Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमालिकाविश्व

मालिकाविश्व

‘खुपते तिथे गुप्ते’च्या दुसऱ्या भागात हजेरी लावणार कोण? 

झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पहिल्याच भागात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमात तिसऱ्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी हजेरी लावली आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला.

आता दुसऱ्या भागात ही प्रेक्षकांना बसणार आहेत धक्क्यावर धक्के कारण, ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर दिसणार आहेत, महाराष्ट्राचा प्रचंड आवडता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून पुन्हा एकदा घराघरात पोहोचलेला अभिनेता श्रेयस तळपदे.

झी मराठीने नुकताच एक प्रोमो आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला. यात गुप्तेंच्या धारदार प्रश्नांना तो अतिशय भावनिक उत्तर देतोय हे पाहायला मिळते आहे. आता अजून या भागातून काय काय गुपित बाहेर पडणार आहेत, यासाठी पाहायला विसरू नका ‘खुपते तिथे गुप्ते’ रविवार ११ जून रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे…; अद्वैत आणि नेत्रा प्रेमरंगात रंगणार

रुपाली अद्वैतला नेहमीप्रमाणे आपल्या फसव्या मायेच्या जाळ्यात ओढून त्याचं लग्न तिच्या मर्जीने लावायचा प्रयत्न करते. पण अद्वैत नकार देतो. त्याच वेळी शेखर चाणाक्षपणे अद्वैतला रूपालीचं नाव पुढे करून नेत्राशी लग्नाबद्दल विचारतो. अचानकपणे नेत्राचं नाव आल्याने अद्वैत गडबडतो. त्याला वाटतं नेत्रा रक्षाकवच असल्यामुळे लग्नाला होकार देत असेल; परंतु शेखर त्याला सांगतो की, नेत्राचं अद्वैतवर प्रेम आहे. हे ऐकून अद्वैत चकीत होतो.

तो याच विचारात हरवलेला असताना एक जादू घडावी तशी एक घटना घडते आणि या घटनेमुळे अद्वैत-नेत्रा कायमचे प्रेमाच्या रंगात रंगून जाणार आहेत, अशी ही कुठली घटना असेल, असं काय घडलं असेल की नेत्रा-अद्वैतला एकत्र यायला एक क्षणही लागला नाही. हे लवकरच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

सुपरस्टार होण्याचं स्वप्न झालं साकार…; पुण्याच्या सई आणि शरयू ठरल्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या महाविजेत्या…

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. सागर आणि दिव्येश, झीरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, श्रीमयी सूर्यवंशी, सई आणि शरयू यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत पिंपरी पुणे येथील सई आणि शरयू यांनी बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली, तर उपविजेते ठरले जळगावचे सागर आणि दिव्येश. तृतीय क्रमांकाचा मान कल्याणच्या झीरो डिग्री क्रू ग्रुप आणि कराडच्या डी टू डी क्वीन्स ग्रुप यांना विभागून देण्यात आला, तर श्रीमयी सूर्यवंशीला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. महाअंतिम सोहळ्यातील विजेत्या सई आणि शरयू यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. या खास सोहळ्यात सई आणि शरयूला शुभविवाह मालिकेतील भूमीनेही साथ दिली होती.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना सई आणि शरयू म्हणाल्या, ‘हा सारा प्रवास स्वप्नवत आहे. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल आम्ही आभारी आहोत. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली होती. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे गुरूच्या रूपात दिले. या गुरूंकडून खूप काही शिकायला मिळालं.’

सई आणि शरयू या दोघीही पुण्यातल्या गौरव डान्स अकादमीमधून नृत्याचं शिक्षण घेत आहेत. याच दरम्यान त्यांना मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाविषयी कळलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली. ऑडिशन ते विजेता हा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. नृत्याची आवड आणि दोघींमधल्या घट्ट मैत्रीने सई आणि शरयूला विजेतेपदापर्यंत पोहोचवलं. इतक्या लहान वयात मिळालेलं हे घवघवीत यश त्यांचा पुढील प्रवास अधिक तेजोमय करेल हे नक्की.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -