Thursday, April 24, 2025
Homeदेशमान्सून केरळला धडकणार

मान्सून केरळला धडकणार

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ): नैऋत्य मान्सून देशाच्या सागरी हद्दीत दाखल झाला असून कोणत्याही वेळेला तो केरळमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभाग लवकरच त्याचे केरळमध्ये आगमन झाल्याची घोषणा करू शकते. मान्सून सामान्यतः एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये तो २९ मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. तर तत्पूर्वी २०२१ मध्ये तो १ जूनला पोहोचला होता. सोमवारपासून केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नैऋत्य मान्सून सध्या लक्षद्वीप व दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागातून पुढे सरकत आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात येते. रविवारी पुण्यासह नाशिक, नंदुरबार , जळगावसह राज्याच्या काही भागात वादळीवाऱ्यासह पाउस झाला.

राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, अंदमान व निकोबार बेट समूह, केरळ, कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, किनारपट्टी आंध्र प्रदेश व यानाम, तेलंगणा, रायलसीमा आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाट, मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत केरळच्या पठानमथिट्टा व इडुक्की जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यंदा सरासरी पावसाचा अंदाज

यंदा मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पाऊस सामान्य झाल्यास देशातील अन्नधान्य उत्पादनही सामान्य होईल. म्हणजेच महागाईपासून दिलासा मिळू शकतो. देशातील शेतकरी साधारणत: १ जूनपासून खरीप पिकांची पेरणी सुरू करतात. याच वेळी मान्सून भारतात प्रवेश करतो. पिकाची पेरणी ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत सुरू असते.

८० टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून

देशात वर्षभर जेवढा पाऊस पडतो, त्यापैकी ७० टक्के पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. आजही आपल्या देशातील ७०% ते ८०% शेतकरी सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या परिस्थितीत त्यांचे उत्पादन पूर्णतः कमी किंवा जास्त पावसावर अवलंबून असते. खराब पावसाळा आला की महागाईही वाढते. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा २०% आहे. त्याच वेळी, कृषी क्षेत्र देशाच्या निम्म्या लोकसंख्येला रोजगार प्रदान करते. चांगला पाऊस म्हणजे निम्म्या लोकसंख्येचे उत्पन्न सणासुदीपूर्वी चांगले होऊ शकते. त्यामुळे त्यांची खर्च करण्याची क्षमताही वाढते.

देशात मान्सून येण्याचा नियम काय?

केरळ, लक्षद्वीप व कर्नाटकमध्ये मान्सून आल्याची घोषणा करणाऱ्या ८ स्थानकांवर सलग २ दिवस किमान २.५5 मिमी पाऊस झाला की, देशात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -