Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीसलूनमध्ये ५० रुपयांचे यूपीआय पेमेंट केले आणि जाळ्यात अडकला

सलूनमध्ये ५० रुपयांचे यूपीआय पेमेंट केले आणि जाळ्यात अडकला

मुंबईतून फरार झालेला बलात्काराचा आरोपी बिहारमध्ये सापडला

मुंबई/दरभंगा : मुंबईतून पळून गेलेल्या बलात्कार प्रकरणातील २६ वर्षीय आरोपीला बिहारमधील दरभंगा येथून अटक केली आहे. या आरोपीने बिहारमधल्या एका केशकर्तनालयात केलेल्या ५० रुपयांच्या यूपीआय पेमेंटद्वारे पोलिसांनी त्याला शोधून काढले.

एका २५ वर्षीय महिलेने दक्षिण मुंबई पोलीस ठाण्यात ८ मे रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने म्हटले होते की, सोशल मीडियाद्वारे तिला भेटलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ती गर्भवती झाली. त्यामुळे त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३१३ (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात करणे), ४१७ (फसवणूक करणे) आणि ५०६ (२) (धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुन्हा दाखल केल्यानंतर लगेचच आमची टीम आरोपीच्या मुंबईतल्या घरी दाखल झाली. परंतु त्याआधीच तो फरार झाला होता. त्याचा फोनही बंद होता त्यामुळे आम्ही त्याचे लोकेशन ट्रेस करू शकलो नाही, त्यानंतर पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स मिळवले. कॉल डिटेल्सद्वारे त्याची ओळख, त्याच्या नातेवाईकांची नावं आणि त्यांचा पत्ता पोलिसांनी शोधून काढला.

हा आरोपी बिहारचा असून त्याची बहीण सध्या दरभंगामध्ये राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जवळच्याच एका गावात त्याची आई राहत असल्याचेही पोलिसांना समजले. दरभंगा हे ठिकाण नेपाळच्या सीमेनजिक असल्याने पोलिसांना आधी संशय होता की, तो कदाचित नेपाळला पळून गेला असेल. परंतु तो दरभंगा येथेच होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ११ मे रोजी पोलिसांचे एक पथक दरभंगा येथे पाठवले.

पोलीस सर्वप्रथम आरोपीच्या बहिणीच्या पत्त्यावर दरभंगा येथे गेले. परंतु पोलीस घराबाहेरच्या परिसरातच थांबले ते घरात गेले नाहीत. पोलिसांचे पथक आरोपीच्या बहिणीच्या घराबाहेर गस्त घालत होते. त्याच वेळी मुंबईतल्या एका हवालदाराला संशयिताच्या बँक खात्यातून नुकतेच एक यूपीआय पेमेंट झाल्याची माहिती मिळाली. दरभंगा येथील एका सलूनमध्ये त्याने ५० रुपयांचं पेमेंट केले होते.

सलूनचा यूपीआय आयडी मिळाल्यावर लगेच डिजीटल पेमेंट कंपनीकडून सलूनचं नाव, नंबर आणि पत्ता पोलिसांनी मिळवला. तसेच पोलिसांनी सलून चालकाशी संपर्क साधला. हे सलून आरोपीच्या बहिणीच्या घरापासून केवळ ५० मीटर अंतरावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सलूनच्या दिशेने धाव घेतली. सलून चालकाला आरोपीचा फोटो दाखवला. आरोपीची माहिती मिळवून त्याच रात्री पोलिसांनी आरोपीच्या बहिणीच्या घरी धाड मारली. आरोपी घरातच होता. पोलिसांनी आरोपीला तिथेच बेड्या ठोकून मुंबईला आणले. त्याने पोलीस चौकशीत गुन्हा कबूल केला असून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -