Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीदुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर पहिला भीषण अपघात

दुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर पहिला भीषण अपघात

दोघांचा मृत्यू तर दोन प्रवासी गंभीर जखमी

सिन्नर : शिर्डी ते भरवीर या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुंबईकडून शिर्डीकडे जाणाऱ्या कारचा आज मध्यरात्री १च्या सुमारास अपघात झाला. या कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट डिवायडरवर आदळून दुसऱ्या लेनवर पलट्या घेत गेली. या अपघातात दोघांचा मृत्यू तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

नवीन महामार्गावरील हा पहिला अपघात आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली असली तरी अद्याप वाहनधारकांना महामार्गावरून वाहने चालवण्याचा अंदाज येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे.

रात्री १ च्या सुमारास मुंबईकडून शिर्डी बाजूकडे जाणारी कार क्र. एम. एच. २० ई. वाय. ५२५७ ही सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरवर आदळून शिर्डी बाजूकडून थेट मुंबई बाजूकडे जाणा-या लेनवर जावून आदळली. यावेळी कारने दोन ते तीन पलटी घेतल्याने कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात भरतसिंग परदेशी व नंदीनी हे दोघे गंभीर जखमी झाले असून धरमसिंग गुसींगे व राजेंद्र राजपूत या दोघांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची महिती कळताच महामार्गावरील रेस्क्यू पथक व महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत मदतकार्य सुरू केले. जखमींना ॲम्ब्युलन्सने कोपरगाव येथे औषधोपचारासाठी पाठविण्यात आले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला घेवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, सिन्नर महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. गायकवाड यांच्यासह महामार्गाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, क्यू. आर. व्ही व्हॅन वाहनावरील कर्मचारी यांनी मदतकार्य केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -