Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

आणि तो आलाच! राज्यात मान्सूनचे आगमन

आणि तो आलाच! राज्यात मान्सूनचे आगमन

पुणे: उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तसेच पावसाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. राज्यातील कोकणात तसेच बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर यासह इतरही अनेक जिल्ह्यात काल पासून पावसाला सुरूवात झाली. मुंबईमध्ये काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मान्सून जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचे आगमन होण्यासाठी तब्बल एक आठड्याचा उशीर झाला आहे. मान्सूनने महाराष्ट्रामध्ये दाखल होण्यासाठी ११ जूनची तारीख गाठली. आता हळूहळू मान्सून पुढे सरकरत संपूर्ण राज्यात सक्रीय होईल.

दरम्यान, हवामान खात्याने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बिपारजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिमी किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण झाले. पुढील ४८ तासात मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होईल.

पुणे हवामान विभागाचे अध्यक्ष आणि हवामान तज्ज्ञ के. एस होसळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार, नैऋत्य मान्सूनचे आज ११ जूनला महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा‌ व तामिळनाडू व आंध्रप्रदेशचा‌ काही भाग व्यापला आहे. त्यामुळे राज्यात पुढच्या ४ ते ५ दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Comments
Add Comment