पुणे: मान्सून अद्याप राज्यात दाखल झालेला नसला तरी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, वाशिम, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.
दरम्यान, भुसावळ शहरात जोरदार वादळामुळे एका इमरातीच्या सहाव्या मजल्यावरील भिंत कोसळल्याची घटना घडली. सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले.
दुपारी बारा वाजल्या नंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी परिसरात अनेक साहित्य उडाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. तसेच शहरात आठवडा बाजार असल्याने शेतीमाल विकण्यास आलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.