे म्हणणे असते आणि तिसरे म्हणजे आपण कोणाला तरी हवेहवेसे वाटतोय आणि कुणावर तरी प्रेम करतो, याचाही आधार असतो. दुर्दैवाने आज समाजात या तिन्ही बाबींचा अभाव आहे. कार्यालयात आई-वडील एकाकी, शाळा- कॉलेजमध्ये मुले एकटी आणि घरी आजी आजोबा रिकाम्या भिंतींकडे बघत बसलेले… अशी विस्कटलेली घरटी एकाकीपण घेऊन जगत आहेत. माणसाच्या उत्क्रांतीपासून आजपर्यंत सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे उत्तम मित्रांची वानवा.

माणसे खूप बोलतात पण त्यामध्ये मैत्र असतेच असे नाही. अगदी जवळच्या मित्रालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाऊन भेटणे शक्य होत नाही. अलिकडे तर फोनही होत नाही. फेसबुक आणि ट्विटरवर अंगठा पाठवला की झाल्या भावना व्यक्त! सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसेच एकाकीपणात भीषण भर घालणारे तोटेही आहेत. कोरोनाच्या साथीमुळे माणसे अधिक एकाकी बनली. त्याचे गंभीर दुष्परिणाम आता समोर येत आहेत. सोशल मीडियावर उत्साहाने भाग घेणारी माणसे अचानक गायब आणि शांत होतात. समाजात भाग घेऊन अधिक परिपक्व होण्याऐवजी दुखी आणि कष्टी बनतात. एक प्रकारे ही नकळत घडत जाणारी प्रक्रिया त्यांना आतून पोखरुन टाकते. आपल्याकडे माणसाला जात असते, पण एकाकीपणाला कम्युनिटी नसते.

आज कुटुंब आणि त्यातल्या व्यक्ती, तर स्वतंत्र बेटांप्रमाणे जगत असतात. कुटुंबातले सदस्य समोर येतात, तेव्हा झाडाझडतीच होते किंवा मग शुष्क आर्थिक व्यवहारांची चर्चा होते. भावनेविषयी कोणीच बोलत नाही. मग एकीकडे हे साचलेपण अन् दुसरीकडे व्यर्थतेचे रितेपण. यामुळे माणसे अधिक एकाकी बनतात. लक्षात घ्या, यापैकी कोणत्याही प्रसंगात तुम्ही स्वत:ला पाहत असाल, तर तुम्ही एकटे नाही. याच भावनेने हजारो लाखो लोकांना ग्रासले आहे. एवढ्या मोठ्या न जाणवणाऱ्या रोगाबद्दल काय करायचं?

सर्वप्रथम आपल्या कुटुंबाशी कनेक्ट व्हायला शिकले पाहिजे. मनातल्या भावभावना व्यक्त करुन दुसऱ्यांच्या भावभावनांचा आदर करावा. त्यांची हेटाळणी करून कोणी मोठे बनणार नाही आणि कमकुवतपणा व्यक्त करून कोणी कमजोर ठरणार नाही. समोरच्याशी बोलताना पूर्ण लक्ष केंद्रीत करून ऐकावे आणि मगच बोलावे. माणसे व्यक्त होताना दोन शब्दांच्या विरामांमध्ये अधिक व्यक्त होत असतात. ते कंगोरे हळूवार पकडायला शिकले पाहिजे. वर्षानुवर्षांची असुरक्षितपणा आणि एकटेपणा असा दोन-चार दिवसांमध्ये जाणार नाही. तसेच चिकाटीने सातत्याने ‘कनेक्ट’ व्हायला शिकावे लागेल. लक्षात घ्या, ‘नथिंग वर्थ फॉर लिव्हिंग’ ही भावना रुजत जाते तेव्हा ‘नथिंग वर्थ फॉर डाइंग’ ही भावना वाढवण्यासाठी जगण्याला अर्थ द्यावा. नात्याला नवे आयाम द्यावेत. जवळचा माणूस रक्ताचाच असला पाहिजे, असे काही नाही. परवा एका मानसोपचार तज्ज्ञाने सुंदर उपाय सांगितला. तो म्हणाला, रोज एका अनोळख्या व्यक्तीशी बोला, त्याला समजून घ्या.

आपण जगात एकटे आलो आणि एकटेच जाऊ. पण एकटे राहणे टाळण्यासारखे आहे. एकटे राहू नका आणि कोणालाही एकटे राहू देऊ नका. एकाकीपणाच्या भीतीपासून प्रथम दूर व्हा. आधी स्वत:शी बोला, स्वत:ला समजून घ्या आणि हो, स्वत:ला समजवादेखील. पाण्याची घुसळण थांबली की जलाशय स्वच्छ होतो. मनाचे तसेच आहे. स्वत:साठी वेळ काढा. अगदी एकटे राहायची वेळ आली तरी कसे जगणार, याच्या तयारीत स्वत:ला गुंतवा. आनंदी बना. आनंदी जगा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -