आईचा वाटा

कथा : रमेश तांबे


बाबांनी ताटावर नजर फिरवली बघतात, तर काय सर्व फोडी पोरांनी संपवल्या होत्या अन् फक्त बाठे तेवढे आईसाठी ठेवले होते...!


बाबांनी आज घरात आंबे आणले होते. हापूस आंब्यांचा सुगंध साऱ्या घरात दरवळत होता. कधी एकदा आंबे खातोय असं राधा आणि यशला झालं होतं. पण आंबे कापून खायचे की त्याचा आमरस बनवायचा हे आईने अजून ठरवले नव्हते. इकडे राधा आणि यशच्या तोंडाला पाणी सुटले होते. शेवटी आंबे कापून खायला आईने होकार देताच ते दोघे पेटीकडे धावले. पेटीत बरोबर बारा आंबे होते. म्हणजे प्रत्येकी तीन. त्या दोघांनी तीन तीन पिवळे धमक असे आंबे निवडले. स्वच्छ पाण्यात थोडा वेळ ठेवून त्यांनी ते धुवून घेतले. त्याच्या छोट्या छोट्या फोडी केल्या अन् दोघेही आंब्याचा मनसोक्त आनंद घेऊ लागले. राधा म्हणाली, ‘आई किती गोड आहेत गं आंबे!’ ‘हो ना, काय चव आहे आंब्याला’ यशनेदेखील आपले मत मांडले. तेवढ्यात बाबा घरात आले अन् म्हणाले, ‘काय मजा आहे पोरांची. अरे नीट खा. शर्टवर रस पडतोय गधड्या...!’ बाबा ओरडले. मग काय बाबादेखील पोरांमध्ये सामील झाले. त्यांनीदेखील त्यांच्या वाट्याचे तीन आंबे निवडले अन् खायला सुरुवात केली. तेही म्हणाले, ‘खरेच हापूस तो हापूसच... त्याला तोड नाही’ तेवढ्यात राधा म्हणाली, ‘बाबा या आंब्याला हापूस आंबा का म्हणतात?’ मग बाबा हसत हसत म्हणाले, ‘अगं सोळाव्या शतकात अल्फान्सो नावाच्या पोर्तुगीज माणसाने या जातीच्या आंब्याचे कलम आपल्या गोव्यात आणले. त्याच्याच नावावरून हापूस असे नाव पडले. ‘अरे वा! अल्फान्सोवरून हापूस’ असं आश्चर्याने म्हणत अजून एक फोड उचलली. बाबांनी आपल्या वाट्याचे आंबे भरभर संपवले. आंब्याचा बाठा म्हणजेच कोयदेखील चांगली खाल्ली.



राधा आणि यश आंबे खाण्यात दंग झाले होते. त्यांच्या फोडी खाऊन संपल्या होत्या. पण बाठ्यांना त्यांनी हातदेखील लावला नाही अन् तसेच उठून पुन्हा आंब्याच्या पेटीकडे आले. उरलेले तीनही आंबे धुवून खायला सुरुवात केली. बाबा दुसऱ्या खोलीत बसले होते. त्यांना काहीच कल्पना नव्हती की पोरांनी आईच्या वाट्याचे आंबेदेखील कापले आहेत. थोड्याच वेळात आंबे संपवून राधा आणि यश हात धुवून टीव्हीवर कार्टून बघत बसले.



आई स्वयंपाक घरातले काम संपवून बाहेर आली. पाहाते, तर काय सारा टेबल आंब्याच्या रसाने माखला होता. खाल्लेल्या आंब्याच्या साली आणि न खाल्लेले बाठे ताटात तसचे होते. ‘पोरांना चांगल्या सवयी कधी लागणार कुणास ठाऊक’ असं म्हणत तिने आंब्याची पेटी उघडली. बघते तर काय आंबे संपले होते. आई हिरमुसली. ही गोष्ट बाबांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी राधा आणि यशला हाक मारली अन् म्हणाले, ‘आईच्या वाट्याचे आंबे कुणी खाल्ले?’ दोघेही म्हणाले, ‘आम्हीच खाल्ले खूप छान होते अन् आईसाठी ठेवलेत ना खूप सारे!’ टेबलावरच्या ताटाकडे बघत यश म्हणाला. बाबांनी ताटावर नजर फिरवली बघतात, तर काय सर्व फोडी पोरांनी संपवल्या होत्या अन् फक्त बाठे तेवढे आईसाठी ठेवले होते.



आता मात्र बाबा चिडलेच. ‘राधा यश आता तुम्ही मोठे झालात. तुम्ही आईच्या वाट्याचे आंबे का खाल्ले? चांगल्या रसदार फोडी तुम्ही खाल्ल्यात अन् आईसाठी मात्र बाठे! तुमच्यासोबत असं कुणी वागले, तर तुम्हाला ते आवडेल काय?’ ‘जाऊ द्या हो... पोरांनीच खाल्लेत ना, खाऊ दे, मी खाईन ते बाठे’ आई म्हणाली. तसे बाबा म्हणाले, ‘नाही; प्रत्येकाला त्याचा वाटा मिळायलाच हवा.’ ‘साॅरी आई’ असं म्हणत यश लगेच आईला बिलगला. ‘लक्षात नाही आलं आमच्या आई. आम्ही असं वागायला नको होतं.’ राधा म्हणाली. ‘आईलाही तिचा वाटा मिळायलाच हवा असं म्हणत’ बाबांनी खिशातून पाचशेची नोट काढली अन् राधाला आंबे आणायला पिटाळले. आई नको नको म्हणत असतानाही राधा पिशवी घेऊन घराबाहेर पडली. राधाने नवे आंबे आणले. यशने ते छान धुवून त्याच्या फोडी करून आईसमोर ठेवल्या. मग आईने राधा आणि यशला हाताला धरून पुन्हा आंबे खायला बसवले. पण यावेळी मात्र त्यांनी प्रथम आंब्याचे बाठे खायला सुरुवात केली. राधा आणि यशमध्ये झालेला हा बदल पाहून आई बाबांचा चेहरा समाधनाने फुलून गेला होता!

Comments
Add Comment

कोणासाठी...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आज दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि माझी मैत्रीण रजनी मुलुंडला

माणूस बदलू शकतो

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणूस हा विचार, भावना आणि कृती असलेला संवेदनशील प्राणी आहे. परिस्थिती,

स्ट्रॉ ने पेय कशी पितात?

कथा : प्रा. देवबा पाटील त्या दिवशीही सीता व निता या दोघी बहिणींनी शाळेतून घरी येताबरोबर आपला अभ्यास करून घेतला. नि

बाळाचा हट्ट!

कथा : रमेश तांबे एक होती मांजर आणि तिला होतं एक बाळ! पांढऱ्याशुभ्र रंगाचं, घाऱ्या घाऱ्या डोळ्यांचं! ते खूप खेळायचं,

प्रयत्नवादाला स्वीकारा

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर केल्याने होत आहे रे।  आधी केलेची पाहिजे।

विष

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ ‘विष’ हा विषय? बापरे! आजच्या विषयाचे नाव बघून थोडसे घाबरायलाच होतंय ना? पण कोणते